भारताची ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’

    24-Sep-2023
Total Views | 179
Article On Indian Zero tolerance policy

देशाच्या शत्रूला पकडून न्यायालयात शिक्षा देणे किंवा तसे शक्य नसेल, तर तो जिथे असेल तिथे जाऊन, त्याला शिक्षा देणे, हे इस्रायलच्या ‘मोसाद’चे धोरण आता भारताच्या ‘रॉ’नेसुद्धा स्वीकारले आहे का? अशी चर्चा समाजात चालू आहे. भारताची दहशतवादविरोधी ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ प्रत्येक्षात प्रभावीपणे अमलात आणली जात आहे. निज्जरची हत्या, खलिस्तान दहशतवाद आणि राजनयिक घडामोडी, यांचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख...

तो दिवस होता-दि. १६ ऑक्टोबर १९७२चा. इस्रायलच्या ‘मोसाद’ने पेलेस्टिनी व्हाएल झवायेटर याला गोळ्या घालून रोममध्ये ठार केले, तर दि. ८ डिसेंबर १९७२ला पत्रकार बनून कट रचून महमूद हमशारी याला फ्रान्समध्ये त्याच्या घरातील फोनमध्ये स्फोटके पेरून ठार केले होते. ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’ हे इस्रायलचे गाजलेले ऑपरेशन होते. अनेक वर्षर्ं ते चालू होते. दुसर्‍या देशात घुसून तेथे आपल्या देशाच्या शत्रूला यमसदनास धाडणे, हे इस्रायली गुप्तहेर संघटना ‘मोसाद’चे तंत्र होते आणि आहे. ज्या गुन्हेगाराला देशातील न्यायालयासमोर आणून फाशी देता येणे शक्य नाही, त्याला आहे त्या ठिकाणी ठार करून न्यायाची अंमलबजावणी करणे, हे इस्रायलचे धोरण आहे. इस्रायलची ‘मोसाद’ आणि भारताची ’रॉ’ यांची चर्चा सध्या भारतीय समाजात, सोशल मीडिया आणि अनौपचारिक कट्ट्यांवर रंगलेल्या आहेत. कारण, नुकतेच उद्भवलेले निज्जर प्रकरण.

केवळ निज्जर नाही, तर याआधी गेल्या वर्षात किमान सहा दहशतवादी भारताच्या बाहेर ठार केले गेले आहेत. विशेष बाब म्हणजे, त्यांच्या हत्येमागे कोण आहे. हे अजूनही सिद्ध होऊ शकलेले नाही. यातील अनेक दहशतवादी भारताच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीतील होते.

निज्जर प्रकरण

हरदीपसिंग निज्जर याला दि. १८ जूनला कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे या ठिकाणी गुरुनानक शीख गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये गोळ्या घालून हत्या केली गेली. तो या गुरुद्वारा समितीच्या अध्यक्षपदावर होता. वास्तविक याला पकडण्यासाठी भारताने दहा लाखांचे पारितोषिक दि. २२ जुलै २०२२ला घोषित केले होते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये सांगितले की, निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजंटचा हात आहे. भारताने स्पष्ट शब्दात हे आरोप फेटाळून लावले आहेत. लगेच दुसर्‍या दिवशी तेथील परराष्ट्रमंत्री मेलनी जॉली यांनी तेथील भारतीय गुप्तचर विभाग प्रमुख पवन कुमार रॉय यांना भारतात परत जाण्याचा आदेश दिला. परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरून मॅकके यांना बोलावून घेतले; तसेच अधिकारी ऑलिव्हर सिल्वेस्टर यांची हकालपट्टी करण्यात आली. भारताने कॅनडाची व्हिसा प्रक्रिया स्थगित केली. राजनयिक संबंध ताणले गेले. हे सुरू असताना सुखदुल सिंग गील उर्फ सुखा दुनेके हा राष्ट्रीय तपास यंत्रणेला हवा असणारा दहशतवादी कॅनडामध्ये दि. २१ सप्टेंबर २०२३ ला ठार केला गेला. यामुळे प्रकरण आणखीन तापले.

निज्जर हा भारताचा गुन्हेगार आहे, हे माहीत असूनसुद्धा कॅनडाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. कॅनडाने आपल्या भूमीवर दहशतवादाला थारा दिला. हा भारताचा आरोप आहे. निज्जर हा ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या संघटनेचा द्वितीय क्रमांकाचा नेता होता. पंजाबच्या लुधियाना मध्ये २००७ मध्ये झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यात हरदीपसिंगचा हात होता. त्याने २०१६ मध्ये खुले पत्र लिहिले होते. त्यात त्याने म्हटले होते की, शिखांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचे तो समर्थन करतो. भारतव्याप्त पंजाब त्याला स्वतंत्र करायचा आहे. त्यासाठी सार्वमत घेण्याची मागणी केली. पण, ‘इंटरपोल’ने २०१६ ला त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अनेक वेळा प्रयत्न केले होते. २०१८ मध्ये कॅनडा पोलिसांनी त्याला काही काळ नजरकैदेत ठेवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाच्या वेळी तेथील एकत्रित जमावावर हिंसक हल्ला करण्याचा, नेत्यांना मारण्याचा कट त्याने २०१८ मध्ये रचला होता. यासाठी तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. भारताने त्याला २०२० मध्ये दहशतवादी म्हणून घोषित केलेले होते.

भिंद्रेनवाले/‘खलिस्तान टायगर फोर्स’

भिंद्रेनवाले ‘टायगर फोर्स’ ही १९८४ ला स्थापन झालेली संघटना असून, खलिस्तानच्या निर्मितीसाठी १९८७ ते १९९७ दरम्यान सक्रिय होती. यांनी १९९१ मध्ये लुधियानामध्ये भारत सरकारशी शांततेच्या वाटाघाटी केल्या होत्या. त्यावेळी चंद्रशेखर हे पंतप्रधान होते. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी ‘आयएसआय’च्या मदतीने या वाटाघाटी उधळून लावायचा प्रयत्न केला होता.

खलिस्तानी दहशतवादाचा संक्षिप्त आढावा

खलिस्तानी दहशतवाद हा थेट शीख धर्माशी जोडला गेलेला आहे. साधारणपणे १९८० नंतर पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी आणि त्यासाठी दहशतवादी कारवाया यांची सुरुवात झालेली दिसून येते. त्याला पाकिस्तानची मदत होती. त्यात पंजाबच्या राजकीय परिस्थितीचा प्रभावही महत्त्वाचा आहे. शिरोमणी अकाली दल हा पक्ष १९७२ला विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. पंजाबातच शिखांचा पक्ष पराभूत झाला. हे शल्य मोठे होतेच आणि यातूनच ‘धार्मिक आणि राजकीय’ स्थान डळमळीत झाल्याची भावना होती. शिखांची अस्मिता जागृत करून आपले राजकीय हेतू साध्य करणे. हा उपाय दिसत होता. मग या राजकीय पक्षाने १९७३ ला ‘आनंदपूर साहेब ठराव’ करून पंजाबला जास्तीत जास्त राजकीय स्वायत्तता देशांतर्गत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले; तसेच शीख धर्माला हिंदू धर्मापासून स्वतंत्र मानावे, हे या ठरावात मुख्यतः होते. यांना जर्नेलसिंग भिंद्रेनवाले हे शिखांचे चौदावे जथेदार किंवा प्रमुख होते येऊन मिळाले. यामुळे शिखांचे ऐक्य प्रभावीपणे साधले गेले.
पुढे अकाली दल आणि भिंद्रेनवाले त्यांनी १९८२ला संयुक्तपणे ‘धरम युद्ध मोर्चा’चा प्रारंभ केला. याने ४१० जणांचा बळी घेतलेला आहे. नंतर १९८३ला भिंद्रेनवाले यांनी स्वतःची अटक टाळण्यासाठी अकाल तक्ख्तचा आधार घेतला. सुवर्णमंदिरात त्यांनी आश्रय घेतला. मग जून १९८४ मध्ये त्याच्यासाठी ‘ऑपरेशन ब्ल्यूस्टार’ झाले. भिंद्रेनवाले भारतीय सैन्याकडून ठार मारले गेले. परिणामी, १९८४ ऑक्टोबर अखेरीस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्याच शीख असणार्‍या सुरक्षारक्षकांनी केली. नंतर शीखविरोधी दंगली उसळल्या. काँग्रेस समर्थक आणि शीख यांच्यात हिंसक चकमकी झाल्या. स्वतंत्र खलिस्तानची मागणी जास्त तीव्र झाली.

भारतात शीख सुरक्षित नाहीत, या भावनेला पाठिंबा मिळू लागला. शीख धर्माच्या लोकांसाठी स्वायत्त अशा ‘खालसालॅण्ड’ची निर्मिती व्हावी, ही मागणी होऊ लागली. यानंतर फुटीरतावादी गटाला आर्थिक आणि राजनयिक आधार काही घटक देऊ लागले. काही अशिक्षित तरुण, तर केवळ ‘मजा’ म्हणूनसुद्धा या खलिस्तानवादी चळवळीला येऊन मिळाले होते. खलिस्तानसाठी भारत आणि पाकिस्तानमधील पंजाब आणि काही प्रदेश त्यांना हवा होता.

जी.बी.एस.सिद्धू यांचा स्फोटक दावा

भारताच्या ‘रॉ’चे माजी स्पेशल सेक्रेटरी जी. बी.एस. सिद्धू यांनी त्यांच्या ‘दि खलिस्तान कॉन्स्पिरसी’ या त्यांच्या पुस्तकात अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यांनी खलिस्तान चळवळ ’ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ कॅनडा आणि दिल्लीचे काँग्रेस संस्कार, इंदिरा गांधींची हत्या याविषयी लिहिलेले आहे. त्यांनी दावा केला आहे की, काँग्रेसने आपल्या राजकीय स्वार्थासाठी खलिस्तानी चळवळ सुरू करायला मदत केली. म्हणजेच खलिस्तानी चळवळ ही काँग्रेसने निर्माण केलेले अरिष्ट आहे. खलिस्तान दहशतवाद हा काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक निर्माण केला.

खलिस्तानी दहशतवाद आणि कॅनडा

कॅनडामध्ये आठ लाखांच्यावर शीख आहेत. एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के जनता शीख आहे. भारताबाहेर सगळ्यात मोठ्या संख्येने शीख तेथे वास्तव्य करीत आहेत. अनेक शीख दहशतवादी तेथे नागरिकत्व मिळवून राहत असल्याची वस्तुस्थिती आहे.
खलिस्तानी चळवळ ही भारतातून पंजाब स्वतंत्र करून शिखांना वेगळे राष्ट्र मिळावे, यासाठी चालवली गेली. याचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन ब्ल्यूस्टार’ पंजाबमध्ये राबवले गेले. जर्नेलसिंग भिंद्रेनवाला यांच्या विरोधात सुवर्ण मंदिरात ही कारवाई केली गेली. यात अनेक जण ठार झाले. याचा प्रतिशोध म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या त्यांचेच अंगरक्षक सतवंत आणि बियंत यांनी केली गेली. त्यानंतर शीखविरोधी दंगली उसळल्या आणि हजारो शीख ठार केले गेले. पुढे ‘ऑपरेशन ब्ल्यूस्टार’चा बदला म्हणून खलिस्तानी दहशतवाद्यांनी १९८५ मध्ये भारताची ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’, ‘एअर इंडिया’चे कॅनडा विमान बॉम्बने उडवले. यात २००च्या वर कॅनडाचे नागरिक होते. तेव्हापासून खलिस्तानी कारवाया आणि कॅनडा यांचा थेट संबंध येत गेला.

भारताने १९८७ मध्ये प्रत्याप्रण करार आणि १९९८ मध्ये कायदेशीर सहकार्य करार आणि ‘इंटरपोल’ची मदत घेणे. या गोष्टी कॅनडातील दहशतवाद्यांच्या बाबतीत केलेल्या आहेत. निज्जर त्याला अपवाद नाही. २०२२ मध्ये पंजाब पोलिसांनी निज्जरला भारताकडे सुपुर्द करण्याची मागणी केली होती.

मोदी सरकारचे वास्तवतावादी धोरण

मोदी सरकारने राष्ट्र रक्षणात कुठेही तडजोड केलेली नाही. दहशतवादाच्या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ भारताने अधिकृतपणे स्वीकारलेली आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये १७२ दहशतवादी सुमारे ९० लष्करी ऑपरेशनमध्ये ठार केले गेले आहेत. यातील ४२ जण हे प्रामुख्याने पाकिस्तानी दहशतवादी आहेत. भारताने २०११ मध्ये ५० ‘मोस्ट वाँटेड’ जणांची यादी पाकिस्तानला दिलेली आहे. यांना भारताकडे सुपुर्द करावे, अशी मागणी भारताची होती. पण, पाकिस्तानने तसे केले नाही. दहशतवादी संघटनांना जाऊन मिळणार्‍या तरुणांची संख्या घतली आहे. गेल्या वर्षी पेक्षा यात ३७ टक्के घट झाली आहे.

भारताच्या गुप्तचर विभागाने आतापर्यंत, अशा प्रकारे कोणतेही कारवाई कधीही परकीय देशात केलेली नाही. भारताच्या अधिकृत सूत्रांनीसुद्धा अशी कोणतीही कारवाई कॅनडामध्ये केलेली नाही, असे स्पष्ट केलेले आहे. भारताची रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालीसीस विंग रॉ ही देशाबाहेरील गोपनीय माहिती गोळा करणे आणि त्या अनुषंगाने कारवाया करते. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, म्यानमार या ठिकाणी तिच्या कारवाया चालू असतात. ‘रॉ’ आणि इस्रायलची मोसाद यांच्यात सहकार्य आहे. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर भारताच्या सगळ्याच धोरणात वास्तववाद आणि राष्ट्रहित यांची सांगड घतली गेली आहे.

गेल्या वर्षभरात काश्मीर आणि खलिस्तान यांच्याशी संलग्न असणारे काही दहशतवादी देशाबाहेर मारले गेलेले आहेत. पण, त्यांच्या हत्येला कोण जबाबदार आहे. हे अजूनसुद्धा कळलेले नाही. विशेषतः पाकिस्तानमध्ये ते मारले गेलेले आहेत. ( संदर्भ ः दी गार्डीयन- दि. २२ सप्टेंबर २०२३ Very messy- India-Canada row over Sikh killing causes diplomatic shock waves) हाफिज सईद हा भारताच्या २६/११ हल्ल्यामागील मास्तर माईंड आहे.

दि. २३ जून २०२१ ला पाकिस्तानच्या लाहोर येथे ‘जोहार टाऊन लष्कर-ए-तोएबा’चा संस्थापक आणि ‘जमात-उद-दावा’चा प्रमुख हाफिज सईद याच्या घराच्या बाहेर कार बॉम्बचा स्फोट केला गेला. यात तीन जण ठार आणि २४ जण जखमी झाले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी स्फोटक भरलेले दोन ड्रोन जम्मू विमान तळावर आदळले. भारतीय वायूसेनेच्या ताब्यात हा भाग आहे. काही तज्ज्ञ व्यक्तींच्या मते, हा हाफिज सईदच्या ‘लष्कर-ए-तोएबा’ने पाकिस्तानच्या लष्करासह ही कारवाई प्रतिशोध म्हणून केलेली असू शकते.

१) पाकिस्तानला दिलेल्या भारताच्या ‘मोस्ट वॉँटेड’ यादीत खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमीत सिंग पंजवार हे एक नाव होते. पुढे २०२३ च्या मेमध्ये परमीत सिंग पंजवार पाकिस्तानच्या लाहोरच्या जोहार टाऊन येथे गोळ्या घालून ठार केला गेला. पंजवारला दि. ६ मे ला सकाळी तो फिरायला गेला असताना ठार केले गेले.

२) ‘हिजबुल मुजाहिद्दीन’चा कमांडर बशीर अहमद पीर याला रावळपिंडी येथे दुकानाबाहेर ठार केले गेले.

३) भारताच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीतील एझाज अहमद अहनगर हा इस्लामिक स्टेट हिंद /खोरासनचा काश्मीरमध्ये काम करणारा दहशतवादी भारताच्या यादीत होता. तो दि. १४ फेब्रुवारीला अफगाणिस्तानच्या काबुल येथे तालिबानकडून ठार केला गेला.

४) सईद खालिद रझा हा जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असणारा अल बदरचा माजी नेता होता. त्याला कराचीत त्याच्या घराबाहेर दि. २६ फेब्रुवारीला ठार केले गेले.

५) सईद नूर शालोबर हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक तरुणांना संघटनेत भरती करण्याचे काम करत होता. याला पाकिस्तानच्या खैबरप्ख्तुनख्वा भागात दि. ३ मार्चला ठार केले गेले.

६) ‘इंडियन एअर लाईन्स-आय-सी-८१४’च्या अपहरणात सहभागी असणारा मिस्तरी झाहूर इब्राहिम याला दि. १ मार्च २०२२ ला ठार करण्यात आले. (Khalistan leaders shot dead- Canada blames India, Pakistan says "regular killing- The Mint -21 sep 2023)

पंतप्रधान मोदी यांचे शब्द -

बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर अहमदाबाद येथील एका रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “ये हमारा सिद्धांत है की, हम घर मे घूस कर मारेंगे...चुन चुन कर हिसाब लेना मेरी फितरत है ...वो अगर सातवे पातल मे छुपे हो, तो खींच कर निकाल कर मारुंगा....

राष्ट्राच्या एकेक नागरिकाच्या रक्ताची किंमत ज्याला आहे, असा नेता आपल्याला मिळाला. हे आपले भाग्य!

थोडक्यात, ‘मोदी है तो मुमकिन है’ हे दहशतवादविरोधी धोरणालासुद्धा लागू होते.

रुपाली कुळकर्णी-भुसारी
(लेखिका एकता मासिकाच्या संपादक आहेत.)


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121