बहुभाषक भारताचे भाषिक निर्वसाहतीकरण

    06-Aug-2025
Total Views |

भाषा, संस्कृती आणि अभिव्यक्ती यांच्या अन्योन्यसंबंधांचा मागोवा आपण गेले काही लेख पाहत आहोत. आतापर्यंतच्या चिंतनाचा धागा हा भाषिक वसाहतवादामुळे भारतीय संस्कृतीच्या भारतीय अभिव्यक्तीवर येणार्या मर्यादांच्या दृष्टिकोनातून होता. आज आपण त्याच्या एका वेगळ्या बाजूचा विचार करू.

वसाहतवादी प्रभावाने केवळ आपली अभिव्यक्तीच प्रभावित होते असे नाही, तर आपले स्व-विषयक चिंतन आणि आकलनही एक प्रकारे बदलते किंवा बदलले आहे. समाज, संस्कृती आणि राष्ट्र यांच्या अस्तित्वाचे आधार आणि त्यांचे परस्परसंबंध यांचे एक विशिष्ट प्रकारचे चिंतन हिंदू परंपरेत विकसित झाले आहे. दीर्घकाळच्या पाश्चात्य शिक्षणातून, पाश्चात्य भाषांतून या चिंतनाचे अपूर्ण भाषांतर करून व त्या अपूर्ण तसेच, पूर्णत्व मानून आणि या विषयातील पाश्चात्य चिंतनाला, त्यांच्या पारिभाषिक शब्दांना हिंदू तत्सम विचारांशी आणि शब्दयोजनांशी समकक्ष धरून सतत ज्या प्रकारची मांडणी झाली आहे, त्यामुळे आपले विशिष्ट चिंतन आपल्याच विस्मृतीत जाऊ लागले आहे का काय, अशी भीती निर्माण झाली आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्र या संकल्पनांमधील काही भेदांचा आज आपण विचार करू.

आधुनिक राष्ट्रवादाची मातृभूमी समजल्या जाणार्या युरोपचा राष्ट्रवाद हा भाषिक भेदांवर आधारित आहे. युरोपमध्ये पुनरुज्जीवन काळात किंवा त्यानंतरच्या काळात ज्या फ्रेंच किंवा जर्मन राष्ट्रांचे निर्माण किंवा एकीकरण केले गेले, त्यात ‘समान भाषा’ या तत्त्वाचा आधार मुख्य होता. जर्मन भाषक राज्यांचे एकीकरण हे प्रशियाच्या नेतृत्वाखाली जर्मन एकत्रीकरणाचे मुख्य सूत्र होते. राष्ट्रभावनेस चालना देणार्या जर्मन भाषेतील साहित्याची निर्मिती हा त्या वेळचा जर्मन नेत्यांचा एक प्रमुख आग्रह होता. त्याचबरोबर जर्मन परंपरांचे पुनरुज्जीवन, हाही भाग त्यात होता. ख्रिस्ती धर्माच्या आपल्या अनुभवावरून आपल्याला असे वाटते की, नाताळ हा सर्व ख्रिस्ती लोकांचा महत्त्वाचा सण! पण, तो साजरा करण्यात अनेक स्थानिक भेद आहेत. त्याचबरोबर ख्रिस्ती पंथ स्वीकारला असला, तरी युरोपातील अनेक देशांमध्ये अजूनही त्यांच्या प्राचीन परंपरा विविध स्वरूपात जतन केलेल्या आहेत. ‘एकभाषक लोकांच्या एक परंपरा’ असा काहीसा विचार मांडून जर्मन परंपरांचे दृढीकरण अशा आग्रहातून आजचे जर्मन राष्ट्र उभे राहिले आहे. फ्रेंच राज्याच्या निर्माणातही फ्रेंच भाषेचा, किंबहुना पॅरिसच्या फ्रेंच भाषेचा मोठा वाटा आहे. फ्रेंच भाषेच्या विविध बोलींमुळे राष्ट्रीय एकीकरणात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून त्यांनी भाषेचे प्रमाणीकरण करून पॅरिसची फ्रेंच भाषा हीच योग्य फ्रेंच असे घोषित केले. स्पेनच्या सीमेवरील फ्रेंच भागात ज्या बोली किंवा भाषा बोलल्या जात, त्यांची जवळीक स्पॅनिश भाषेशी आहे. या भागात ‘ऑसिटान’ आणि ‘बास्क’सारख्या भाषा फ्रेंच बाजूला, तर ‘कॅटलान’ भाषा स्पेन बाजूला बोलल्या जातात. तरीही पॅरिसची फ्रेंच भाषा ही फ्रेंच भागातील अधिकृत भाषा आहे आणि ‘कॅटलान’ भाषकांना आज वेगळा देश हवा आहे. थोडयात, भाषिक वेगळेपण आणि भाषिक सपाटीकरण हा युरोपीय देशांच्या राष्ट्रवादाचा गाभा आहे. राष्ट्रवादाची युरोपातील पहिली मांडणी ही भाषिक भेदांच्या आधारावर झाली आहे आणि अजूनही अनेक छोट्या भाषिक गटांना त्यांचे राष्ट्रीय वेगळेपण निर्माण करायचे आहे.

युरोपच्या ‘राष्ट्रवाद’ संकल्पनेचा उगम आपण एक प्रकारे बायबलमधील बाबेलच्या मनोर्याच्या कथेत पाहू शकतो. या कथेनुसार जगातल्या सर्व मानवांनी (म्हणजे ईश्वराचा संदेश प्राप्त झालेल्या सर्व मानवांनी, त्यात हिंदू वगैरे येत नाहीत) एक मनोरा बांधायचे ठरवले. हा मनोरा त्यांना आकाशात राहणार्या त्यांच्या ईश्वराच्या घरापर्यंत बांधायचा होता. ईश्वराला काही त्यांचा हा स्वतःच्या घरी थेट पोहोचण्याचा प्रकल्प पसंत पडला नाही. त्यामुळे ईश्वराने मानवांमध्ये भेद निर्माण करण्याचे ठरवले. त्याने प्रत्येक समूहास वेगळी भाषा दिली. आता या सर्व लोकांना एकमेकांशी संवाद साधता येईना. परेही परते बोलणे खुंटल्यामुळे आणि वैखरीचा शोध लागला नसल्यामुळे एकंदर प्रकल्प बारगळला आणि बाबेलचा मनोरा काही पूर्ण होऊ शकला नाही. युरोपमधील भाषाभेद हे एक प्रकारे ईश्वरनिर्मित आहेत, असा एक अर्थ या बाबेलच्या मनोर्याच्या कथेचा काढता येतो. त्यामुळे भिन्नभाषक समाज हे भिन्न राष्ट्रे आहेत, अशी समजूत निर्माण होते. भाषा आणि समाज यांच्यातील संबंधांचे हे विशिष्ट आकलन युरोपीय राष्ट्रवादाच्या मुळाशी आहे, असे मानले जाते.

या सर्व पार्श्वभूमीवर बहुभाषक भारताच्या राष्ट्रीयत्वाचा आधार काय, हे तपासून पाहायची गरज आहे. ‘राष्ट्र’ संकल्पना जरी पुरातन असली, तरी ‘राष्ट्रवाद’ संकल्पना आधुनिक असल्याचे म्हटले जाते. या विधानाचा नेमका गर्भितार्थ समजून घेण्याची आज आवश्यकता आहे. हिंदू (किंवा कोणत्याही अन्य राष्ट्रीय समाजाची) ‘राष्ट्र’ संकल्पना नाकारून ‘राष्ट्रवाद’ या ज्ञानशाखेचा अभ्यास हा केवळ आधुनिक काळात मांडल्या गेलेल्या युरोपीय मतापुरता सीमित असल्याचे यातून ध्वनित होते. हिंदू तत्त्वज्ञानाचा भाषा आणि समाज किंवा राष्ट्र यांच्या परस्परसंबंधांचा विचार या सर्व मांडणीहून सर्वथा वेगळा आहे. यासंदर्भात आपण ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ या सूत्राचा किंचित वेगळा अर्थ पाहू शकतो. आधी अनेकदा म्हटल्याप्रमाणे भाषाकुलांमधील सांस्कृतिक फरक हा एका अर्थाने आशयातील सांस्कृतिक फरक असतो. त्याउलट जर आशयात भिन्नता नसेल, तर त्याच्या अभिव्यक्तीतील भिन्नतेने अर्थांतरण होत नाही. एकाच समान भावाचे प्रकटीकरण भिन्न उदाहरणांच्या, उपमांच्या, भाषिक अलंकारांच्या माध्यमातून विविध चिंतक तत्त्ववेत्ते करत असतात. विभिन्न अभिव्यक्तींच्या मागे दडलेला समान भाव समान लोकसमुदाय निश्चित करतो. यातूनच समान संस्कृती आणि समान राष्ट्राचे निर्माण होते. त्यामुळे विभिन्न मानव समाजांची भिन्नता त्यांच्या अभिव्यक्तीच्या भाषेने नव्हे, तर त्यातील आशयामुळे ठरते. याहीपुढे जाऊन अखिल मानवसमाजाचा म्हणून काही समान आशय असतो. त्यामुळे राष्ट्रभिन्नता ही द्वेषमूलक नसून केवळ व्यवहारनिदर्शक असते.

युरोपच्या बाह्यांगाकडे लक्ष देण्याच्या प्रवृत्तीस आणि भारताच्या अंतरंगाकडे लक्ष देण्याच्या प्रवृत्तीस अनुसरूनच ही दोन भाषा आणि राष्ट्रीयत्वाच्या संबंधाविषयीची प्रतिमाने आहेत. युरोप केवळ भाषिक भेद पाहतो, तर भारत भाषेच्या पलीकडे जाऊन भावातील समानता पाहतो. त्यामुळे भारतात भिन्नभाषक विविध प्रांत असूनही, त्यांच्यात भिन्न राष्ट्रत्वाची भावना असल्याचे दिसत नाही. भाषेच्या प्रमाणीकरणाचेही प्रयत्न हे ब्रिटिश राजवटीतच झाल्याचे आपल्याला दिसतात. त्यापूर्वी प्रमाण मराठी कुठली, असा प्रश्न कोणी विचारल्याचे आढळत नाही. भाषेच्या विविध बोलींमधील प्रवाहीत्व जपत आणि प्रांतांच्या सीमांवर या बोलींचा मिलाफ होत, भाषांचा कदाचित एक सलग वर्णपटच संपूर्ण भारतीय प्रदेशात अस्तित्वात होता. ज्ञानभाषेचे काम संस्कृतला दिलेले असल्याने इतर भाषांच्या प्रमाणीकरणाची आवश्यकताही नव्हती. आज आपण पाहत असलेले प्रमाणीकरण कंपनी सरकारच्या काळात ब्रिटिश अधिकार्यांच्या सोयीसाठी जरी झाले असले, तरी असे प्रमाणीकरण व्हावे, ही संकल्पना युरोपच्या भाषिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेशी जवळीक साधताना आपल्याला दिसते.

भाषिक निर्वसाहतीकरणाचा विचार करताना, भाषा आणि राष्ट्र यांमधील संबंधांचा पुनर्विचार आणि या चिंतनाचेच निर्वसाहतीकरण याची प्राधान्याने आवश्यकता आहे. भाषावार प्रांतरचनेचा अवलंब करून आपण स्वातंत्र्यानंतरचे पहिले पाऊल चुकीच्या दिशेने टाकलेलेच आहे. परंतु, यापुढील मार्गक्रमणेत भारतीय भाषांच्या अभिव्यक्तीतील समानतेवर भर देऊन त्यांच्यातील परस्परसंवाद वाढवण्यावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘मातृभाषेत शिक्षण’ हे तत्त्व आज सर्वमान्य आहे आणि आपल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्टही केलेले आहे. मात्र, भाषा आणि भाषाशिक्षण याकडे आज संवादकौशल्याचे साधन इतया मर्यादित अर्थाने पाहिले जाते. भाषाशिक्षण म्हणजे, त्या भाषेतील समृद्ध साहित्यपरंपरेचे आणि भाषाशास्त्रविषयक व्याकरणादि विचारांचेही शिक्षण. स्वभाषेचे पक्के सर्वांगीण ज्ञान झाल्यावर आपल्या भाषाकुलातील अन्य भाषाभगिनींचेही आपले ज्ञान स्वाभाविकपणे वाढते आणि त्या भाषांच्या अभिव्यक्तीच्या आशयातील अभिन्नत्व ध्यानात येऊ लागते. स्वभाषेचे ज्ञान मर्यादित राहिल्यास हे आशयातील अभिन्नत्व कसे जाणवू शकेल? आणि अशा जाणिवेच्या अभावातून प्रांतवाद, सीमावाद आणि भिन्न राष्ट्रवाद हेच अंतिमतः निर्माण होणार.

हा सर्व विचार ध्यानात घेता, भाषिक निर्वसाहतीकरणाचे काही आयाम आपण निश्चित करू शकतो. सर्वप्रथम म्हणजे, स्वभाषेचा अभ्यास आणि वापर. सामान्यातिसामान्य व्यवहारापासून उच्च श्रेणीच्या भाषा व्यवहारांमध्ये स्वभाषेचा वापर वाढल्याशिवाय भाषिक निर्वसाहतीकरण शय नाही. स्वभाषेच्या वापरात प्रमाणभाषेचा आग्रह अजिबात न धरणे आता अशय आहे. पण, प्रमाणभाषेस अन्य बोलींपेक्षा श्रेष्ठ न समजणे भावाच्या भारतीय प्रकटीकरणासाठी आवश्यक आहे. हा अभ्यास वाढल्यावर स्वाभाविक घडणारी गोष्ट म्हणजे, आपल्या भाषाभगिनींचे अधिक समृद्ध आकलन आणि त्याचबरोबर संस्कृत भाषेचेही अधिक समृद्ध आकलन. हा दुसरा आयाम सहजसाध्य स्तराच्या पुढे जाऊन समाजाच्या किमान काही वर्गाची भाषिक जाण प्रयत्नपूर्वक अधिक समृद्ध करणे असा असेल. हिंदू संस्कृतीच्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनात्मक विषयांचे प्रकटीकरण आणि ग्रहण किंवा आकलन आग्रहाने भारतीय भाषांच्या माध्यमातूनच करणे आणि भाषांतर न करता मूळ शब्द तसेच वापरून संकल्पनात्मक गोंधळ टाळणे, हा तिसरा आयाम असेल. या तिसर्या आयामाचे प्रभावक्षेत्र हे केवळ ‘भारतीय समाज’ असे न ठेवता, ‘जागतिक विमर्श’ या आयामाच्या अंतर्गत प्रयत्नपूर्वक बदलावा लागेल. हे तिन्ही आयाम क्रमागत नसून एकाच वेळी विभिन्न स्तरांवर आपल्याला चालवावे लागतील. जसजसे आपण या दिशेने पुढे मार्गक्रमण करू, तसे कदाचित अधिकचे आयामही ध्यानात येतील. या सर्व आयामांवर सतत काम करीत राहावे लागेल. भाषिक निर्वसाहतीकरण हे सांस्कृतिक व वैचारिक निर्वसाहतीकरणासाठी एक विस्तृत राजमार्ग बनवण्याचे कार्य आहे.


डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
९७६९९२३९७३