भारत-अमेरिका या दोघांमधील व्यापार करारामधील एक अडसर ठरलेल्या ‘जनुकीय बदल केलेल्या बी-बियाणांना’ भारताचा असणारा तीव्र विरोध हे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे. अमेरिका त्यांच्या शेतमालाची आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राची भारताला होणारी निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, जनावरांना जनुकीय बदल केलेल्या पिकांचे खाद्यान्न म्हणून पुरवायला भारताचा प्रखर विरोध आहे. या जनुकीय बदल केलेल्या (जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स) बी-बियाणांचे मानवी शरीरावर होणारे विपरीत परिणाम कोणते याचा घेतलेला हा आढावा... पश्चिमी देशांमध्ये बियाणांमध्ये जनुकीय बदल करून, उत्पादित केली जाणारी धनधान्ये आणि बियाणे यांचे फायदे कोणते यांचा विचार केल्यास, अशा बियाणांमुळे प्रचंड उत्पादन होते, असे त्याचे उत्पादकच सांगतात. या बियाणांमुळे जी रोपे तयार होतात, त्यांच्यावर कीड अथवा रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याने होणारे नुकसान टाळता येते.
जगाच्या वाढणार्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविताना अडचण येऊ नये, म्हणून जनुकीय सुधारित बियाणांची निर्मिती होते, असा दावा या बियाणांच्या उत्पादक कंपन्यांचा असतो. मात्र, याला विरोध करणार्यांचा दावा असा आहे की, जर कीटकांना हे खाण्यायोग्य वाटत नसेल, तर ते मनुष्य प्राण्याला खाण्यायोग्य कसे? हा अत्यंत तार्किक आणि अनुत्तरित प्रश्न आहे. या जनुकीय सुधारित बियाणातून उत्पादित अन्नधान्यांमुळे, मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वे मिळत नसतील, तर या अशा उत्पादित खाद्यपदार्थांचा उपयोग काय? अनेक शास्त्रज्ञांनी अशा बियाणांचा मानवावर होणार्या सांभाव्य परिणामांबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केलेली आहे.
पण, अमेरिका आणि इतर पश्चिमी देशांना हेच बियाणे इतर देशांना विकण्यात बराच रस दिसतो. दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि शेतकर्यांच्या आत्महत्या यावर ‘जेनेटिकली मॉडिफाईड फूड’ अर्थात ’जीएम फूड’ उतारा ठरेल, असा अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे. अमेरिकेत अशी ’जीएम फूड’ सर्रास वापरले जाते. यामुळे अमेरिकेत लठ्ठपणाची व्याधी पसरलेली आहे, त्यामागे हे अन्न कारणीभूत आहे का? हा एक संशोधनाचा विषय आहे. सोयाबीन, बटाटे, वांगी, पपई, सफरचंद, अननस ही जनुकीय बदल करून, अमेरिकेमध्ये उत्पादित करण्यात येणारी वानगीदाखल काही फळे.
पिढ्यानपिढ्या माणसाच्या खाद्यान्नाच्या सवयी प्रस्थापित झालेल्या आहेत. साल १९९९च्या अखेरपर्यंत, अमेरिकेत फक्त दोन ते तीन खाद्यान्नेच ही जनुकीय बदल केलेली होती. अमेरिकेत सेंद्रिय अन्न आणि ’जीएम फूड’ हे वेगळे दर्शविले जात नाही. युरोपियन देशांचा आग्रह असा आहे की, ’जीएम फूड’ उत्पादनांना वेगळे लेबल लावले जावे; जेणेकरून ग्राहकांना त्याची माहिती व्हावी. ‘मोन्सेन्टो’सारख्या अमेरिकेतील बियाणांच्या उत्पादनातील अग्रेसर कंपनीने,या ’जीएम’ बियाणांच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून, उत्पादनातही आघाडी घेतली आहे. याला जैव अभियांत्रिकी हा शब्दप्रयोग वापरला जातो. थोडयात ‘टेलर मेड’ जनुकीय बदल असे म्हणता येते.
डेव्हिड फ्लेमिंग हे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांनी या ’जीएम’ बियाणांच्या उत्पादनाबद्दल शंका व्यक्त केली आहे. जनुकीय फेरफार हे अनावश्यक असून ते अपायकारकच ठरू शकतात, असे ते सांगतात. नाथन बटालियन हे याच क्षेत्रातील दुसरे शास्त्रज्ञ, तर या जैवतंत्रज्ञानावर टीका करताना हे तंत्रज्ञान अणु तंत्रज्ञानापेक्षाही धोकादायक असल्याचे म्हटले आहे. याच बटालियन यांनी अशा ’जीएम’ बियाणांमुळे होणार्या विपरीत परिणामांची यादीच केली. अशा बियाणांमुळे फक्त मानवी आरोग्यच नव्हे, तर शेतजमीन, पर्यावरण, राजकीय, सामाजिक परिणाम संभवतात असे ते सांगतात. तसेच, नवनवीन विषाणू, जिवाणू यांची व्युत्पत्ती ते विविध ऍलर्जी पुढे येऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. निसर्गचक्राशी होणार्या या खेळामुळे, अनेक विपरीत गोष्टी समोर येऊ शकतात. शेतकर्यांनी फक्त या ’जीएम’ बियाणांपासून मिळणार्या वाढीव उत्पादकतेवर लक्ष न ठेवता, गुणवत्तेवर प्रामुख्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
अमेरिकेत गायींच्या दूधात वाढ होण्यासाठी, एक ’जीएम ’ हार्मोन गायीला टोचण्यात आले. पण, शास्त्रज्ञांनी यामुळे विविध कर्करोग मानवाला होण्याचा इशारा दिला. जॉर्ज वौल्ड या ‘नोबेल’ विजेत्या आणि औषधशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तीने, या हार्मोनमुळे एखादा विचित्र प्राणीही जन्माला येण्यचाही इशारा दिला होता. वनस्पतींमध्ये एखादा नवीनच रोग उद्भवू शकतो, असे त्याने सांगितले होते.
भारताच्या बाजारपेठेचा प्रचंड आकारमान बघता, अमेरिकेतील कंपन्यांना त्याची भूल पडली असल्यास नवल नाही. अमेरिकेत अशा ’जीएम’बी-बियाणांच्या यादीत मका, सोयाबीन, कापूस बियाणे अग्रेसर आहेत. ‘मोन्सॅन्टो’ वगळता या अशा बी-बियाणांच्या उत्पादन क्षेत्रात ‘ड्यूपॉन्ट’, ‘फार्मासिया’, ‘सिंजेंटा’, ‘डो केमिकल्स’, ‘अव्हेन्टिस’ ही इतर प्रसिद्ध कंपन्यांची नावे समोर येतात. या कंपन्यांची अनेक पेटंट्सही आहेत. या कंपन्यांकडून बियाणे विकत घेणार्या शेतकर्याला, या कंपन्यांसोबत करार करावे लागतात. ही बियाणे त्या शेतकर्याला, थेत बाजारातून विकत घेता येत नाहीत. या विदेशी कंपन्यांचे भारतातील कंपन्यांशी करार आहेत पण, त्या कराराची व्याप्ती काय याची कोणाला कल्पना नाही.
अमेरिकेकडून तेथील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते. यामुळे अमेरिकेतील दूध आणि कृषी उत्पादनाशी, भारतीय उत्पादक स्पर्धा करू शकणार नाहीत. त्यामुळे भारतीय उद्योजकांना संरक्षण देणे, हे भारत सरकारचे प्रथम कर्तव्य असेल हे निश्चित! त्यामुळे अमेरिकेने कोणत्याही प्रकारे भारतावर दबाव आणला, तरी भारताने त्या दबावापुढे झुकता कामा नये. भारताला खिजवण्यासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानला प्रचंड मदत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण, तरीही भारताने व्यापार करारातील आपल्या अटींवर ठाम राहणे गरजेचे असणार आहे.
मयाच्या पिकाचे भारतातील सरासरी हेटरी उत्पादन आहे १ ते १.२५ टन, तर अमेरिकेतील हेच मयाचे हेटरी उत्पादन ३.५ टन आहे. जर भारताला अमेरिकेच्या जनुकीय सुधारित मयाचे भारतात उत्पादन घेऊन,त्याचा वापर इथेनॉलसाठी करावयाचा असेल तरच त्याचा विचार करता येऊ शकतो. तसेच, सोयाबीनचे अमेरिकेतील हेटरी उत्पादन ३.५ टन आहे, तर भारतातील हेच उत्पादन दोन ते जास्तीत जास्त २.५ टन. हीच गोष्ट कापसाच्या प्रतिहेटरी उत्पादनाची. भारतात प्रतिहेटर ४५० किलो उत्पादन निघते, तर अमेरिकेत हेच उत्पादन प्रतिहेटरी ९०० ते एक हजार किलो निघते. कापसाच्या बियांमधून निघणारे तेल वगळता, बाकीचा चोथा जनावरांना खाद्य म्हणून देतात. याचा जनावरांवर होणारा विपरीत परिणाम याचा निष्कर्ष आलेला नाही. ‘जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रेजल कमिटी’ आणि पर्यावरण मंत्रालय, या दोघांनी यासाठीची मान्यता द्यावी. जर या आयातीमुळे भारतातील स्थानिक विक्री किमतीवर परिणाम होणार असेल, तर भारताने आयातीची परवानगी देऊच नये.
साल २०१७ मध्ये ‘सिंजेंटा’ या बहुराष्ट्रीय कंपनीवर चीनमधील ‘केम चायना’कडून ताबा घेण्यात आला. स्वित्झर्लंडची जगप्रसिद्ध महाकाय संकरित बियाणे कीटकनाशक बनविणारी कंपनी ‘सिंजेंटा’, तब्बल ४४ अब्ज डॉलर्स देऊन ‘केम चायना’ने विकत घेतली. ‘सिंजेंटा’ ही युरोपातील संकरित बियाणे व कीटकनाशके बनविणारी कंपनी असून, या कंपनीत जगभर एकूण हजारो लोक काम करतात. ‘सिंजेंटा’कडे कृषी संशोधन क्षेत्रातील १३ हजार पेटंट आहेत. आता ‘केम चायना’ला जागतिक पातळीवर स्पर्धा आहे ती, ‘ड्यूपॉन्ट’ व ‘बायर एजी’ या तुल्यबळ कंपन्यांची. ‘डो केमिकल’ या जगप्रसिद्ध कंपनीवर ‘ड्यूपॉन्ट’ने ताबा मिळविल्याने व ‘बायर एजी’ने ‘मोन्सॅन्टो’वर ताबा मिळविल्याने, या दोन्ही कंपन्यांचे मोठे तगडे आव्हान ‘केम चायना’ पुढे असणार आहे. ‘केम चायना’ने फ्रान्स, ब्रिटन, इस्रायल, जर्मनी व इटली येथील नऊ इतर कंपन्याही विकत घेतल्या आहेत.
गेली काही वर्षे चीन हा जागतिक बी-बियाणे कंपन्यांवर, कब्जा मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्या प्रचंड लोकसंख्येची भविष्यातील अन्नाची गरज भागविण्यासाठी, चीनचा हा आटापिटा सुरु आहे. अन्न सुरक्षातज्ज्ञ रॉब बेले यांच्या मतानुसार, शेतीवर अवलंबून असणारा व शेतीमध्ये काम करणारा बहुतांश चिनी माणूस, हा पन्नाशीपुढचा असून त्यासोबतच वाढत जाणारे हवा व पाण्याचे प्रदूषण, मातीचे वाढणारे क्षपण ही मोठी आव्हाने आहेत.
कापूस बियाणांना भारतात यापूर्वीच व्यावसायिक उत्पादनासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगतात. पण, जनुकीय बदल केलेले सोयाबीन आणि मका हे गायी आणि म्हशी यांसारख्या जनावरांना खाद्यान्न म्हणून देण्यात यावे, यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत यांचा जनावरांसाठी (पान ५ वरुन) खाद्यान्न म्हणून सर्रास उपयोग केला जातो. पण, यामुळे जनावरांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम काय असू शकेल, याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घेणे आवश्यक आहे. भारतातील शेतकर्यांना आपली पारंपारिक बियाणे जपून ठेवण्याची सवय आहे. त्याच्या उपलब्धतेसाठी कोणत्याही विदेशी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
पण, या आयात बियाणांचा विचार करता, प्रत्येक वेळेला शेतकर्याला ही बियाणे या कंपन्यांकडूनच विकत घ्यावी लागतील. ही ‘बी-बियाणे’ ही नवीन रोपांना जन्म देऊ शकत नाहीत. भारतात ७० टक्के ग्रामीण शेती आहे. तेथील शेतकर्यांना दरवेळी बियाणांसाठी या परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागेल. या कंपन्यांची या क्षेत्रावर सर्वच बाबतीत मक्तेदारी निर्माण होईल, ते वेगळेच. सदा सर्वदा शेतकर्यांना या कंपन्यांच्या आधीन राहावे लागेल, हेही नोंद घेण्याजोगेच. अमेरिका आणि भारत यांच्यामधील व्यापार करारातील या अशा ’जीएम‘ बी-बियाणांच्या खरेदीला भारताने सपशेल नकार दिलेला आहे. या मुद्द्यावर भारताने कोणत्याही प्रकारे समझोता करण्यास नकार दिल्याचे समोर येते आहे, जे कौतुकास्पद आहे. बांगलादेश आणि अनेक गरीब आफ्रिकी देशांना अशी बियाणे विकण्यात अमेरिकेला यश मिळते आहे.
शेती उद्योग हा जागतिक स्तरावरच संकटांनी भरलेला उद्योग आहे. शेतीतील गुंतवणूक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांची सांगड बघता, इतर उद्योगांपेक्षा हा उद्योग आडबट्याचा असल्याचे अनेक शेतकरी सांगतात. यामुळे नावीन शेतकरीही तयार होत नाहीत. परिणामी शेतीतील उत्पादकताही कमी झालेली आहे. वंशाने चालत आलेली शेती करणारेच शिल्लक आहेत आणि त्यातीलही अनेक या व्यवसायातून बाहेर पडू इच्छितात. हे कमी म्हणून की काय, शेती व्यवसायातील तरुणांची लग्ने जमणेही अतिशय अवघड झाले आहे. शेती उत्पादनाची वाहतूकही महाग झाली असून, काहीवेळा उत्पादित पदार्थांच्या बाजारभावापेक्षा वाहतूक खर्चच जीवघेणा ठरतो. त्यामुळे छोट्या शेतकर्यांना शेती करणे अतिशय अवघड झालेले आहे. अमेरिका, कॅनडा आणि इतर युरोपातील देशांमध्ये अनेक मोठी बिजिनेस हाऊसेस, या शेती व्यवसायाकडे वळलेले दिसतात. शेकडो एकर जमिनींतून यांत्रिकीकरणातून मोठे उत्पादन घेण्याची स्पर्धा लागलेली दिसते. नफ्याला महत्त्व दिल्याने भविष्यात यातून उत्पादित पदार्थांच्या किमती अवाच्या सव्वा वाढतील, हे वेगळे सांगणे न लगे.
संपूर्ण जगातील वाढतच जाणार्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवायचे कसे, यावर अमेरिकेत चर्चासत्रे होतात. अगदी कोणते कीटक कसे खाल्ले असता त्यामधून कोणती प्रथिने मानवाच्या शरीराला मिळतात, यावर अमेरिकेत जोरदार जाहिरातबाजी चालू आहे. त्यामध्ये हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रीही याचा प्रचार करताना दिसतात. मध्यंतरी अँजेलिना जोली ही अभिनेत्री कीटक आणि कृमी यांच्याकडे खाद्यान्न म्हणून बघितले पाहिजे, अशी जाहिरात करताना दिसल्या होत्या. अमेरिकेत अनेक फूड मार्केटमध्ये कीटक आणि कृमी पॅकबंद स्थितीत विक्रीला उपलब्ध केलेले दिसतात. इराक युद्धावर अमेरिकेने जेवढा खर्च केला, त्या पैशामध्ये गरीब देशांमधील जनतेला पाच वर्षे खाद्यान्न पुरविता आले असते, असा दावा अमेरिकेतील युद्धविरोधी गटाने केलेला दिसतो. पुढील २० वर्षांमध्ये जगाची लोकसंख्या सुमारे १७० कोटींनी वाढेल, असे सांगितले जाते आणि त्यातही आशियातील देशांचा यात मोठा सहभाग असावयाची शयता आहे.
सनत्कुमार कोल्हटकर