
भारतामध्ये रिलिजन आणि धर्म या दोन्ही एकच संकल्पना असल्याचे म्हटले जाते. मात्र, वास्तव तसे नाही. पाश्वात्य देश अथवा अब्रहामिक रिलिजन आणि हिंदू धर्म यांच्यातील फरक हे मूलत: असून, हेच समजून सांगण्याची गरज आज निर्माण झाली आहे. या फरकांचा घेतलेला आढावा...भाषा आणि भाषांतराचा प्रश्न पाहताना ज्या संकल्पना सर्वाधिक अभाषांतरणीय वाटतात, त्या बहुतांशाने हिंदूंच्या धर्मसंकल्पनांशीच निगडित आहेत. भारतीय तत्त्वज्ञानातील अनेकानेक संकल्पनांना जसे इंग्रजी भाषेत भाषांतरित करता येत नाही असे आपण म्हणतो, त्याच न्यायाने युरोपातील रिलिजन संबंधातील कल्पना भारतीय मनासाठी परकीय ठरतात. मात्र, आपल्या संस्कृतीत उगम झालेल्या शब्दांच्या परकीय भाषेतील योग्य आकलनाविषयी आपण जितके जागरूक असतो, तितके आपण त्यांच्या संकल्पनांचा वापर आपल्या भाषेत करताना नसतो. वसाहतवादाचा एक प्रमुख परिणाम म्हणजे, परकीय संकल्पनांचा स्वभाषेत संदर्भहीन वापर आणि त्यामुळे हळूहळू स्वकीय संस्कृतीतील संदर्भांची विस्मृती. अशा सर्व विसंवादी संदर्भांचा मूळ स्रोत म्हणजे ‘रिलिजन’ ही संकल्पना.
रिलिजन या शब्दासाठी आपण पर्याय म्हणून भारतीय भाषांमध्ये ‘धर्म’ शब्द वापरतो. धर्म या शब्दाची त्याहून फार मोठी असलेली व्याप्ती मान्य करूनही, रिलिजनसाठी आपल्याला अन्य दुसरा योग्य शब्द सापडत नाही. पंथ, उपासनापद्धती, संप्रदाय, मत असे शब्द कित्येकदा वापरले जातात परंतु, ते रिलिजन शब्दाचा भाव सर्वांगाने व्यक्त करतात असे नाही. रिलिजन या संकल्पनेत आपण कशाकशाला बसवतो, याचे उत्तर तसे सोपे वाटते. हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, शीख, बौद्ध असे विविध रिलिजन आहेत, अशी आपली अज्ञानमूलक समजूत असते. भारताव्यतिरिक्त अन्य जगात ‘निसर्गपूजा’, ‘पितरपूजा’ मानणारे रिलिजन असल्याचे म्हटले जाते. या सर्व रिलिजनमध्ये त्यांना एकाच माळेत ओवावे असे नेमके काय साम्य आहे असा विचार केल्यास, अतिमानवी शक्तींबद्दलची कल्पना, त्यांच्या स्वरूपाविषयी आणि कार्याविषयी विचार आणि त्यांच्या उपासनेची आवश्यकता आणि त्यासाठीचे मार्ग हे ठळक बिंदू लक्षात येतात. या अतिमानवी शक्तींना आपण भारतीय सामान्यतः ‘देव’ असे संबोधतो मात्र, यातील प्रत्येक बिंदूविषयी सखोल विचार केल्यास, हे साम्य इथेच संपते हे आपल्या ध्यानात येते. पर्वत, नद्या, वृक्ष, प्राणी यांची पूजा करणारे आफ्रिकेतील निसर्गपूजक, आपल्या मृत पूर्वजांची पूजा करणारे जपानी पितरपूजक, पारशी अग्निपूजक आणि या सर्वांचीच ‘सर्वांभूती ब्रह्म’ मानून पूजा करणारे हिंदू या सर्वांचा संकल्पनात्मक देव वेगळा तर आहेच; पण तो अब्राहमिक रिलिजनच्या आकाशातील बापापेक्षाही खूप वेगळा आहे. या सर्व देवगणांची कार्ये वेगवेगळी आहेत. जशा माणसांच्या देवांकडूंच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, तशा देवांच्याही माणसांकडूंच्या अपेक्षा वेगळ्याच आहेत.
देवांच्या अपेक्षेतील सर्वांत महत्त्वाची अपेक्षा श्रद्धेची. ख्रिस्ती किंवा महंमदी रिलिजनमध्ये, ईश्वरावरील श्रद्धा ही पहिली पायरी आहे. ईश्वरावर, त्याने पाठवलेल्या प्रेषितावर आणि त्या प्रेषिताने वितरीत केलेल्या ईश्वराच्या अपरिवर्तनीय संदेशावर श्रद्धा, ही या रिलिजन्सची प्राथमिक तत्त्वे आहेत. अशा प्रकारची श्रद्धा हा भारतीयांसाठी उपासनेचा मूळ पाया नाही. बुद्धी आणि तर्कप्रामाण्याला त्यांच्या सुसंगत अंतबिंदूपर्यंत नेणे, हे हिंदूंसाठी स्वाभाविक आहे आणि अशा मांडणीत ईश्वरावर अविश्वास जरी दाखवला गेला, तरी ते योग्य मानले जाते. आपले धर्मनिहित कर्म पूर्ण करण्याला भारतात महत्त्व आहे, त्यावर केवळ श्रद्धा असण्याला नाही. याउलट रिलिजनमध्ये श्रद्धेला महत्त्व आहे, ते व्यक्त करण्याच्या विशिष्ट कर्मांना नाही. रिलिजन संकल्पनेतील श्रद्धा ही देवापुरती सीमित नाही, तर ती देवाच्या प्रेषितांद्वारे दिलेल्या देवाच्या संदेशावरही आहे. विशिष्ट संदेशावरील अविचल श्रद्धा ही अब्राहमिक पंथांमधील भेद दर्शवते. हा संदेशग्रंथ ईश्वरीय कार्याचे वर्णन आणि मानवाचे कर्तव्य यासाठी त्या रिलिजनकरिता संदर्भग्रंथाचे काम करतो. त्यामुळे रिलिजन हीच नीतिशास्त्राची पूर्वपीठिका बनते. भारतात धर्म शब्दाचा अर्थ जेव्हा कर्तव्य आणि न्याय यासंदर्भात घेतला जातो, तेव्हा त्यात तर्कविचार आणि सामाजिक शास्त्राचा विचार अंतर्भूत असतो. परंतु, हे आयाम ध्यानात न घेताच, रिलिजन धर्माची जागा अप्रत्यक्षपणे याही क्षेत्रात घेतो. श्रद्धा संकल्पनेची अजून एक बाजू म्हणजे, अश्रद्ध लोकांविषयीचा विचार. हिंदूंचा ईश्वर प्राणीमात्रांनाही आपलेसे करतो, तर रिलिजनचा ईश्वर माणसांच्यातच सश्रद्ध आणि अश्रद्ध असा भेद करतो आणि अश्रद्धांना शिक्षा देतो. इथे अश्रद्ध लोकांची वर्तणूक चांगली आहे का वाईट, हा प्रश्नच लागू नाही. कारण, रिलिजनवर श्रद्धा न ठेवता केलेले कोणतेही वर्तन मुळात चांगले असूच शकत नाही. चांगलेपणाची मोजपट्टीच, संदेशग्रंथातील ईश्वरीय संदेशाचे पालन अशी आहे.
रिलिजन शब्दाचे भारतीय संदर्भातील अन्वयार्थ पाहण्यापूर्वी, या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी आधी जाणून घेऊ. रिलिजन शब्दाचे मूळ रोमन ’रिलिजिओ’ या शब्दात आहे परंतु, या शब्दाचा रोमन लोकांना अभिप्रेत अर्थ होता परंपरा. रोमन समाजात अनेक देवता प्रचलित होत्या आणि प्रत्येक देवतेची पूजा करणारा एक समाज होता. राज्यकर्त्यांसहित कोणत्याही समाजास आपलाच देव श्रेष्ठ असे वाटत नसे कारण, देवांतील श्रेष्ठत्व ठरवण्याची क्षमता मानवांमध्ये नाही, यावर सर्व समाजांचे एकमत होते. प्रत्येक समाजाची आपल्या देवतेच्या उपासनेची विशिष्ट परंपरा होती आणि त्यासच ‘रिलिजिओ’ म्हणत असत. ख्रिस्ती समाजास या व्यवस्थेत स्थान नव्हते कारण, त्यांना परंपरा नव्हती. या परंपरेच्या प्रश्नावर मात करण्यास त्यांनी सत्यधर्माचा दावा केला. ‘तुमचा रिलिजिओ पारंपरिक आहे का?’ या प्रश्नाचे आकलन रोमनांना होऊ शके पण, ‘तुमचा रिलिजिओ सत्य आहे का’ या प्रश्नाचे आकलन त्यांच्या कल्पनेबाहेर होते. परंपरांऐवजी सत्यतेच्या दाव्याचा आधार घेऊन ‘आमचाही वेगळा रिलिजिओ’ अशी मागणी करणार्या ख्रिस्ती पंथीयांनी त्यांची बहुसंख्या झाल्यावर मात्र, सहिष्णुतेच्या तत्त्वाचा बळी देऊन इतर सर्व रिलिजिओंचा उच्छेद करून, केवळ आपल्या ‘सत्य’ पंथाला प्रस्थापित केले.
सत्य धर्माच्या दाव्यात ख्रिस्ती रिलिजनचा प्राचीनतेचा दावा अंतर्भूत होता. नोहाच्या वंशातील लोकांना प्राचीन काळी सत्य रिलिजन प्राप्त झाला होता. कालवशात या सत्य रिलिजनचा विसर पडून आणि सैतानाने दाखवलेल्या आमिषांना बळी पडून, जगाच्या पाठीवरील अनेक देश हे दिग्भ्रमित झाले आणि त्यांनी मिथ्या देवतांची उपासना सुरू केली. या सर्व राष्ट्रांना सत्य मार्गावर आणणे हे ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे कामच आहे, या भावनेने युरोपातील देशांमधून जगभरात धर्मोपदेशक रवाना झाले. इसवी सनाच्या सुरुवातीस रोमन साम्राज्यातून निघून युरोपभर पसरलेल्या ख्रिस्ती धर्माच्या पहिल्या लाटेनंतर साधारण एक सहस्र वर्षांनी, उर्वरित जगास पादाक्रांत करण्यासाठी ख्रिस्ती धर्माची दुसरी लाट निघाली. ज्या उपायांचा प्रयोग त्यांनी रोमन लोकांवर केला होता, तेच त्यांनी उर्वरित जगावर करून पहिले. हे उपाय म्हणजे सर्वसामान्यांवर जबरदस्ती आणि प्रतिष्ठित नेतृगणांचा बुद्धिभेद. पहिल्या उपायातील क्रौर्याचा परिचय बरेचजणांना असेल पण, त्या क्रौर्याचे तात्त्विक समर्थन कोणी फारसे करणार नाही. त्याउलट बुद्धिभेद हा थोडा मंदगतीचा, पण अधिक परिणामकारक उपाय होता. आपल्या वैचारिक दास्याचे मूळ हे एक प्रकारे या रिलिजनने केलेल्या बुद्धिभेदात आणि भारतीय चिंतनाशी असलेली त्याची विसंगती योग्य वेळी न ओळखण्यात आहे.
बुद्धिभेदाच्या योजनेत ख्रिस्ती रिलिजनच्या लोकांनी दोन मार्गांचा प्रभावी वापर केला. पहिले म्हणजे हिंदूंच्या ईश्वर संकल्पनांमधील आंतरिक विसंगतीचे सतत प्रदर्शन. या मार्गाला सुरुवातीस विशेष यश आले नाही कारण, या विसंगतींचा हिंदू समाजास पूर्ण परिचय होता आणि त्यांच्यातील संकल्पनात्मक ऐयाचाही. त्यामुळे बाह्य विसंगतींचा यथार्थ वापर नित्यकर्मांच्या नेमकेपणासाठी कसा करायचा, हे त्यांना अवगत होते. परंतु, जसजसे इंग्रजी शिक्षणामुळे हे आकलन समाजात कमी होत गेले, तसतसे या विसंगती अधिक भेदमूलक होऊ लागल्याचे आपल्याला जाणवते. दुसरा मार्ग म्हणजे हिंदूंच्या उपासनाव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणजे ब्राह्मण, त्याचे चारित्र्यहनन. सुरुवातीच्या काळातील अनेक युरोपीय प्रवासी आपल्याला भारतीय भाषा नीट अवगत नसल्याचे कबूल करतात आणि पुढच्याच परिच्छेदात, ब्राह्मणांच्या चारित्र्यहीनतेवर टीका करतात. या सर्व प्रवासवर्णनांत सत्यता किती माहीत नाही परंतु, आजच्या घडीला समाजमाध्यमांतून हिंदू पुजारीवर्गावर होणार्या टीकेचे मूळ यात आहे. आज समाजात पुजारी किंवा पुरोहित वर्ग केवळ दक्षिणेचा लोभी, हेकट आणि कालबाह्य मतांना चिकटून राहणारा आणि समाजावर अयोग्य पद्धतीने वर्चस्व गाजवू पाहणारा अशी काहीशी प्रतिमा आहे, ती या सुरुवातीच्या काळात ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी केलेल्या प्रतिमाभंजनामुळे आहे.
नोहाच्या कथेत सांगितल्याप्रमाणे, पथभ्रष्ट समाजांना सत्यमार्गावर आणणे ख्रिस्ती समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे ख्रिस्ती रिलिजनमध्ये मतांतरण हे त्यांचे प्राथमिक लक्ष्य आहे. ख्रिस्ती समाजाने जगभर स्थापन केलेल्या वसाहतींमध्ये, आग्रहाने स्थानिक परंपरा नष्ट करून तिथे ख्रिस्ताचा संदेश पोहोचवणे हेच त्यांचे प्राथमिक कार्य बनलेले आहे. महंमदी रिलिजनची तत्त्वे जरी बहुतांश सारखी असली, तरी त्यात बुद्धिभेदाच्या मार्गाचा विशेष वापर होत नाही. परंतु, सत्य संदेशाच्या नावाखाली परंपरांना नष्ट करणे दोन्हीत सामायिक आहे. स्थानिक विचारांना नष्ट करून त्यांचे विचार जेत्या राष्ट्राप्रमाणे घडवणे, हा विचार जसा आपल्याला वसाहतीकरणाच्या धोरणात दिसतो, तसाच तो रिलिजनमध्येही अंतर्भूत आहेच. युरोपीय लोकांच्या वंशश्रेष्ठत्वाचे मूळ एक प्रकारे त्यांच्या सत्य-रिलिजन संकल्पनेत आहे. त्यामुळेच वैचारिक निर्वसाहतीकरणाचा मार्ग रिलिजन आणि तत्सम युरोपीय संकल्पनांच्या यथार्थ आकलनातून जातो.
डॉ. हर्षल भडकमकर