मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून सुरु झालेल्या सुनावणीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ''मी आमदार अपात्रता प्रकरणात काही कायदेतज्ञांशी चर्चा केली असून आवश्यकता पडली तर दोन्ही गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनाही सुनावणीसाठी बोलावले जाईल,'' असे नार्वेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरेंनाही सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली जाऊ शकते हे स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठवड्यात विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या सुनावणीनंतर शिवसेनेच्या आमदारांना दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. या घटनाक्रमात राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी संध्याकाळी दिल्ली दौरा देखील केला होता. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी प्रतिक्रिया देत सुनावणीची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.
नार्वेकर म्हणाले की, ''माझा दिल्ली दौरा हा पूर्णपणे पूर्णपणे पूर्वनियोजित होता. या दौऱ्यात मी काही कायदेतज्ञांशी चर्चा केली असून त्यात अपात्रता प्रकरणाची चर्चा झाली. येत्या आठवड्यात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून विधिमंडळ याबाबत योग्य ती पाऊले उचलत आहे. या प्रकरणाचे जे काही प्रक्रियात्मक पैलू असतील त्याबाबतही निर्णय घेतली जातील,'' असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.