मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता धनगरांच्या आरक्षणाच्या प्रश्नी राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. दरम्यान, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर गुरुवार, दि. २१ सप्टेंबर रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या बैठकीस धनगर समाजाची काही नेतेमंडळी देखील समाजाचे प्रतिनिधी म्हणून हजर असतील. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ राज्यात धनगर आरक्षणानेही उचल खाल्ली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली असून दि. २१ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर याबाबत चर्चा होणार आहे.