चेन्नई : तमिळनाडू पोलीसांनी युट्यूबर मनीष कश्यपला बिहारला नेले आहे. त्याला बेतियातील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पश्चिम चंपारणमधील माझौलिया येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाशी गैरवर्तन आणि कार्यालयीन कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सुनावणी सुरू आहे.SDPO महताब आलम यांनीही याच प्रकरणात मनीष कश्यपला तमिळनाडूहून बेतियाला आणण्यात आल्याची पुष्टी केली आहे. त्याच्यावर तमिळनाडूमध्ये एनएसए अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
यावेळी मनीष कश्यपच्या समर्थकांनी बेतियात त्याचे जोरदार स्वागत केले. पोलिसांनी रेल्वे स्थानक ते न्यायालयापर्यंत कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी समर्थकांनी मनीष कश्यपवर फुलांचा वर्षाव करून त्याचेस्वागत केले. तमिळनाडू पोलीस सप्तक्रांती एक्सप्रेसने मनीष कश्यपसोबत बिहारमध्ये पोहोचले. स्टेशनवर त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. मनीष कश्यपला मदुराई येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
मनीष कश्यपसोबत तामिळनाडू पोलिस बेतिया येथे पोहोचताच 'मनीष कश्यप जिंदाबाद' आणि 'मनीष कश्यपला सोडा'च्या घोषणा देण्यात आल्या. त्याला एसपी कार्यालयात नेण्यात आले आणि त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. एसपी ऑफिसच्या बाहेरही युट्यूबरची एक झलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली दिसली. मनीष कश्यपवर बेतिया येथे ७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ५ गुन्ह्यांमध्ये आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी कोर्टाने त्याला ४ वेळा हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तमिळनाडू पोलीस त्याला घेऊन पोहचले नाहीत. मनीष कश्यपने तमिळनाडूमध्ये बिहारी लोकांविरुद्धात हिंसाचार केला जात असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ तयार केला होता. बेतियाला पोहोचलेल्या मनीष कश्यपच्या कुटुंबीयांनीही त्यांची भेट घेतली. एसपी कार्यालयाभोवती अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मनीष कश्यपच्या समर्थकांनी बिहार सरकार सूडाच्या भावनेने काम करत असल्याचा आरोप केला आहे.