मुंबई : १७ वर्षीय ईश्वर मारवाडीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी ३२ वर्षीय शफीफ अहमद अब्दुल मलिक शेख उर्फ शफी शेख याला अटक केली आहे. २८ ऑगस्ट रोजी त्याने पत्नीचा मानलेला भाऊ असणाऱ्या ईश्वरचा विळ्याने वार केला होता. इतकेच काय तर त्याच्या शरीराचे तुकडे करून घराच्या स्वयंपाकघरात विल्हेवाट लावण्यासाठी शफीकने लपवून ठेवले होते.
मुंबई पोलिस डीसीपी हेमराज सिंह राजपूत याप्रकरणी म्हणाले की, शफीकने विळ्याने ईश्वरच्या शरीराचे चार तुकडे केले होते. डोके व हात कापले गेले. तसेच त्याच्या डोक्यावर हातोड्याने वार करण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला विळा आणि हातोडाही जप्त केला आहे. मृतदेहाचे पाच तुकडे झाल्याचे काही अहवाल सांगतात. ईश्वर असे मृताचे नाव आहे.
ऑटोचालक शफीक आपल्या कुटुंबासह चेंबूर, मुंबईतील आरसीएफ पोलीस स्टेशन परिसरात राहतो. ईश्वरचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. ईश्वर शफीकच्या सासऱ्यांशी खूप जवळचा होता. लहानपणापासूनच शफीक अहमद यांच्या सासरच्यांनी त्यांचे पालनपोषण केल्याचे बोलले जात आहे. यामुळे शफिकची पत्नी त्याला आपला भाऊ मानत होती. मात्र ईश्वरचे पत्नीशी अवैध संबंध असल्याचा शफिकला संशय होता. ईश्वरच्या मेहुणीसोबतच्या वागण्याबद्दलही त्याला संशय आला.
दरम्यान दि. २८ ऑगस्ट रोजी शफिक हा ईश्वरसोबत त्याच्या फ्लॅटवर गेला होता. त्याचा खून करून मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ईश्वर अचानक बेपत्ता झाल्यानंतर शफिकच्या सासरच्यांनी पोलिसांना माहिती दिली. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, ईश्वरला शेवटचे शफीफसोबत पाहिले होते. यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीत त्याने पोलिसांना सांगितले की, त्याने अनेकवेळा ईश्वरला पत्नीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. दोघांमध्ये अफेअर असल्याचा दावा शफीकने केला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शफिकला यापूर्वी २०१३ मध्ये जय नारायण कोळी हत्या आणि दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अनेक वर्षे तो तुरुंगातही होता. मात्र, २०१३ च्या खून प्रकरणात आपले निर्दोषत्व सिद्ध झाल्याचा दावा त्याने केला आहे.