फडणवीसांची जपानवारी, गुंतवणूक महाराष्ट्राच्या द्वारी!

    26-Aug-2023   
Total Views |
japan

२०१४ साली मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी जपानचा दौरा केला आणि त्यानंतर राज्यात अनेक मोठ्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली. आताही दि. २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या पाच दिवसीय जपान दौर्‍यातून फडणवीसांनी महाराष्ट्राच्या दारी भरघोस गुंतवणूक आणली आहे. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, ऊर्जा अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला विकासपथावर घेऊन जाण्यासाठीचे फडणवीसांचे प्रयत्न निश्चितच दखलपात्र आहेत!

जपान सरकारच्यावतीने ’स्टेट गेस्ट’ म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा नुकताच संपन्न झाला. एकूण पाच दिवसांच्या या दौर्‍यात फडणवीसांनी जपान सरकार, मंत्रिमंडळातील काही महत्त्वपूर्ण मंत्री, जपानमधील मोठ्या कंपन्या आणि काही कॉर्पोरेट हाऊसना भेटी दिल्या. विक्रमवीर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी या दौर्‍यात आपल्या नावावर दोन नवे विक्रमदेखील नोंदवले आहेत. एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर ’स्टेट गेस्ट’ म्हणून जपानकडून मिळालेला सन्मान आणि दुसरे म्हणजे कोयासन विद्यापीठाने ‘डॉक्टरेट’ पदवी घोषित झालेले देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय ठरले आहेत.

महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांसह ऊर्जा, उद्योग आणि इतर विषयांत जपानहून भरघोस आणि घसघशीत गुंतवणूक आणण्यात फडणवीस पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा हा यशस्वी जपान दौरा पाहिला की, नरेेंद्र मोदींचीही आठवण होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जपान सरकार तसेच तेथील उद्योगवर्तुळाशी उत्तम संबंध प्रस्थापित केले. मोदींच्या याच जपानशी ऋणानुबंधाची परिणती गुजरातमधील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी निधी उभारणीपासून ते अगदी औद्योगिक विकास, गुंतवणुकीतही झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी फडणवीसांनीही मुंबई ते टोकियो मारलेली मजल ही निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल.

फडणवीसांनी गेल्या वर्षभरात रशिया आणि मॉरिशसचे दौरे केले असून, त्या दौर्‍यांमधूनही महाराष्ट्रासाठी नव्या संधी आणि महाराष्ट्राशी या देशांना जोडण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे करून दाखवले आहे.एवढेच नाही तर जी भूमिका वाट्याला आली, त्या प्रत्येक भूमिकेत फडणवीसांनी ‘महाराष्ट्र प्रथम’ या दृष्टिकोनातून काम केले आणि राज्याला यश मिळवून दिले. राज्याचा विकास साधताना पक्षीय अभिनिवेश, सत्ता पक्ष-विरोधी पक्ष, अशी कुठलीही किल्मिषं त्यांनी मनात ठेवली नाही. विरोधी पक्षनेता असतानाही मविआ काळात राज्याबाहेर जाणार्‍या प्रकल्पांना राज्यात कायम ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेच होते!

देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौर्‍याने महाराष्ट्राला काय मिळाले, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या टीकाकारांचे दात घशात घालणारे ठरावे. फडणवीसांनी जपानचे विदेशमंत्री ताकागी केई सॅन यांची भेट घेत जपान आणि महाराष्ट्राच्या परस्पर विकासवृद्धीसह नवनवीन पर्यायांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहती कशाप्रकारे उभ्या करता येतील आणि इतर प्रकल्प राबवता येतील, यावर सकारात्मक चर्चा केली. बुलेट ट्रेन स्थानकांच्या बाहेर उभ्या राहणार्‍या विकास प्रकल्पांना अर्थसाहाय्य करण्याची तयारीदेखील ’जायका कंपनी’च्यावतीने दर्शवण्यात आली. जपानसोबत झालेल्या चर्चेत महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या बाबतीत एक अत्यंत मोठी सकारात्मक बाब घडली. वर्सोवा-विरार सी-लिंकसाठी अर्थसाहाय्य करण्यासही जपानने तयारी दर्शवली असून, खर्‍या अर्थाने फडणवीसांच्या जपान दौर्‍याची ही फलश्रुती म्हणावी लागेल.

मुंबईतील वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूची निर्मिती केली जात आहे. कोस्टल रोडचा एक भाग असलेला हा पूल अंधेरीच्या उपनगरातील वर्सोवा, वांद्रे येथील वांद्रे-वरळी सी लिंकला जोडला जाईल. आठपदरी सी-लिंकमुळे पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच, उपनगरांतील वाहतुकीला काहीसा दिलासा या प्रकल्पातून मिळण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे. ’जायका’ने या बाबत मदतीची हमी दिली असून, प्रकल्पाच्या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे दाखल करण्याची विनंतीदेखील करण्यात आली आहे. ट्रान्सहार्बर लिंकमुळे निर्माण होणारी तिसरी मुंबई म्हणून उलवे आणि लगतच्या भागाकडे पाहिले जाते. ’वांद्रे-वर्सोवा प्रकल्पा’मुळे चौथ्या मुंबईच्या दिशेने त्या भागाची वेगवान वाटचाल होईल, यात कसलीही शंका नाही.

‘मेट्रो मुंबई’ अर्थात जलदगतीने धावणारी मुंबई हे चित्र वास्तवात आणण्यासाठी मेट्रोचे जाळे फडणवीसांच्या माध्यमातून विणण्यास सुरुवात झाली होती. आज मुंबईकरांना अनुभवायला मिळणारा मेट्रो प्रवास फडणवीसांच्या सरकारची देण आहे. मुंबईत सुरू झालेल्या इतर मेट्रोसोबतच मेट्रो-११ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा या भूमिगत मेट्रो या प्रस्तावित प्रकल्पाला आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका जपान सरकारच्यावतीने घेण्यात आली आहे.

मुंबईकरांना पावसाळ्यात भेडसावणार्‍या पूरस्थितीवर कायमचा उपाय म्हणून शहरात पूर व्यवस्थापनासाठी उभारल्या जाणार्‍या प्रकल्पाला सहकार्य करण्यासाठी देखील जपानने अनुकूलता दाखवली आहे. हा प्रकल्प विशेषत्वाने मुंबईतील सखोल भागांमध्ये राहणार्‍या मुंबईकरांसाठी ’लाईफलाईन’ ठरणार आहे. जपानच्या दूरसंचार क्षेत्रात काम करणार्‍या ‘एनटीटी’सारख्या कंपनीनेदेखील महाराष्ट्रात दोन अब्ज डॉलर इतकी प्रचंड गुंतवणूक करण्यास उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील दूरसंचार क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधीसह काही सकारात्मक मोठे बदल दिसतील, अशी अपेक्षा आहे. फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेत जपानी कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची मनीषा व्यक्त केली आहे. जपानमधील उद्योजकांच्या मनात जर महाराष्ट्रात येण्याची इच्छा निर्माण होत असेल, तर त्यातून फडणवीसांचा हा दौरा यशस्वी झाला, हे परिवर्तित होते.

भारतात गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या ’स्टार्टअप’ संकल्पनेला वाव देण्यासाठी जपानमधील चार मोठे गुंतवणूकदार महाराष्ट्रात आणण्यातही फडणवीसांना यश आले. यामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राला तर चालना मिळेल यात वाद नाही. परंतु, राज्यात नवउद्योजक घडण्यासाठी मोठी मदत या माध्यमातून होणार आहे. २०२४च्या प्रारंभी ‘इशिकावा’ ही मोठी कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दाखल होणार आहे. ‘सॉफ्टवेअर हब’ म्हणून देशभरात नावलौकिक मिळवणार्‍या पुण्यात ‘मित्सुबिशी’ ही आंतरराष्ट्रीय कंपनी गुंतवणूक करणार असल्याचे या भेटीतून निश्चित झाले आहे. महाराष्ट्रात होणार्‍या गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी नागपुरात जे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेंटर’ उभारले जात आहे, त्यालाही सहकार्य करण्याचे जपानने मान्य केले आहे.

ऊर्जा क्षेत्रात काम करणार्‍या ‘जेरा’ या कंपनीच्या प्रमुख अधिकार्‍यांनी फडणवीसांसोबत चर्चा केली असून, महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास आणि राज्यासोबत ग्रीन एनर्जी, अमोनिया, नवीकरणीय ऊर्जा आणि इतर विषयांत भागीदारीच्या कक्षा वाढवण्यासाठी उत्सुक असल्याचे ‘जेरा’ कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एकट्या जून २०२३ या महिन्यात या क्षेत्रासाठी १ लाख, ३२ हजार कोटींची गुंतवणूक आणण्यात फडणवीसांना यश आले होते. विशेषत्वाने नमूद करण्याची बाब म्हणजे ग्रीन एनर्जी, हायड्रोजन धोरण आणि ऊर्जा क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदलांची सुरुवातही फडणवीसांच्या नेतृत्वात होत आहे.

अशा या जपान दौर्‍यातून महाराष्ट्राला केवळ आश्वासनेच नाही, तर सहकार्य आणि गुंतवणुकीची हमी देण्यात आली. जपान महाराष्ट्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष कक्षही स्थापन करणार असून, परस्पर व्यवहार आणि व्यापार वाढवण्यासाठी दोन स्वतंत्र पथक जपान आणि महाराष्ट्रातून काम करणार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ मधील त्यांच्या जपान दौर्‍यानंतरही राज्यामध्ये मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यात त्यांना यश आले होते. ’जायका’ कंपनीसोबत झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना ’जायका’ने अर्थसाहाय्यदेखील केले होते. यात मुंबई-ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-३, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच भेटीनंतर २०१७ मध्ये ‘जायका’सोबत ‘एमटीएचएल’साठी करारदेखील करण्यात आला होता.

ऐरवी सदा न कदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर राजकीय मुद्दे हाताशी धरून टीका करणार्‍या मंडळींनी फडणवीसांच्या जपान दौर्‍यावर आणि आणलेल्या गुंतवणुकीवर चकार शब्द काढलेला नाही. महाराष्ट्रात निर्माण होणार्‍या राजकीय संकटावर मार्ग काढायचा असो किंवा सरकारमध्ये येणार्‍या अडचणी सोडवणे, केंद्र सरकारशी समन्वय साधून प्रशासकीय अडथळे दूर करणे असो किंवा परराष्ट्रांसोबत संबंध प्रस्थापित करणं, या सगळ्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी आणि त्यावर लीलया मात करण्यासाठी महाराष्ट्राला मिळालेला हुकमी एक्का म्हणजे देवेंद्र फडणवीस! देवेंद्र फडणवीसांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या जपान दौर्‍यासाठी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

जपान दौर्‍यातून महाराष्ट्राला काय मिळाले?

- वर्सोवा-विरार सी-लिंक, मेट्रो-११ (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा), मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासाठी अर्थसाहाय्याचे आश्वासन

- मेट्रो स्थानकांनजीकच्या भागाचा विकास

- मेट्रो-३साठी ‘जायका’कडून वित्तसाहाय्याची चौथी-पाचवी किस्त लवकरच/मेट्रो-३ मधील सर्व अडथळे दूर केल्याबद्दल प्रशंसा

- महामार्ग आणि स्टील पॅनेल रस्त्यांसाठी बांधकाम आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान

- ’एमटीएचएल’मुळे तयार होणार्‍या तिसर्‍या मुंबईत बांधकाम क्षेत्रात ‘सुमिटोमो’ची गुंतवणूक तसेच मेट्रो स्थानकांबाहेर उंच इमारतीच्या क्षेत्रात सुद्धा सहकार्याची हमी

- पुण्यात ‘स्टार्टअप हब’ विकसित करण्यासाठी सहकार्य

- ‘सेमीकंडक्टर’ क्षेत्रातसुद्धा गुंतवणूक

- ‘वाकायामा’ गुंतवणूकदारांचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात येणार

- ‘एनटीटी डेटा’ आपली गुंतवणूक दुप्पट करणार, नागपूर तसेच पुण्याला प्राधान्य

- पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन

- मराठी विद्यार्थ्यांना ‘बुद्धीस्ट स्टडिज’साठी सुविधा

- ‘आयआयटी मुंबई’सोबत संशोधन सहकार्य


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.