जाहिरातींची निर्मिती करतानाच कायद्याची चौकट आखणे गरजेचे : मनीषा कपूर
24-Aug-2023
Total Views | 65
ASCI (Advertising Standards Council of India) ही संस्था जाहिरातींवरील तक्रार निवारण करणारी एक महत्त्वपूर्ण संस्था. प्राप्त तक्रारींमध्ये किती तथ्य आहे, याबद्दल बारकाईने अभ्यास करत त्यावरील पुढची कारवाई काय करायची ते ‘एएससीआय’ ठरवते. १९८५ साली स्थापन झालेल्या या संस्थेने गेले तीन दशकांहून अधिक काळ जाहिरात विश्वाचा बारकाईने अभ्यास केला आहे. या संस्थेची पुढील आठवड्यात प्रशिक्षण संस्थाही सुरू होत आहे. त्यानिमित्ताने ‘एएससीआय’ची नेमकी कार्यपद्धती, फसव्या जाहिरातींविरोधात तक्रार निवारण प्रकिया याविषयी ‘एएससीआय’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कपूर यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
‘एएससीआय’ची वाटचाल होत असताना जाहिरात क्षेत्रातदेखील आमूलाग्र बदल झाले आपण हे जवळून पाहताना याकडे कसं बघता?
‘एएससीआय’ची स्थापना १९८५ साली झाल्यानंतर त्यामध्ये कालपरत्वे बरेच बदल होत गेले. अगदी नेमकेपणाने सांगायचे झाले तर पूर्वीच्या काळात पारंपरिक जाहिरात पद्धती अस्तित्वात होती. प्रिंट व टेलिव्हिजन अशी साधारण दोन प्रकारची माध्यमे होती. परंतु, आता सगळं चित्र बदलले आहे. काळ जसा वेगाने पुढे जातो आहे, तसे बदलही जाहिरात माध्यमात होत आहेत.आजच्या ‘डिजिटल’ युगात जाहिरातींसाठी आणखीन एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहेत. आधी टीव्हीसाठी किंवा स्थानिक वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्या जायच्या.तेव्हा त्यांची फारशी पडताळणीही होत नव्हती. परंतु, आता मात्र बदललेल्या जाहिरात विश्वात मागणी-पुरवठा वाढल्याने याकामासाठी एक स्वतंत्र ‘सेल्फ रेग्युलेटरी बॉडी’ असणे आवश्यक असते, जी कर्मशियल जाहिरातींवर अंकुश ठेवू शकेल.
‘एएससीआय’च्या कामाची नेमकी पद्धत कशी असते?
‘एएससीआय’मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती निरीक्षक तज्ज्ञ म्हणून काम करतात. एखाद्या जाहिरातीची तक्रार आल्यास त्याची व्यवस्थित चाचपणी केली जाते. आता उदाहरणार्थ १०० ते १५० जाहिरातींवर त्या अयोग्य आहेत म्हणून तक्रार आल्यास, त्यावर आम्ही अभ्यास करतो आणि मग ‘एएससीआय’ त्याविषयी निर्णय घेत असते. आता जाहिरात विश्वाची व्याप्ती वाढल्याने ‘एएससीआय’च्या कामाची कक्षाही रुंदावली आहे. जाहिरातींची संख्याही हजारांच्या घरात गेल्यामुळे ‘एएससीआय’ची जबाबदारी व कामाचा आवाकादेखील वाढला आहे. आजघडीला डिजिटल पद्धतीच्या जाहिरातींचे प्रमाणे हे एकूण जाहिरातींच्या ७० टक्के इतके आहे. वेगवेगळ्या तक्रारींची दखल घेत असताना आम्ही सगळ्या कायद्याच्या चौकटीत काम करतो. सर्वोच्च न्यायालयाचा निदर्शनाखाली असलेली मार्गदर्शक तत्वे पाळून त्यानुसार जाहिरातींचे वर्गीकरण करतो. माहिती-प्रसारण मंत्रालय व सरकारच्या माध्यमातून आम्ही त्यांचा प्रसंगी सल्ला घेतो. पूर्वीच्या काळी आम्ही फक्त ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करायचो परंतु आता आम्ही स्वतःची मार्गदर्शक तत्वे बनवली आहेत. गेल्या काही वर्षांत बरेच बदलले. आम्ही मार्गदर्शक तत्वे पालनासाठी गेले तीन वर्षं पूर्ण लक्ष डिजिटल जाहिरातींकडे केंद्रित केले आहे.
जाहिरातींचा मजकूर तपासताना नेमक्या कुठल्या गोष्टी तुम्ही विचारात घेता?
हल्ली अॅडव्होटोरियल (जाहिरात) व संपादकीय मजकूर यातली पुसटची रेषा संपत चालली आहे. पूर्वी जाहिराती, प्रमोशनल कंटेंट ओळखता येत होता. आता नक्की जाहिरात कुठली आणि साधा लेख कुठला, हे तितकेसे ओळखता येत नाही. परिणामी, यावर आम्हाला मेहनत घ्यावी लागते. हे आव्हान स्वीकारताना तीन दशकांपासून चाललेले जाहिरात इंडस्ट्रीतील बदललेले निकष विचारात घ्यावे लागतात.
८०-९०च्या दशकातल्या जाहिराती सहजसुंदर निखळ आनंद देणार्या होत्या. हल्लींच्या नवीन जाहिरातींकडे पाहून तसे अजिबात वाटत नाही. याबाबत काय सांगाल?
लहानपणीच्या जाहिराती प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालत असत. लोक तेव्हा करमणुकीसाठी जाहिरात बघत असत. मालिकांच्या ब्रेकमध्ये जाहिरात कधी येईल, यासाठी लोक उत्सुकतेने वाट पाहायचे. मात्र, आता ती परिस्थिती राहिली नाही. तेव्हा जाहिराती मर्यादित होत्या व लक्ष विचलित करणार्या गोष्टी कमी होत्या. लोकांना जाहिरातीतून अनेक माहिती उपलब्ध होत असे. आता दिवसाला चार हजारांहून अधिक जाहिराती प्रसारित होत असतील, तर ग्राहकांचे जाहिरातींकडे लक्ष वेधले जात नाही. सोशल मीडिया, फोनची सवय व व्यसन यामुळे ग्राहकही विचलित होतो. ३० वर्षांपूर्वी लोक मजकुरासाठी आसुसलेले होते. आता मजकुराचा पुरवठा अमाप असल्याने परिस्थिती बदलली. या परिस्थितीतदेखील मात्र काही ठरावीक जाहिरातींना अपील मिळत आहे. सादरीकरणाची पद्धत, सामाजिक संदेश व चांगल्या मजकुरामध्ये निश्चितच लक्ष वेधून घेण्याची क्षमता असते. आता जाहिरातींचा चार्म गेला तरी भविष्य नाही, अशी परिस्थिती नाही. कारण, चांगल्या मजकुराला अजूनही प्रेक्षक दाद देतात.
जाहिरातींचा पुरवठा अगणित वाढल्याने समाजात आक्षेपार्ह संदेश व गैरसमज पसरवणार्या जाहिरातींवर लगाम घालण्यासाठी ‘एएससीआय’चा काही मनसुबा आहे का?
मुख्यतः जाहिरातीचा नेमका आशय काय आहे, त्याची आम्ही शहानिशा करतो. जाहिरातींचे स्वरूप काय, नेमका मतितार्थ काय याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.पूर्वी कौटुंबिक पार्श्वभूमी, आचारविचार, गाव या मुद्द्यावर लोकांना ओळखले जायचे. आता मात्र लोक काय खातात, काय कपडे घालतात, कुठला ब्रॅण्ड वापरतात अशा भौतिक गोष्टींना खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या आशयाने काही जाहिराती तयार होतात. त्यामुळे ज्या जाहिरातीत मोठे विशिष्ट दावे केले जातात, लोकांनी खरेदी करण्यासाठी अवास्तव गोष्टी सांगितल्या जातात, त्या नक्कीच गैर आहेत. ब्रॅण्ड उत्पादनामध्ये फक्त ज्या गोष्टी आहेत, त्या जाहिरातीत दाखवायला हव्यात. प्रत्यक्षात वापरताना तशा गोष्टी नसल्यास त्या कारवाईसाठी पात्र आहेत.
अशा गैरसमज पसरवणार्या जाहिरातींवर ‘एएससीआय’तर्फे काय कारवाई केली जाते?
वैज्ञानिक दावे किंवा असत्य माहितीच्या आधारे जाहिरातींमध्ये दावे केल्यास आम्ही अशा जाहिरातींवर आक्षेप नोंदवतो. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यावर आम्ही त्या त्यांचा ‘केस टू केस’चा अभ्यास करतो. ५० हून अधिक विषयांवरील तज्ज्ञ यावर पुढील तपास करतात. अशा जाहिरातदारांकडे आम्ही त्या संबंधित प्रकाशित झालेला डाटा आणि त्यावरील स्पष्टीकरण मागवतो. याशिवाय आमचेही जाहिरातींकडे लक्ष असते. दोषी ठरल्यास त्या जाहिरातीत आम्ही बदल करतो किंवा त्या मागे घेण्याची सूचना करतो. त्यामुळे जाहिरातदारांनीही सत्य माहिती जबाबदारीने जाहिरातीत दाखविली पाहिजे.
अनेकदा राजकीय विषयांशी संबंधित जाहिराती एककल्ली असल्याचे निदर्शनास येते. अशा जाहिरातींबदल ‘एएससीआय’ची काही मार्गदर्शक तत्वे आहेत का? शिवाय भविष्यात यासंदर्भात काही नवीन नियमावली ठरविणार आहात का?
‘एएससीआय’ औद्योगिक क्षेत्रातील जाहिराती, व्यावसायिक जाहिरातींच्या कक्षेत काम करते. राजकीय, सामाजिक प्रकारच्या जाहिराती आमच्या कार्यकक्षेत येत नाहीत. सरकारचे निवडणूक आयोग व सलग्न संस्था यावर निर्णय घेतात. दैनंदिन कामकाजात आलेल्या तक्रारींचे निवारण आम्ही विविध पद्धतीने करतो. परंतु, यापुढे आम्ही अजून एक गोष्ट ठरवली आहे ती म्हणजे जाहिराती तयार करतानाच जाहिरातदारांना मार्गदर्शन. जाहिरातींची निर्मिती करतानाच कायद्याची चौकट त्यांना समजावून सांगितल्यास बर्याच गोष्टी सोप्या होतात. आजच्या डिजिटल युगात जाहिरातींचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे काय करावे, काय करू नये, याची खबरदारी आधीच घेतल्यास वेळेची बचत होऊ शकते. या क्षेत्रातील सखोल अभ्यासासाठी पुढच्या आठवड्यात आम्ही ट्रेनिंग अकादमी सुरू करत आहोत. दूरदृष्टीने आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजनेकडे लक्ष केंद्रित करत आहोत. संस्थेच्या उलाढालीचा आम्ही ‘मेंबरशिप सबस्क्रिप्शन प्लान’ ठेवला आहे. मला वाचकांना एवढंच आव्हान करायला आवडेल की, तुम्हाला कुठल्याही जाहिराती आक्षेपार्ह वाटल्यास त्याची तक्रार आपण विविध माध्यमांतून करू शकता. ‘एएससीआय’चा व्हॉट्सअॅप क्रमांक ७७१००१२३४५ असून यावर तुम्ही कुठल्याही जाहिरातीसंदर्भात तक्रार नोंदवू शकता. आक्षेपार्ह जाहिरातींचा स्क्रीनशॉट, लिंक, मजकूर पाठवल्यास ‘एएससीआय’कडून त्याची माहिती घेऊन तुम्हाला त्याचा स्टेटस अपडेट केला जाईल. केसच्या स्वरूपानुसार दोन ते सहा आठवड्यांत आम्ही त्यावर निर्णय घेतो. तरी ग्राहकांनी पण जाहिरातींबाबत नक्कीच सतर्क राहावे.