‘एआय’चे कॉर्पोरेट जगतात पाऊल!

    02-Aug-2023   
Total Views |
How Artificial Intelligence Will Transform Businesses

‘जनरेटीव्ह एआय’ किंवा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) संचालक मंडळाची जागा घेऊ शकतील का? एकीकडे मानवी भावभावना विरुद्ध दुसरीकडे माहितीचा तंतोतंत भरलेला स्रोत, असा वाद झाला, तर कोण जिंकेल? कंपन्यांना ‘एआय’ची मदत घेऊन कारभार करण्याची वेळ येऊ शकते का? यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.

‘एआय’ने हजारो शेकडो जणांच्या नोकर्‍या खाल्ल्या, कंपन्यांनी अनेक कर्मचार्‍यांना ऑटोमेशनमुळे नारळ दिला, यांसारख्या अनेक बातम्या आजवर आपल्या कानावर पडत असतात. एव्हाना ‘एआय’ आणि नोकर्‍यांवर कुर्‍हाड यावर चर्चेची बरीच गुर्‍हाळं सुरू होती आहेत आणि ती यापुढेही राहतील. मात्र, ज्या कंपन्यांच्या मालकांनी, संचालक मंडळांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला, त्यांच्यावरच बेरोजगारीची वेळ ‘एआय’मुळे येऊ शकते का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. यात आघाडीवर संचालक मंडळातील मंडळीच आहेत. मग उत्तर काय मिळाले? तर अर्थोअर्थी ते होय आणि नाही, असे दोन्हीही आहे. म्हणजे नेमकं काय? ते पाहूयात. अर्थात, इथे ‘एआय’ला संचालक मंडळात स्थान म्हणजे संपूर्ण संचालक मंडळ बाद होईल, हा समज चुकीचाच आहे!

दशकभरापूर्वी एका संगणकाला संचालक मंडळात स्थान देण्याचा निर्णय ठरला होता. मात्र, त्याबद्दल पुढे फारशी काही चर्चा झाली नाही. मात्र, नव्या तंत्रज्ञानानंतर ही गोष्ट आता शक्य आहे का? ‘जनरेटीव्ह एआय’ किंवा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’द्वारे संचालक मंडळावर ‘एआय’ची नियुक्ती केली जाणार आहे का? याची चाचपणी सुरू झाली आहे. कंपनीचे आणि समभागधारकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम करण्यासाठी कार्यरत असणार्‍या संचालक मंडळांवर ‘एआय’ची नियुक्ती केल्यानंतर काय होईल? तर माहितीचे वर्गीकरण आणि विश्लेषण करण्यात ‘एआय’ तंत्रज्ञान, हे आघाडीवर असेल. कुठल्याही मनुष्याच्या बौद्धिक क्षमतेच्या एक पाऊल पुढे असेल. याचा फायदा घेऊन संचालक मंडळातील अन्य सदस्यांना निर्णय प्रक्रियेत फायदा होऊ शकतो.

संचालक मंडळांतील निर्णयांच्या जोखमीचा विचारही करायला हवा. बर्‍याचदा चुकीच्या निर्णयाचा फटका, हा संबंध व्यवस्थेला बसू लागलो. अशावेळी ‘एआय’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ज्याला ‘रिस्क फॅक्टर’ म्हटले जाते, ती कमी करण्यासाठी ‘एआय’चा वापर केला जाऊ शकतो. असे निर्णय ज्यामुळे कंपन्यांच्या महत्त्वाच्या ध्येय-धोरणांमुळे गोष्टी प्रभावित होऊ शकतात, त्यावेळी अचूक निर्णयासाठी ‘एआय’ची मदत घेतली जाऊ शकते का, याची चाचपणी सध्या सुरू आहे. याशिवाय, स्वयंचलन (ऑटोमेशन) हा मुद्दाही तितकाच महत्वाचा. कंपन्यांची नियमित संचालक मंडळांची होणारी सभा, सर्वसाधारण सभा या आणि अन्य महत्त्वाची माहिती संग्रहित करण्याचे काम व्यवस्थितपणे केले जाऊ शकते.

ज्याप्रमाणे कॉर्पोरेटमध्ये ‘एआय’चा शिरकाव हा काहींच्या पथ्थ्यावर पडणारा असला, तरीही त्यात त्रुटीही आहेत. डाटा विश्लेषणात जरी ‘एआय’ एक पाऊल पुढे असले, तरीही भावनात्मक निर्णय, तसेच बुद्धिमत्तेचा अभाव असल्याने तिथे कस लागणार. बर्‍याचदा संचालक मंडळांना किंवा दैनंदिन कामकाजात काही जटिल आणि अस्पष्ट परिस्थितीला तोंड द्यावे लागते. व्यापक दृष्टिकोन ठेवून जेव्हा विचार करण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र मनुष्याची गरजच भासेल.

जबाबदारी आणि दायित्वाच्या मुद्द्याचा विचार केला, तरीही बरेच प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. संचालक मंडळांच्या बैठकीत होणार्‍या ‘एआय’च्या वापरात त्रुटींबद्दल किंवा अकार्यक्षमतेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात यासंदर्भात जर तसा विचार करायचा झाला, तर शेअर धारकांपासून ते कर्मचारी व ग्राहकांपर्यंतचा विचार करावा लागेल. शिवाय, या संदर्भातील कायदे आणि नियमावली काय असेल, याबद्दलही विचार करायला हवा.

‘एआय’वर निर्भर राहिल्याने पक्षपातीपणाचे आरोपही केले जाऊ शकतात. पूर्वीच दिलेल्या माहितीद्वारे तसा ‘अल्गोरिदम’द्वारे निकाल किंवा निर्णय प्रभावित केला जाऊ शकतो. या दृष्टीनेही विचार होणे महत्त्वाचे आहे. तसेच ‘एआय’तर्फे घेतल्या जाणार्‍या निर्णयाचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला जाऊ शकतो का, हादेखील प्रश्न आहे. प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. कॉर्पोरेटमध्ये ‘एआय’ आणण्याचा हा निर्णय यशस्वी ठरला क्रांतिकारी निर्णय ठरेल, यात शंका नाहीये. अर्थात, हे शस्त्र दुधारी असल्याने वापरही योग्य रितीने होईल, याची खबरदारी बाळगायला हवी.

बिगर बँकिंग आणि बँकिंग व्यवस्था हे तंत्रज्ञान वापरणारे आघाडीचे क्षेत्र मानले जाते. या क्षेत्राने तर स्वतःला बँकिंगशी जुळवून घेण्यासाठी तयारी दर्शविलेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ग्राहकांना दिले जाणारे किरकोळ स्वरुपातील कर्ज. या प्रक्रियेसाठी ‘एआय’चा वापर हा मोठ्या मनुष्यबळाचे श्रम वाचवणारा ठरणार आहे. कागदपत्र-पुराव्यांची पडताळणी, स्वाक्षरी, ग्राहकांच्या माहितीची वैधता तपासणे, यांसारख्या दैनंदिन किरकोळ वाटणार्‍या; पण तितक्याच महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी ‘एआय’चा वापर करण्यासाठी जागतिक बँकांनी ‘एआय’चा वापर हा सुरूही केला. या दृष्टीने आता उच्च पदस्थ अधिकार्‍यांपासून ते कर्मचारी आणि ग्राहकवर्गापर्यंत सर्वांनाच ‘एआय’चे प्रशिक्षण, हे काळाची गरज बनले आहे. सायबर सुरक्षेतही ‘एआय’ची भूमिका महत्त्वाची असणार आहे. अर्थात, हा स्वतंत्र विषय सविस्तर विषय आहे. मात्र, मानवी हस्तांतरणामुळे बर्‍याचदा होणार्‍या चुका या ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाद्वारे टाळणे सहज शक्य होईल, हे निश्चित. कॉर्पोरेट जगतात पडलेले ‘एआय’चे पाऊल संचालक मंडळींपर्यंत पोहोचणार का, हा येणार काळ ठरवेल. मात्र, त्यादृष्टीने योजना निश्चित सुरू आहेत. हे मात्र नक्की...


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.