मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या ६ तरण तलावांच्या संख्येत आता लवकरच आणखी एका तरण तलावाची भर पडणार आहे. यासाठी निमित्त ठरणार आहे, तो वडाळा येथील अग्निशमन केंद्र परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेला तरण-तलाव. यापूर्वी केवळ अग्निशमन दलासाठी राखीव असलेला हा तलाव १ ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी खुला करण्यात येत असून त्यासाठी ऑनलाईन सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त किशोर गांधी यांनी कळविले आहे की, काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा तरण तलाव यापूर्वी केवळ मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राखीव होता. हा तरण तलाव येत्या १ ऑगस्ट पासून मुंबईकर नागरिकांसाठी खुला करण्यात येत असून यासाठीची ऑनलाइन सभासद व नोंदणी आता सुरू झाली आहे. वडाळा येथील शेख मिस्त्री दर्गा मार्गावरील सीजीएस कॉलनी आणि म्हाडा कॉलनी च्या समोर असणाऱ्या वडाळा अग्निशमन केंद्र परिसरात हा तरण तलाव आहे.
किशोर गांधी, उपायुक्त (उद्याने)
दरम्यान, या जलतरण तलावाचा आकार हा २५ मीटर × १५ मीटर इतका असून तलावाची खोली ही उथळ बाजूला १ मीटर इतकी असून दुसऱ्या बाजूला सर्वाधिक खोली ही २.९ मीटर इतकी आहे. तसेच, या तरण तलावाची जल धारण क्षमता ही ७ लाख लीटर इतकी आहे. या तरण तलावामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी अत्याधुनिक ओझोन संयंत्र आहे.
तरण तलाव सभासदांना पोहण्यासाठी पाण्यात उतरण्यापूर्वी व पोहणे झाल्यानंतर आंघोळीसाठी (शाॅवर) १४ स्नानगृह आहेत. यापैकी ७ महिलांसाठी असून ७ पुरुषांसाठी आहेत. त्याचबरोबर महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी ३, यानुसार ६ शौचालयांची देखील या ठिकाणी व्यवस्था आहे.
या तरण तलावासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून ती https://swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही प्रवेश प्रक्रिया "प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य" या पद्धतीने सुरू आहे. वडाळा तरण तलावात वार्षिक सभासदत्वासाठी २ हजार नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. तर त्रैमासिक व महिला विशेष बॅच सभासदत्व क्षमता ही प्रत्येकी ३०० इतकी आहे. ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारी ही नोंदणी "प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य" या पद्धतीने होणार आहे.
वार्षिक सभासदत्व शुल्क हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुपये ८ हजार ४१० इतके आहे. तर त्रैमासिक सभासदत्व शुल्क हे रुपये २ हजार ३५० इतके आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, पालिका कर्मचारी, निवृत्त महानगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवक यांना शुल्कात ५० टक्के सवलत आहे.
या तरण तलावात सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत महिला विशेष बॅच असणार असून या बॅचला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना वार्षिक सभासदत्व शुल्कात २५ टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे या बॅचचे वार्षिक सभासदत्व शुल्क हे रुपये ६ हजार ३९० इतके असणार आहे.