दुर्लक्षितांच्या चेहर्‍यावरील स्मित

    27-Jul-2023
Total Views | 61
article on Smita Gaikwad

समाजकार्याचा वसा घेताना दुर्लक्षित व तळागाळातील लोकांना स्मिता गायकवाड यांनी ‘स्मितसेवा फाऊंडेशन’चा मायेचा आधार मिळवून दिला. त्यांच्याच कामाचा या लेखात घेतलेला हा धांदोळा...
मूळ पुण्याच्या असलेल्या स्मिता गायकवाड पुण्यातील हडपसरच्या विकासासाठी झटत होत्या. मॉर्निंग वॉकिंगला जाताना रस्त्यावरचे खड्ड्यांचे छायाचित्र काढून ते प्रशासनाच्या माध्यमातून दुरुस्त करण्याचा छोटासा प्रयत्न स्मिता गायकवाड यांनी सुरू केला. या कामातून पुढे ’स्मितसेवा फाऊंडेशन’चा उदय झाला. या माध्यमातून स्मिता यांनी शेकडो कामांचा वसा घेतला आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश त्यातून प्रतिबिबिंत होतो.

पुण्यात शिक्षण झाल्यानंतर स्मिता यांनी ’कामगार वस्ती ग्रामीण विकास महामंडळा’त काही दिवस काम केले. या कामाच्या माध्यमातून अनेक पुरस्कारही मिळाले. पण, काही तरी वेगळी करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. हडपसर परिसरातील कचरा, खड्डे या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मग कधी प्रशासनाच्या माध्यमातून, तर कधी स्वतः त्या ठिकाणी जाऊन काम करू लागल्या. या कामाची पुढे आवड निर्माण झाली. आपला परिसर, आपलं गाव स्वच्छ व सुंदर व्हावे, या कल्पनेने काम सुरू केले. पुण्यात फिरत असताना रस्त्यांवरील खड्डे अथवा काही तक्रारी असल्यास त्याचे छायाचित्र काढून त्या प्रशासनाला पाठवू लागल्या. त्यातून या समस्या सोडविण्यात आल्या.

पुण्यातील हडपसरच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व विकासासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राच्या माध्यातून स्मिता यांनी साकडे घातले. त्यातून कामाची उमेद आणखी वाढत गेली. ’ऑर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून सेवा कार्य म्हणून एक उपक्रमही त्यांनी राबविला. मतदान नोंदणीसाठीही काम केले. त्यानंतर मग महिला मंडळे व सामाजिक संस्थाही या कामाशी जोडल्या गेल्या.
२०१९ मध्ये ’स्मितसेवा मुंब्रा’ची त्यांनी सुरुवात केली. महिलांना एकत्रित आणून त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने काम करण्यासाठी मार्गदर्शन केले. याच काळात पुढे कोरोनासारखा गंभीर आजारामुळे संपूर्ण देशच हादरून गेला. वेगवेगळ्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. समाजातील तळागाळातील नागरिकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र झटून मग स्मिता यांनी काम सुरू केले. केंद्राच्या, राज्याच्या व महापालिकेच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न केले.

शहरातील काही भागांत आजही आरोग्यविषयक नागरिकांची अनास्था असल्याने सुरुवातीला अगदी माफक दरात म्हणजेच २० रुपयांत तपासणी शुल्क असलेला दवाखाना सुरू केला. झोपडपट्टी वसाहतीमध्ये अनेक महिलांना, तरुणींना आपल्या आरोग्याकडे आर्थिक अडचणींमुळे लक्ष देता येत नाही. या उपक्रमामुळे या दुर्लक्षित महिलांच्या आरोग्याच्या अडचणी दूर झाल्या. तसतसा विविध भागांतूनदेखील या उपक्रमास प्रतिसाद मिळू लागला. मग, एवढ्यावरच न थांबता स्मिता गायकवाड यांनी वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना एकत्रित आणून वेगवेगळे कोर्स शिकवले.
 
अनेकांना चांगले शिक्षण असूनही नोकरी मिळण्यात अडचणी येत होत्या. ते हेरून विविध कंपन्या, कारखाने यांच्याशी बोलून मोठी रोजगारनिर्मिती केली. आतापर्यंत पुण्यासह विविध भागांत ५३० जणांना नोकरीसाठी मदत केली. मध्यंतरी कोरोनामध्ये महिलांची नोकरी गेली. कोणीही कामावर ठेवत नव्हते. दुसरीकडे पैसे मिळणे बंद झाल्याने या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची मोठी समस्या उभी राहिली. याची माहिती स्मिता गायकवाड यांना मिळाली. त्यांनी या सर्व महिलांना एकत्रित करून उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. महापालिका व विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांना सॅनिटायझर, हातमोजे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पुढे यातून अनेकांनी व्यवसाय वाढवला. यातून अनेकांना त्याच परिसरातून रोजगार निर्मिती झाली. याचा आदर्श परिसरातील अनेक वस्त्यांनी घेतला.
 
दरम्यान, शेकडो महिलांना ब्युटी पार्लर, शिवण क्लासेस यातून व्यवसाय मिळवून दिला. आरोग्यविषयक जागृती लक्षात घेऊन दरवर्षी महिलांसाठी व तरुणींसाठी आरोग्य शिबीर राबविण्यात येते. घरकाम करणारे महिला, कामगार आणि कचरावेचक महिलांना दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात येतो.रस्त्यावर असणारे फिरस्ते अथवा जखमी अवस्थेत असलेल्यांना वेळेवर उपचार करण्यासाठी तत्पर असलेल्या स्मिता गायकवाड यांनी आतापर्यंत अनेकांना मदत केली आहे. घराबाहेर पडल्यानंतर एखादा दुर्लक्षित गरजू दृष्टीस पडल्यास, त्या हमखास तेथे थांबून त्यांची विचारपूस करत. ऐवढेच नव्हे, तर त्यांना आरोग्याची व कपड्यांची सोयही केली जाते.

गायकवाड यांनी आठवण सांगितली की, ”ऐन कोरोनाच्या काळात एकाचा फोन आला की, एक महिला अनेक दिवस झाले, हडपसर येथील गाडीतळ जवळ महिला निपचित पडून होता. तेथे धाव घेतल्यानंतर समजले की, तिच्यासोबत एक पाच वर्षांची मुलगीही होती. अनेकजण जवळून जात असताना, त्या महिलेची विचारपूस कोणी करत नव्हते. तोंडाला मास्क आणि हातमोजे घालून पोलीस व रुग्णवाहिकेच्या मदतीने तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले.”आतापर्यंत अशा दहा ते १२ जणांना वेळेवर उपचार केले आहेत. त्यांच्या या कार्यास दै. ’मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



-पंकज खोले

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121