हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या भारतात पर्यटन स्थळांची वानवा कधीच नव्हती. मात्र, भारताच्या अद्वितीय सांस्कृतिक वारशाची आजवरच्या सरकारांनी हेतूतः उपेक्षा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक तीर्थस्थळांचा कायापालट करून त्यांना देशीच नव्हे, तर परदेशी पर्यटकांच्याही नकाशावर आणले आहे. या तीर्थस्थळांना भेट देणार्या व पर्यटकांची प्रचंड संख्या पाहता या सांस्कृतिक उत्थानातून देश कसा बदलतो आहे, ते दिसून येते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केंद्र सरकारने हिंदूंच्या तीर्थांची आणि सांस्कृतिक स्थळांची उपेक्षा करून भारतीयांची जी सांस्कृतिक उपासमार केली होती, ती संपुष्टात येत असल्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील तीन प्रमुख तीर्थस्थळांना भेट दिलेल्या पर्यटकांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारत कसा बदलतो आहे, ते दिसून येईल. गेल्या वर्षी वाराणसी शहराला तब्बल ७ कोटी, ११ लाखांपेक्षा अधिक भारतीय पर्यटकांनी भेट दिली, तर परदेशी पर्यटकांबाबत हाच आकडा ८३ हजार, ७४१ इतका आहे. अयोध्येत २०२१ साली १ कोटी, ५४ लाख पर्यटकांनी भेट दिली होती, तर हाच आकडा २०२२ मध्ये थेट ९ कोटी, ६३ लाखांवर गेला आहे.
मथुरेला जाणार्या पर्यटकांची (किंवा भाविकांची) संख्या २०२१ मध्ये ५४ लाख, ३० हजारांवर होती, जी २०२२ मध्ये सहा कोटींवर गेली. त्या तुलनेत गतवर्षी गोव्याला भेट देणार्या पर्यटकांची संख्या अवघी ८५ लाख होती. गोवा या भारतातील प्रमुख पर्यटनस्थळाची कीर्ती परदेशातही पसरलेली असली, तरी तीर्थस्थळांना भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या गोव्यातील पर्यटकांपेक्षा अधिक आहे, हे बदलत्या भारताचे चित्र उत्साहवर्धक आहे. उत्तर प्रदेशातील केवळ तीन प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देणार्या पर्यटकांची ही संख्या लक्षात घेतल्यास एकट्या उत्तर प्रदेशात पर्यटनाच्या विकासाला किती वाव आहे, ते दिसून येईल.
स्वातंत्र्यानंतर परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केवळ मुघल राजवटीतील वास्तूंवर आणि मुघलांच्या स्थळांवर भर देण्यात येत होता. उत्तर प्रदेशचे पर्यटन हे ताजमहाल पुरतेच सीमित करून टाकण्यात आले होते. परदेशी राष्ट्रप्रमुखांना स्मृतिचिन्ह म्हणूनही फक्त ताजमहालचीच प्रतिमा दिली जात असे. एका बादशहाने आपल्या एका राणीची बांधलेली एक कबर ही भारताची ओळख कशी ठरू शकते, असा प्रश्न मोदींपूर्वीच्या कोणाही पंतप्रधानास का पडला नाही, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी स्वतः यात लक्ष घातले आणि परदेशी राष्ट्रप्रमुखांना भगवद्गीतेची प्रत भेट म्हणून देण्यात येऊ लागली. मोदी यांनी एकहाती केदारनाथ, वाराणसी आणि अयोध्येतील अनेक विकास प्रकल्पांचे स्वतः उद्घाटन करून ही तीर्थस्थळे देशी-परदेशी पर्यटकांच्या नकाशावर आणली आहेत. भारताकडील समृद्ध आणि वैभवशाली सांस्कृतिक परंपरा हेच भारताचे सर्वात मोठे बलस्थान बनू शकते, हे मोदी यांनी ओळखले. म्हणूनच त्यांनी काशीतील विश्वनाथ मंदिराचा कायापालट केला आणि गंगातीरावरून थेट मंदिराला जाण्यासाठी विस्तृत कॉरिडोर बांधला. त्या अनुषंगाने यात्रेकरूंना उपयोगी पडतील, अशा अनेक वास्तूही या मार्गावर उभ्या राहिल्या आहेत.
वाराणसी खालोखाल मोदी यांनी अयोध्येचे वैभवशाली दिवस परत आणले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीमुळे अयोध्येबद्दल भारतीयांमध्ये विलक्षण उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यानंतर अयोध्या, मथुरा, वाराणसी यांसारख्या हिंदूंच्या प्रमुख तीर्थस्थळांची हेतूतः उपेक्षा करण्यात आली. त्यांचा विकास तर कुंठलाच; पण प्रसिद्धीअभावी ही शहरे पर्यटकांच्या मनातूनही अंतर्धान पावली. अयोध्या नावाचे एक शहर खरोखरंच भारतात आहे का, अशी शंका निर्माण झाली होती. पुढील वर्षी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे निर्माणकार्य पार पडल्यावर त्या शहरात पर्यटकांचा (भाविकांचा) प्रचंड पूर येईल आणि राम मंदिर ही भारतातील सर्वाधिक भेट दिली जाणारी वास्तू ठरेल, यात शंका नाही.
त्यासाठी गेली दोन-तीन वर्षे अयोध्येचा कायापालट करण्याचे काम जोमदारपणे होत आहे. अयोध्येतील रस्ते केवळ रुंदच होत आहेत, असे नव्हे, तर ते अधिक सुशोभितही होत आहेत. धनुष्यबाणाच्या डिझाईनने रस्त्यावरील दिव्यांचे खांब सजत आहेत. भिंतींवर रामकथेतील प्रसंग चितारले जात आहेत. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून अयोध्येला दर दिवाळीत लक्षावधी दिव्यांनी उजळवून टाकण्यात येत आहे. गतवर्षी दिवाळीच्या दिवशी शरयू तीरावर तब्बल पाच लक्ष दिवे पेटविण्याच्या जागतिक विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर अयोध्येजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहात असून, तो येत्या दोन वर्षांत कार्यान्वित केला जाईल. याशिवाय उज्जैन या महत्त्वाच्या तीर्थस्थळाचा मोठा विकास घडवून आणण्यात आला आहे. तेथील महाकाल या ज्योतिर्लिंग मंदिराला लागूनच भव्य कॉरिडोर बांधण्यात आला आहे.
या सर्व घटनांनी भारतीयांमध्ये आपल्या तीर्थस्थळांना भेट देण्याची ऊर्मी नव्याने जागृत झाली आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात अनेक प्राचीन मंदिरे ही अंगावर कोरीव शिल्पे लेवून उभी आहेत. त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणल्यास त्यांना पाहण्यासाठी देशीच नव्हे, तर परदेशी पर्यटकांची रीघ लागेल. केवळ प्रमुख तीर्थस्थळेच नव्हे, तर अनेक अप्रतिम वास्तू, मंदिरे, लेणी वगैरे वास्तू या पर्यटनाच्या प्रेरणा बनू शकतात. इतकेच नव्हे, तर नवरात्र, गणेशोत्सव, कुंभमेळ्यासारखे धार्मिक उत्सव हेही पर्यटनाला चालना देणारे ठरतात.
मात्र, देशी-परदेशी पर्यटकांपुढे या गोष्टी योग्य पद्धतीने सादर केल्या जाण्याची गरज आहे. बृहदिश्वराचे अद्भुत मंदिर, अजिंठा-वेरूळची अप्रतिम लेणी, रामेश्वर मंदिरांतील एकसारखे शेकडो खांब यांसारखी प्राचीन शिल्पे तसेच माहेश्वर, वाई यांसारख्या शहरांतील सुंदर घाट, भेडाघाट, नर्मदा परिक्रमा, कैलास-मानसरोवर यात्रा यांसारखे अनेक सांस्कृतिक उपक्रम, हे जगाला भारताची नवी सांस्कृतिक ओळख करून देणारे ठरतील. याकामी सामाजिक माध्यमांचा वापर मोलाची भूमिका पार पाडू शकतो.