काव्यचित्रांचे नवे सरोवर!

    11-Jul-2025   
Total Views | 43

मराठी काव्यविश्वामध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग रसिकांनी अनुभवले आहेत. आशयनिमिर्तीच्या दृष्टीने जसे अनेक प्रयोग यशस्वी झाले, तसेच कविता या साहित्यप्रकाराकडे बघताना, त्याचं वेगळेपण लोकांसमोर आणण्याचा विचारसुद्धा अनेकांनी केला. हेमंत जोशी यांनी या प्रयोगाची पुढची पायरी गाठली असून, दृश्य कवितेचा नवा अध्याय ते आता वाचकांच्या हाती देणार आहेत. ‘ग्रंथाली प्रकाशना’च्या माध्यमातून त्यांच्या ‘दृककाव्य’ या नवीन कवितासंग्रहाचे आज, दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील एनसीपीए लिटिल थिएटर येथे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत जोशी यांनी साधलेला विशेष संवाद...

आपल्या पुस्तकाचे नाव ‘दृककाव्य’ आहे. तेव्हा, या पुस्तकामागची संकल्पना नेमकी काय आहे?

- ‘Every image is a poem and every poem is an image’ ही संकल्पना या काव्यसंग्रहाच्या मुळाशी आहे. कवितेच्या मुळाशी असलेला दृश्यभाव हा विचार मी ‘दृककाव्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. फ्रेंच कवी Gaillaum Apollinaire  याने त्याच्या ‘Calligrammes’ या काव्यसंग्रहात अक्षररचनेतून दृश्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या रचनांच्या माध्यमातून त्याने दृश्यात्मकता लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. हाच धागा पकडून कवितेत दडलेला दृश्य भाव किंवा चित्रात दिसणारे संदर्भ उलगडणारी शब्दरचना एकत्रित मांडली, तर एक वेगळा अनुभव निर्माण होऊ शकतो, तो रसिकांना एका वेगळ्या अनुभवविश्वाकडे घेऊन जाऊ शकतो, ही या काव्यसंग्रहामागची संकल्पना.

‘दृककाव्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना आपण काय देऊ इच्छिता?

कविता म्हटलं की निसर्ग, प्रेम हे सगळे विषय सर्वसाधारणपणे आपल्याला वाचायला मिळतात. परंतु, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या जीवनात आणि आपल्या अवतीभोवती अनेक प्रतिमा अस्तित्वात आहेत. या प्रतिमांचा विचार करायचा झाल्यास असे लक्षात येते की, यातील प्रत्येक वस्तू, विचार यांमधून एक वेगळा आणि टोकाचा सौंदर्यानुभव आपण घेऊ शकतो. काहीतरी वेगळं वाचल्याचा, बघण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ, आपण बघू शकतो की, एका चित्रामध्ये कॉफीमेकरच्या तोंडातल्या सिगारेटमधून ढग बाहेर पडत आहेत. ही एक वेगळी कल्पना आहे. यामध्ये दृश्य आणि काव्य या दोन्ही गोष्टींचा मिलाप आपल्याला बघायला मिळतो. या दृश्याकडे बघताना कवी म्हणतोय,

उदाहरणार्थ कॉफीमेकर.
तोंडातल्या सिगारेटमधून
ढग बाहेर पडले
सुरू झाला कॉफीचा पाऊस
पहिल्या घोटातच आ वासून
जांभया देणारा कप
ताजातवाना झाला.


आपल्या या पुस्तकाची प्रेरणा नेमकी काय आहे?

रवींद्रनाथ टागोरांची ‘गिरगिट चित्र’ ही या संपूर्ण संग्रहाची प्रेरणा आहे, असे मानायला हरकत नाही. आता ‘गिरगिट चित्र’ म्हणजे काय, तर टागोरांना कधीकधी न रुचलेले शब्द, तर कधी ओळीच्या ओळी ती गिरगिटवून काढायचे, म्हणजेच पानाच्या एका बाजूला काही विशिष्ट आकृत्या ते काढायचे. त्यांच्या अशा या गिरगिटण्यातून अनेक अमूर्त आकार चित्ररुपात दिसू लागले. आपण जर त्या पानांकडे बघितले, तर आपल्याला असे दिसेल की, टागोरांच्या त्या कविता आणि चित्रांचा तसा एकमेकांशी काही संबंध नव्हता. मात्र, शब्दांवर प्रकट होणारा आशय आणि चित्र हे एकरुप झालेले आपल्याला दिसून येतात. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘पूरबी’ या हस्तलिखितामध्ये ही ‘गिरगिट चित्रं’ आपल्याला सापडतात. रवींद्रनाथ यांची साहित्यिक प्रतिभा कमालीची हृदयस्पर्शी होती. मात्र, चित्ररुपात असलेली त्यांची अभिव्यक्तीसुद्धा तितकीच संवेदनशील आहे, असं मला वाटतं. रवींद्रनाथ टागोर वयाच्या उत्तरार्धात चित्रकलेकडे वळले. हे सर्व घडणं आश्चर्यकारक होतं. ते चित्रकलेकडे वळले, ते अशा गिरगिट चित्रांतून. दृश्य आणि काव्य यांचा हा संगम ही माझी प्रेरणा आहे. या संग्रहात एके ठिकाणी रेषेतून साकारलेल्या चित्रावर शब्दांची मांडणी केली आहे. इथे फक्त रेषेद्वारे आशयाला भिडण्याचा प्रयत्न केला आहे.

कविता आणि चित्र या दोन गोष्टींमधल्या नात्याकडे तुम्ही कसे बघता?

मला असं वाटतं की, कविता आणि चित्र या दोन गोष्टींना आपण एकमेकांपासून दूर करू शकत नाही. माझ्या या संग्रहात चित्र आणि कविता सहचर आहेत. म्हणजेच एकमेकांना पूरक आहेत. या संग्रहात असलेले शब्द चित्रातील अचूक जागा हेरतात, तर दुसर्‍या बाजूला चित्र हे शब्दांतील भावार्थ अत्यंत खुबीने समोर आणतात. या दोन्ही गोष्टींमुळे चित्राची चौकट समृद्ध होते, असे मला वाटते. माझ्या कवितासंग्रहामध्ये आपल्याला चित्रांवर शब्द आरूढ झालेले दिसतात, तर कुठे ते चित्रासोबत विहरतात. दुसर्‍या बाजूला चित्रापासून ते थोडे अंतरसुद्धा ठेवतात. या सगळ्या प्रवासातून आशयाच्या दृष्टीने अपेक्षित परिणाम साधला जातो, असं मला वाटतं.

आम्हाला आपल्या पुस्तकनिर्मितीची प्रक्रिया जरा सविस्तर उलगडून सांगता का?

या कवितासंग्रहाची निर्मिती करताना अनेक वेगवेगळ्या टप्प्यांतून मला जावं लागलं. या कवितासंग्रहाची मांडणी अत्यंत कल्पकतेने केली. कारण, मला लोकांच्या समोर दृश्य कविता हा प्रकार सादर करायचा होता. इतयात तरी अशा पद्धतीचा प्रयोग झाला असेल, असं मला वाटत नाही. या कवितासंग्रहाच्या निर्मितीमध्ये मी प्रयोगांना मोकळीक दिली आहे. एका चित्रकाव्यात चक्क शब्द उलटे छापले. त्या उलटेपणातही आशय अप्रतिम साधला गेला आहे. एका चित्रावर फक्त विरामचिन्ह आहेत आणि दृश्य अनुभव एका वेगळ्या अर्थाने दाद घेऊन जातो. या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या कुठल्याही चित्रकाव्याला शीर्षक नाही, अनुक्रमणिका नाही, पानावरचे क्रमांकदेखील एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एका अर्थाने माझ्या या मांडणीतून ‘मॉडर्न व्हिज्युअल पोएट्री’चे पहिले पाऊल अत्यंत दमदारपणे टाकले आहे. अनेक अर्थांनी आपलं वेगळेपण सिद्ध करणारा हा ‘दृककाव्य’ संग्रह मराठी भाषेतला पहिला ‘मॉडर्न व्हिज्युअल पोएट्री’च मान मिळवणार, हे नक्की!

पुस्तकनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता आपल्या भावना काय आहेत?

पुस्तकनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं आणि हटके, वाचकांच्या हाती देता आलं, याचा आनंद आहे. सर्जनशील विचारांना सीमांचं बंधन नसतं. हे मोकळेपण वाचकांनीसुद्धा अनुभवायला हवं. मी माझ्या बाजूने हे देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्येष्ठ गझलकार, कवी चंद्रशेखर सानेकर यांनी कवितेच्या अंगाने लिहिलेल्या प्रस्तावनेमुळे चित्रकाव्यातल्या नव्या वाटा अधिक डोळसपणे वाचकांना न्याहाळता येतील. कविताविश्वातल्या काही अंशी विषयांच्या मांडणीच्या त्याचत्याचपणाला बाजूला सारून असे नवे नवे प्रयोग घडावेत, यासाठी ‘दृककाव्य’ नक्कीच वाट मोकळी करून देणारा ठरेल.

९९६७८२६९८३

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121