रोजगार-स्वयंरोजगार या क्षेत्रांमध्ये काम करणार्या महिलांना परंपरागत स्वरुपाचा व कमी उत्पन्न देणार्या क्षेत्रांपासून अधिक आर्थिक उत्पन्न देणार्या कामकाजाकडे काम करण्यास प्रवृत्त करायला हवे. त्यांना असलेला अनुभव व त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्राप्त केलेले कौशल्य अधिक उत्पादक व परिणामकारक स्वरुपात कसा उपयोग केला जाऊ शकेल, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवी.
नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या महिला कामगार आणि त्यांची संख्या व सद्यःस्थिती यासंदर्भातील अहवालानुसार, रोजगार-स्वयंरोजगारासह काम करणार्या महिलांच्या संदर्भात लक्षणीय स्वरुपात बदल झाले आहेत. या अहवालातील तथ्य आणि तपशिलाने स्वतःचे कामकाज करणार्या अथवा कामगार-कर्मचारी म्हणून काम करणार्या महिलांच्या सद्यःस्थितीवर प्रकाशझोत टाकण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
अहवालात प्रामुख्याने नमूद केलेल्या आकडेवारीनुसार, रोजगार-स्वयंरोजगारासह काम करणार्या महिलांची संख्या आणि टक्केवारीत २०१६-१८ मध्ये १६ टक्के २०२१-२२ मध्ये २१ टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे भारतातील महिलांच्या बेरोजगारीची टक्केवारी वरील कालावधीत चार टक्क्यांहून दोन टक्के इतकी झाली आहे. ही संख्या व टक्केवारी कोरोना काळानंतर साध्य झाली असल्याने विशेषतः महिलांच्या संदर्भात ही बाब विशेष आशादायी ठरली आहे.
महिला कामगारांच्या आकडेवारीसह केलेल्या अभ्यासानुसार सद्यःस्थितीत देशातील कामकाजी महिलांची संख्या सध्या सुमारे अडीच कोटी असून, यामध्ये नव्याने कामावर लागलेल्या महिलांचा समावेश आहे. वर नमूद केलेल्या आकडेवारीनुुसार कोरोनादरम्यान व त्यानंतरच्या काळात महिलांच्या या संख्येत वाढ होण्याचे कारण कोरोना ठरले आहे. या संदर्भात अहवालातच नमूद केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे वा त्यानंतर मोठ्या संख्येत बेरोजगारी निर्माण झाली. यात विशेषतः घरच्या पुरूष मंडळींचे रोजगार काही काळासाठी, तर बरेचजणांचे रोजगार कायमस्वरूपी गेले. त्यामुळे घर-संसार चालविण्यासाठी अथवा घराला हातभार लावण्यासाठी महिलांना रोजगार-स्वयंरोजगार क्षेत्रात पुढाकार घ्यावा लागला. रोजगार करणार्या महिलांची संख्या व टक्केवारी त्यामुळे मुख्यतः वाढत गेली, हे स्पष्ट आहे.
यासंदर्भात स्पष्ट झालेली महत्त्वाची बाब म्हणजे, कामकाज करणार्या महिलांमध्ये सर्वाधिक संख्या कृषी क्षेत्रात वाढलेली आहे. अहवालातील टक्केवारीनुसार कृषी क्षेत्रात व विशेषतः कृषी-रोजगार क्षेत्रात महिलांची टक्केवारी कोरोनापूर्व काळ म्हणजेच २०१६-१८ मध्ये ५६ टक्के इतके प्रमाण होते. हीच टक्केवारी कोरोनानंतरच्या काळात म्हणजेच २०२१-२२ मध्ये ६३ टक्क्यांवर आली. तुलनात्मदृष्ट्या वरील कालावधीत कामकरी पुरुषांचे प्रमाण ४० टक्क्यांहून ३६ टक्क्यांपर्यंत झाले आहे. महिला आणि पुरुषांच्या संदर्भातील टक्केवारीतील हा तपशील व चढ-उतार पुरेसा बोलका आहे. याउलट परंपरागत स्वरुपात पुरुषांचे प्राबल्य असणार्या बांधकाम व गृहनिर्माण, व्यापार-व्यवसाय खानपान सेवा, वाहतूक क्षेत्र, संचार क्षेत्र इ. व्यवसाय क्षेत्रात मात्र पुरुषांचे प्राबल्य कायम असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीयस्तरावरील या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कामकर्यांंची अस्थायी कामगार, पगारदार, चाकरमानी व स्वयंरोजगारासह काम करणारे, अशी विभागणी सर्वसाधारणपणे करण्यात आली. या विभागणीवर आधारित प्रामुख्याने दिसून आलेली बाब म्हणजे महिलांची संख्या अस्थायी कामगार क्षेत्रात सहा टक्के, तर पगारदार चाकरमानी क्षेत्रात प्रमाण चार टक्क्यांनी घटल्याचे आढळून आले आहे.
याउलट उल्लेखनीय बाब म्हणजे, स्वयंरोजगार करणार्या महिलांची संख्या दहा टक्क्यांनी वाढून थेेट ६२ टक्क्यांपर्यंत गेली. त्याचा अधिक तपशील बघता स्पष्ट होणारी बाब म्हणजे, या महिला घरी वा घरगुती स्वरुपाचे, असे स्वयंरोजगार करीत असून, त्यापैकी सुमारे ४० टक्के महिलांनी आपल्या छोट्या स्वयंरोजगारातून गरजू महिलांना रोजगार देण्याचे मोठे काम केले आहे. याचाच परिणाम स्वयंरोजगार करणार्या महिलांची संख्या वाढण्यात झाला आहे.
हीच बाब ग्रामीण महिलांच्या संदर्भात दिसून आली आहे. रोजगार-स्वयंरोजगाराच्या संदर्भात ग्रामीण महिलांच्या टक्केवारीची वाढ सुमारे २२ टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाकाळानंतरची ही वाढ उत्साहवर्धकच नव्हे, तर आश्चर्यकारक ठरली आहे. मात्र, याच दरम्यान ग्रामीण पुरुषांचे रोजगार-स्वयंरोजगारातील प्रमाण मात्र कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
वरील आकडेवारी व तपशिलांवरून दोन बाबी प्रामुख्याने स्पष्ट होतात. एक बाब म्हणजे, कामकाज करण्याकडे पाहण्याचा महिलांचा दृष्टिकोन कोरोनामुळे आणि त्या कारणाने पुरतेपणी बदलला आहे. दुसरी बाब म्हणजे, या बदलत्या परिस्थितीत महिलांनी स्वयंरोजगाराला रोजगाराचा पर्याय म्हणून पुरतेपणी स्वीकारले आहे. याचे एक व्यावहारिक कारण कोरोनामुळे घरगुतीस्तरावर महिलांना मोठा आर्थिक फटका बसला, यावर पर्याय स्वरुपात त्यांनी रोजगाराला प्राधान्य दिले आहे.
याशिवाय महिलांच्या दृष्टीने व यासंदर्भात महत्त्वाचा व परिणामकारक मुद्दा म्हणजे, त्यांच्या रोजगार-स्वयंरोजगाराचे काम त्या फावल्या वेळात, अल्प काळात व अधिकांशपणे घरी राहून करू शकतात. ही बाब त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरते व ती घर आणि घरच्यांना सोयीची ठरते, हे विशेष. याशिवाय असे प्रयत्न या महिलांना आर्थिक स्रोत आणि उत्पन्न देण्याचे साधन ठरले आहे. त्यामुळे महिला वर्ग वाढत्या संख्येत कायम स्वरुपात स्वयंरोजगार वा कुटिरोद्योग क्षेत्राकडे वळू लागला आहे. अर्थात यासाठी त्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागले.
रोजगार-स्वयंरोजगाराच्या संदर्भात लक्षात आलेली अन्य बाब म्हणजे, ही दोन्ही कामे करणार्या महिलांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी त्यांच्या उत्पन्नामध्ये व रोजगारामध्ये मात्र घट झालेली आहे. तुलनात्मक आकडेवारीसह सांगायचे म्हणजे, स्वयंरोजगार करणार्या महिलांचे मासिक उत्पन्न २०२१ मध्ये ५ हजार,४०७ रुपयांहून २०२२ मध्ये ५ हजार, ३११ रुपयांवर आले आहे. याचाच अर्थ म्हणजे गेल्या काही वर्षांत कामकाजी महिलांना प्रयत्न व परिश्रम करून पण अपेक्षित-आवश्यक एवढे अर्थार्जन त्या करू शकल्या नाहीत. यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, महिलांचे कृषी क्षेत्रात काम करण्याचे वाढते प्रमाण व तेथे मिळणारा अनियमित रोजगार व वेतनमान. त्यातही स्वयंरोजगार वा कुटिरोद्योग स्वरुपात काम करणार्या महिलांना व्यवसाय-उत्पन्नाशी संबंधित महिलांचे उत्पन्न नोकरदार महिलांच्या तुलनेत बरेचदा कमी असते. त्यामुळे एका मोठ्या आव्हानपर परिस्थितीत या महिला काम करीत असतात.
अभ्यासात आढळल्यानुसार, छोट्या स्वरुपाचा वा घरगुती व्यवसाय करणार्या महिलांपैकी अधिकांश महिला या नाईलाजाने व घराला हातभार लावण्यासाठी, असे काम स्वयंप्रेरणेने करतात. मात्र, त्यांचे प्रयत्न आणि उत्पन्न या दोन्हीची अपेक्षित स्वरुपात दखल घेतली जात नाही. त्यामुळे बर्याच महिलांचा हिरमोड होतो.
यावर मात करण्यासाठी रोजगार-स्वयंरोजगार या क्षेत्रांमध्ये काम करणार्या महिलांना परंपरागत स्वरुपाचा व कमी उत्पन्न देणार्या क्षेत्रांपासून अधिक आर्थिक उत्पन्न देणार्या कामकाजाकडे काम करण्यास प्रवृत्त करायला हवे. त्यांना असलेला अनुभव व त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्राप्त केलेले कौशल्य अधिक उत्पादक व परिणामकारक स्वरुपात कसा उपयोग केला जाऊ शकेल, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवी. या प्रोत्साहनपर प्रयत्नातून कामकाजी महिलांना त्यांच्या प्रयत्नांना पूरक, असे फायदे निश्चितपणे मिळू शकतात.
कामकाजी महिलांची संख्या वाढत असताना त्यांच्या कौशल्याला चालना द्यायला हवी. असे प्रयत्न ज्या ठिकाणी झाले, त्या ठिकाणी महिलांनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ झालेला दिसून येतो. अशा महिलांना आर्थिक साक्षरतेसह बचतीसह आर्थिक व्यवहारांची सवय लावली, तर त्यामुळे या महिला खर्या अर्थाने आत्मनिर्भर बनू शकतात. यातूनच कामकाजी महिलांची स्थिती सुधारून प्रगती होऊ शकते.
-दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन