दरडग्रस्त इर्शाळवाडीचे ‘संकटमोचक’

    20-Jul-2023
Total Views | 62
Girish Mahajan
 
गुरूवारची रात्र महाराष्ट्रासाठी काळरात्र ठरली. डोंगर कोसळून इर्शाळवाडी गाव गाडले गेले. दरम्यान, या दुर्घटनेत मध्यरात्री 3 वाजल्यापासून राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन मदत कार्यात सहभागी होते. काळजाला चटका लावणार्‍या या दुर्घटनेचा हा थरारक अनुभव मंत्री गिरीश महाजन यांच्याच शब्दात...
 
गुरुवारची रात्र महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी घेऊन आली. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समजली, घटनेची माहिती मिळताच लगेच तातडीने मी रात्रीच घटनास्थळी जाण्यासाठी निघालो, रात्री 3 वाजण्याच्या दरम्यान मी इर्शाळवाडीला पोहोचलो. घटनास्थळी तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले. मी व आमदार महेश बालदी आम्ही वरती जाण्याचा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत, ते मदतकार्यावर पूर्ण लक्ष ठेवून आहेत व मागणीनुसार तातडीने मदत पोहोचवत आहेत.
 
 
 
मोबाईल बॅटरीच्या उजेडात वाट काढत आम्ही घटनास्थळी पोहोचलो. खाली पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. सीओ, पोलीस अधीक्षक, एसडीओ, तहसीलदार आदी अधिकारी व कर्मचारी होते. तुफान पाऊस सुरू होता, जोराचा वारा, सर्वत्र अंधाराचं साम्राज्य. डोंगराळ भाग, घटनास्थळी पायी जावे लागणार होते. जाण्याकरिता साधारणतः तीन फुटाचा रस्ता, बाजूला खोल दरी, सोसाट्याचा वारा, पायी चालतानासुद्धा भीती वाटेल असा प्रसंग. अचानक कुठे दरड कोसळेल, याचा काही नेम नव्हता. त्याची तयारी ठेवून वरती जाण्याकरिता निघत असताना पोलिसांनी धोक्याची सूचना दिली. या तुफान पावसात अचानकपणे कधीही दरड कोसळू शकते, असा इशाराही दिला.
 
 
 
जवळच्या गावांमधून 50 ते 60 गावकर्‍यांची टीम मदतीकरिता जमवली, तोपर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत ‘एनडीआरएफ’चे पथक आमच्या मदतीला पोहोचली. डोंगराळ भाग असल्यामुळे बचाव कार्यासाठी जेसीबी वगैरे यंत्रांचा वापर शक्य नव्हता. खराब हवामान व लॅण्डिंगकरिता जागा नसल्यामुळे हेलीकॉप्टरची मदत घेता येत नव्हती. शेवटी कसल्याही अत्याधुनिक तांत्रिक मदतीविना, जीवाच्या आकांताने बचावकार्य सुरू केले. मातीचा मलबा आम्ही घाईने उपसू लागलो. जेवढा मलबा उपसत होतो. त्यापेक्षा जास्त मलबा वरतून परत जमा होत होता. मदतकार्य करणारे पुढे जात असताना निसरड्या वाटेवरून घसरून पडत होते. सगळी परिस्थिती हाताबाहेरची होती. साधारणतः 250 लोक वस्तीचा हा पाडा आहे. 60 ते 70 व्यक्ती कामामुळे पाड्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे, त्यामुळे या व्यक्ती सुदैवाने या दुर्घटनेतून वाचल्या. परंतु, तरीही या ढिगार्‍याखाली किती लोक दबली गेली आहेत, याचा अंदाज बांधणे कठीण होते.
 
 
सकाळपर्यंत आजूबाजूच्या गावांतील मंडळीसुद्धा घटनास्थळी जमली. प्रत्येकजण आपल्या आप्तस्वकीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. सुमारे 75 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करून देण्यात आली आहे. बचावकार्य सुरू असताना नऊ जणांचे मृतदेह हाती लागले, अशा परिस्थितीमध्ये मृतदेह ठेवण्याकरिता काही व्यवस्था करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीमध्ये सर्वांशी बोलून सामूहिक दफन विधी करण्याशिवाय पर्याय नव्हता. दफनविधी करावा असे ठरल्यावर खड्डे खोदले. परंतु, पाऊस सुरू असल्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत होते. ते पाणी आम्ही उपसत होतो, अशा परिस्थितीमध्ये आम्हीच ते मृतदेह दफन केले.वाट खूप चढाची असल्यामुळे वरती जाण्याची वाट खूप कठीण होती. वरती चालत जात असताना खूप दम लागत होता. आम्ही शोधकार्यासाठी वरती जात असताना आमच्या मागेच 100-200 फुटावर असणारा आमच्या सोबतच्या अग्निशामक दलाच्याकर्मचार्‍याला हृदय विकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले. अशा दुर्दैवी घटना आमचे मनोबल खच्चीकरण करणार्‍या होत्या. गावातील शाळेच्या इमारतीमध्ये गावातील सहा मुले झोपलेली होती. सुदैवाने तीच फक्त या दुर्घटनेमधून सुरक्षित राहू शकली. जेव्हा ही दुर्घटना घडली त्यावेळेस दरड कोसळल्याच्या आवाजामुळे जागे होऊन त्यांनी गडाच्या पायथ्याशी असणार्‍या जवळच्या लोकांना कळवले. 
 
संकटकाळी लोकांच्या मदतीस जाणे, हा मानवीय स्वभाव आहे. म्हणूनच केरळ असो किंवा सांगली, कोल्हापूरची पूरपरिस्थिती असा. माळीणची दुर्घटना, महाडचे धरण फुटणे, बुलढाणा-शिरपूर येथील अपघात काहीही संकट असो, लोकांना संकटामधून वाचवण्यास त्यांच्या मदतीस माझ्यापरीने मी प्रयत्नशील असतो. माझ्याकडून जेवढे जास्तीत जास्त शक्य होईल, ते करायचा माझा प्रयत्न असतो.
 
गिरीश महाजन
(लेखक महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आहेत.)
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्रात ४ वर्षांत ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता

महाराष्ट्रात ४ वर्षांत ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता

गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रातून ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात नागपूर शहरातील ५ हजार २२७ महिला आणि अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत ४१ हजार १९३ मुला-मुलींचा शोध लावला असून, आता महिलांसाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १७ एप्रिल ते २५ मे या कालावधीत ४ हजार ९६० महिला आणि १३ हजार ६४ बालकांचा शोध लावण्यात यश आले. विशेष म्हणजे, नोंद नसलेल्या ७०३ बेपत्ता बालकांचाही शोध लागला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121