“समाज निरोगी राहावा, यासाठी व्यायामाचा प्रसार-प्रचार करण्याचे काम बजरंगबलीने मला दिले आहे,” असे सांगत तरुणाईला फिटनेसचे धडे देणारे व बॉडीबिल्डर घडवणारे गोपाळ गायकवाड यांचा प्रवास...
गोपाळ दशरथ गायकवाड निफाडमधील कुंदेवाडीचे. त्यांचे शालेय शिक्षण अकोला जिल्ह्यात मूर्तीजापूर येथे झाले. त्यांचे वडील रेल्वेत ‘टीटी’ आणि त्याकाळाचे कुस्तीगीर होते. साहजिकच गोपाळ यांना वयाच्या सातव्या वर्षापासूनच व्यायामाची आवड. घरातून तालिमीचे बाळकडू मिळतच होेते. बालपणापासून गोपाळ दंडबैठका मारत. पिळदार शरीराची देणगी त्यांना रक्तातूनच मिळाल्याने आणि नियमित व्यायामाने त्यांचे स्नायू, शरीर पिळदार आणि बलदंड होत गेले. त्यावेळी आधुनिक व्यायामशाळा त्यांच्या गावी नसल्यामुळे गोपाळ यांनी व्यायामाची उपकरणे, डंबेल्स, दगडी प्लेट्स स्वत: तयार करून वर्गमित्रांनाही व्यायामासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या १७व्या वर्षी त्यांना पिळदार स्नायूंचे प्रदर्शित करून शरीरसौष्ठव स्पर्धा खेळवली जाते असे समजले.
त्यातच रस असल्याने त्यांनी १९८८ मध्ये एका स्थानिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेत तिसर्या क्रमांकाचे पारितोषिकही मिळवले. नंतर नाशिक जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत ते भाग घेत गेले. तिथूनच गोपाळ यांचा शरीरसौष्ठव क्रीडा स्पर्धेचा प्रवास सुरू झाला. नंतर त्यांनी ‘ज्युनियर नाशिक श्री’चा किताब दोन वेळेस पटकावला. तीन वेळेस ‘सिनीअर नाशिक श्री’चा किताबही मिळवला. राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र श्री सुवर्ण पदके’ दोन वेळेस तसेच ‘वेस्टर्न मिस्टर इंडिया’ स्पर्धेत रौप्य पदकाचे मानकरी ठरले. जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘बेस्ट पोझर’ म्हणून ५० हून अधिक वेळा त्यांनी बहुमान मिळवला. जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत २७ वेळा मुख्य किताबाचा मान त्यांच्याच नावावर आहे. व्यायामाचे शास्त्रशुद्ध ज्ञान आणि अंगमेहनत यामुळे गोपाळ यांना आधुनिक जीममध्ये प्रशिक्षक म्हणून कामाची संधी चालत आली.
विवाहानंतर गोपाळ नाशिक शहरात स्थायिक झाले. त्यानंतर प्रपंच आणि सौष्ठवपटू म्हणून सिद्ध करताना त्यांनी मोठा संघर्ष केला. मात्र, तरीही व्यायाम कधीच सोडला नाही. आवडीलाच करिअर करून त्यांनी स्वत:ची अत्याधुनिक व्यायामशाळा सुरू केली. अल्पावधीतच त्यांच्या मार्गदर्शनात शरीरसौष्ठवपटू, पॉवर लिफ्टर घडत गेले. किताब विजेते शरीरसौष्ठवपटू आणि व्यायामशाळेचे अभ्यासू संचालक म्हणून त्यांना अनेक ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलवले जात. आजवर गोपाळ यांच्या मार्गदर्शनात शेकडो सौष्ठवपटू निर्माण झाले आहेत. त्यातील अनेक जणांनी बॉडिबिल्डिंगमध्ये मानाचे किताब पटकावले. याबद्दल गोपाळ सांगतात, “आजारी व्यक्तीला डॉक्टर बरे करून नवजीवन देतात. म्हणून डॉक्टरांना कियमागार मानतात.
मी अनेकांना आजारी पडूच नये म्हणून निरोगी, निरायम राहण्यासाठी व्यायामाचे धडे देतो. त्यामुळे व्यक्तीला डॉक्टरांकडे जाण्याची गरजच भासत नाही, शिवा व्यायमाने त्यांना शरीरयष्टीही कमावून देतो. त्यातून मिळणारे समाधान मला ’नोबेल’ पेक्षाही मोठे आहे.” गोपाळ गायकवाड त्यांच्याकडे व्यायामासाठी येणार्या तरुणाईला चंगळवादी संस्कृतीपासून दूर करून युवावर्गाचे चारित्र्यनिर्माण, मूल्यपेरणी, संस्कार, भारतीय अध्यात्म, आदर्शवाद रुजवण्यासाठी त्यांच्या पालकांचीही भूमिका निभावत असतात. त्यामुळे ते आज अनेकाचे केवळ व्यायाम गुरू नसून जीवनगुरूही आहेत. सध्या ‘मस्क्युलर’ होण्यासाठी अनेक तरुण उत्तेजक पदार्थाचे सेवन करतात. मात्र, गोपाळ सांगतात की, ’‘दीर्घकाळ ’फिट आणि फाईन’ राहण्यासाठी अशा उत्तेजक पदार्थांची तसूभरही गरज नसते, हे मी माझ्या कृतीतून जगाला दाखवून दिले आहे.” गोपाळ आपले वडील आणि १९५२ मधील ‘मिस्टर यूनिव्हर्स’ १०४ वर्ष आयुष्य जगणारे मनोहर एैच यांना आदर्श मानतात.
फूड सप्लीमेंटचे सेवन करण्याबाबत त्याची वेगळी भूमिका आहे. “स्टेरॉईड विरहित सप्लीमेंट प्रमाणात घेतल्यास हरकत नाही. मात्र, कमी वेळात स्नायू कमवण्याच्या नादात तरुणाई अती फूड सप्लीमेंट घेते ते चुकीचेच आहे. त्यातून मानसिक परिणाम खेळांडूमध्ये दिसून येतात,” असे ते सांगतात.
शरीरसौष्ठवाच्या प्रचार, प्रसारातून लोकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणूनच आपल्याला लाभलेले आरोग्य इतरांनाही मिळावे, यासाठी ते आरोग्यातून समाजप्रबोधन म्हणून सामाजिक कार्य करत आहेत. नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे ते आज सरचिटणीस म्हणून योगदान देत आहेत. आजवर विविध आयोजकांनी आयोजित केलेल्या शेकडो बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धेत त्यांनी भरीव योगदान दिले असून गेल्या सहा महिन्यांत जिल्हा स्तरावर १२ तर राज्यभर १८ शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वी करत त्यांनी वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे. कुठलेही मानधन न घेता, स्वखर्चाने ते बॉडिबिल्डिंगसंबंधी कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे घेणे अशी कामे अविरतपणे करत आहेत. या प्रवासात आई-वडील पत्नी आणि आपली मुले यांच्यामुळेच इथवर पोहोचू शकलो हे सांगण्यास ते विसरत नाही.
“समाज निरोगी राहण्यासाठी व्यायामाचा प्रसार-प्रचार करत राहणे हे माझे पहिले आणि अंतिम ध्येय आहे. बॉडिबिल्डिंगच्या माध्यमातूनच नावारुपाला आलो, त्या क्षेत्राचे मी देणे लागतोे. म्हणूनच हेच कार्य शेवटच्या क्षणापर्यंत करत राहणार,” असे गोपाळ गायकवाड सांगतात. नाशिकमधून अधिकाधिक शरीरसौष्ठवपटू घडवून शहराचे नाव देशासह जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांना असंख्य शुभेच्छा!