यू - विन पोर्टलव्दारे नियमित लसीकरणामध्ये डिजिटलायझेशन

    17-Jul-2023
Total Views | 68
regular-vaccination-work-will-be-done-from-u-win-portal


मुंबई
: नियमित लसीकरणात नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ मिळावा व लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता योग्य खबरदारी घेत आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या दर महिन्याला बैठक होऊन आढावा घेतला जात असतो.

या लसीकरण कार्यवाहीत अधिक सुधारणा करीत भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 ऑगस्ट 2023 पासून संपूर्ण देशभरात यू-विन (U-WIN) पोर्टल सुरू केले जाणार आहे. यामुळे मुलांना लसीकरण करण्यासाठी पालकांना लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. तसेच माता बाल संगोपन कार्ड जपूनही ठेवावे लागणार नाही. यू-विन पोर्टलवर मुलांसाठी सर्व प्रकारच्या लसी मिळविण्याबाबत संपूर्ण माहिती असेल. महत्वाचे म्हणजे हे आपल्या निवासी जिल्ह्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही जिल्हा किंवा राज्यातील रुग्णालयात पाहिले जाऊ शकते.

प्रत्येक बालकाचे लसीकरण व्हावे व बाळाचे आरोग्य रक्षण व्हावे याविषयी शासन अत्यंत सतर्क असून लसीकरणाकडे विशेष लक्ष देत आहे. या यू – विन पोर्टलची संपूर्ण माहिती होण्याकरिता शासनाच्या वतीने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

अशाच प्रकारचे यू-विन पोर्टलविषयक विशेष प्रशिक्षण सत्र नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या मार्गदर्शनानुसार, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण सत्रात यू-विन पोर्टलच्या जिल्हा समन्वयक श्रीम. शेफाली गडपायले यांनी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, एल.एच.व्ही व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना यू-विन पोर्टलविषयी सविस्तर माहिती देत प्रशिक्षित केले.

ऑनलाइन रेकॉर्ड उपलब्धता

यू-विन पोर्टलवरून गरोदर माता आणि बाळाची लसीकरणाची नोंद ऑनलाइन उपलब्ध होईल. हा रेकॉर्ड यू-विन पोर्टलव्दारे ठेवला जाईल. विशेष बाब म्हणजे यू-विन पोर्टल अंतर्गत लाभार्थ्यांच्या लसींची रिअल-टाइम एन्ट्री केली जाईल. या पोर्टलवर गरोदर माता आणि मुलाची नोंदणी केली जाईल. हे पोर्टल करोनाकाळात लसीकरणासाठी असलेल्या को-विन पोर्टलप्रमाणेच काम करेल. यू-विन पोर्टल हे आधार कार्डशी लिंक केले जाईल. यानुसार प्रसूतीनंतरही माता आणि बाळाच्या लसीकरणाची नोंद आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पोर्टलवर ऑनलाइन होत राहील. प्रत्येक मुलासाठी एक युनिक आयडी तयार केला जाईल."
 
मोबाईलवर येणार संदेश

कोरोनाच्या काळात लसीकरणानंतर नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश येत होता. त्याच धर्तीवर या लसीकरणातही लस मिळाल्यानंतर नोंदीत मोबाईल नंबरवर यू-विन पोर्टलव्दारे संदेश येईल आणि लसीकरणाशी संबंधित सर्व तपशील यू-विन पोर्टलवर नोंद केली जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे लाभार्थ्याला कोणत्याही राज्यात आणि जिल्ह्यात लसीकरणाचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही. पोर्टलवर एका क्लिकव्दारे लसीकरणाचा तपशील समजेल.

नमुंमपा मुख्यालयातील या प्रशिक्षणानंतर 14 ते 20 जुलै या कालावधीत महानगरपालिकेची नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रूग्णालये ए.एन.एम यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 30 जुलै पर्यंत आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी यांचेही प्रशिक्षण पूर्ण केले जाणार आहे.
 
अशाप्रकारे यू-विन पोर्टलव्दारे लसीकरणाला नियोजनबध्दता येणार असून पालकांना लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याचा ताण घेण्याची गरज भासणार नाही व राज्यात कुठेही लसीकरण करून घेता येईल. याबाबतचे प्रशिक्षण शासनामार्फत दिले जात असून प्रत्येक कामात पुढे असणारी नवी मुंबई महानगरपालिका याही बाबतीत आघाडीवर आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121