"माझ्यासोबत नाही आलात तर माझे दरवाजे बंद, असे मी कोणालाही म्हणणार नाही!"
आमदार शेखर निकम यांचा माजी आमदार रमेश कदम यांना टोला
11-Jul-2023
Total Views | 573
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या बंडानंतर पक्षात उभी फूट पडली असतानाच पक्षाच्या आमदारांकडून नवनवे आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. त्यातच आता माझ्यासोबत नाही आलात तर माझे दरवाजे बंद, असे मी कोणालाही म्हणणार नाही, असा टोला राष्ट्रवादीचे चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी माजी आ. रमेश कदम यांना लगावला. राष्ट्रवादी पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार गट या राजकीय द्वंद्वात नेतेमंडळी अडकल्याचे सध्याचे चित्र आहे.
ते पुढे म्हणाले, आता कोणीतरी कार्यकर्त्यांना सांगत आहे. माझ्याबरोबर नाही आलात तर माझे दरवाजे तुम्हाला बंद, असे ऐकायला मिळत आहे. मी कोणालाही असे सांगणार नाही असे सांगतानाच ते म्हणाले, तुमचे माझ्यावर भरपू उपकार आहेत. त्याचबरोबर जे आज मेळाव्यात आले नाहीत त्यांची मजबुरी समजू शकतो. तसेच, आपला कोणावरही राग नसून सर्वांनी मिळून पक्ष बांधूया, हेच माझे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आ. शेखर निकम हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सत्तेत सामील झाले असून त्यांनी सावर्डे येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी माजी आ. रमेश कदम यांना टोला लगावतानाच आपण अजित पवार गटात का गेलो याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. माजी आ. रमेश कदम हे सध्या शरद पवार गटात असून तेदेखील दि. १७ जुलै रोजी मेळाव्याचे आयोजन करणार आहेत. त्यांनी आपल्या घरी समर्थकांची बैठक घेतली असून स्वतः कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. त्यामाध्यमातून कार्यकर्त्यांना बरोबर येण्याची विनंती करत आहेत.