मुंबई : एकदा नव्हे तीन-तीनवेळा राष्ट्रवादी भाजप सोबत जाण्याचे ठरलं होतं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला. शरद पवारांवर शरसंधान साधण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. पवार माझे आजही दैवत आहेत, पण त्यांच्या राजकारणातील धरसोड वृत्तीमुळे आपल्या पक्षाची गाडी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत अडकली, असा तीव्र शब्दांत समाचार त्यांनी नेतृत्वावर घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसला मधल्या काळात मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होत, तेव्हा संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मंत्री झाला असता, आजपर्यंत मुख्यमंत्रीपद आपल्याला टीकवता आलं असतं, असंही शरद पवार म्हणाले. २०१७मध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न झाला. त्यापूर्वी २०१४ मध्ये आम्ही सिल्वर ओकला होतो, तेव्हाही काही वेगळं करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी तेव्हा भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्हाला सांगितलं वानखेडेवर जा, आम्ही तिथेही गेलो. पण सत्तेत सामीलच व्हायचं नव्हतं तर मग तेव्हा वानखेडेला का पाठवलं?, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
२०१७ वर्षा बंगल्यावर तशीच चर्चा झाली. सुनील तटकरे, जयंत पाटील आणि भाजपचीही मंडळीही होती. तेव्हाही खातेवाटप मंत्रीपदं, पालकमंत्रीपदंही ठरली. मी खोटं बोलत असेल तर पवाराची अवलाद म्हणून नाव लावणार नाही. भाजपने सांगितलं. आमची २५ वर्षे जूनी युती आहे आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. तेव्हा यांनीच ठरवलं शिवसेना जातीयवादी पक्ष आहे त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. तेव्हाही फिसकटलं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. मला उपमुख्यमंत्री करण्यात आलं, तेव्हाही मी काहीच बोललो नाही. कोरोना काळात काम केलं. त्यातही हलगर्जीपणा केला नाही. त्यानंतर शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही आमच्या प्रमुखांना सांगितलं काही तरी वेगळं घडतंय. उद्धव ठाकरेंना सांगितलं काही तरी घडतंय. पण कुणी लक्ष देईना. एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला. ते गुवाहाटीला गेले. त्यावेळी आम्ही ५१ आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला. पण वरिष्ठांनी निर्णय घेतला नाही, असाही गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.