मराठीच्या नव्या रुपाला स्वीकारण्यावाचून पर्याय नाही : डॉ. रवींद्र शोभणे

    01-Jul-2023   
Total Views |
Literary communication With Dr Ravindra Shobhane

पुढील वर्षी फेब्रुवारीत अमळनेर येथे होणार्‍या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्ताने संमेलनासंबंधी वाद, साहित्याचे नवे प्रवाह आणि मराठी भाषा अशा विविध मुद्द्यांवर डॉ. शोभणे यांच्याशी साधलेला हा साहित्यसंवाद...

९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे आपले अभिनंदन. या निवडीनंतर आपल्या काय भावना होत्या?
माझी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, हे कळल्यानंतर निश्चितच मला आनंद झाला. साने गुरुजींच्याच कर्मभूमीत मला हा सन्मान मिळतोय. माझ्या आजवरच्या वाङ्मयीन कारकिर्दीचा हा सन्मान असेल. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि साने गुरुजी या तिघांच्या विचारांची परंपरा साने गुरुजींनी अमळनेरमधून संपूर्ण महाराष्ट्राला दिली आहे. त्याच भूमीतच हे संमेलन होणार आहे, हे माझ्या दृष्टीने खचितच अप्रूपच आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर समाजमाध्यमांवर विविध मतप्रवाह दिसून येतात. अध्यक्ष कोण व्हावा याविषयी भाषाप्रेमी आपापली मते मांडत असतात. त्याविषयी तुम्हाला काय वाटते? अध्यक्षांचे कर्तव्य काय असायला हवे?
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा तीन दिवसांचा गुळाचा गणपती असतो, असं काही लोक म्हणतात. तरीही अध्यक्षांची काही कर्तव्ये जरूर आहेत. आता त्यांना अधिकार आहेत की नाही, हा भाग अलाहिदा. माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर जेव्हा साहित्य संमेलन होईल, तेव्हा उद्घाटनप्रसंगी मला रितसर सूत्रं सुपूर्द केली जातील, तेव्हा माझी कारकिर्द सुरू होईल. त्यानंतर साहित्यविषयक, संस्कृतीविषयक, शिक्षणविषयक जे सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील प्रश्न आहेत, समस्या आणि अडचणी आहेत, त्या अनुषंगाने नेमलेल्या अध्यक्षांनी समाजाचा एक घटक म्हणूनसुद्धा काम करावे, धडपडावे, काही मागण्या असतात त्या मार्गी लावाव्या. उदाहरणार्थ, मराठीच्या अभिजात दर्जाविषयी मागणी आहे, अलीकडे मराठी माध्यमाच्या शाळा झपाट्याने बंद होत आहेत. यांसारख्या कळीच्या प्रश्नांकडे विद्यमान अध्यक्षांनी त्यांच्या कारकिर्दीत पाहावं, असं मला निश्चितपणे वाटतं. त्यादृष्टीने मी प्रयत्न करणार आहे.

साहित्य मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना संमेलनातील राजकीय हस्तक्षेपाविषयी भाष्य केले. मात्र, संमेलनाच्या व्यासपीठावर एका राजकीय विचारसरणीच्या सोयीचे व दुसर्‍या राजकीय विचारसरणीच्या विरोधातलेच विचार मांडले जातात. साहित्यावर राजकीय स्थितीचाही प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडत असतो. तेव्हा हे विचार एककल्ली नाहीत का?
खरंतर साहित्यिकांनी राजकीय विषयांवर बोलूच नये, असे अजिबात नाही. प्रत्येक सर्वसामान्य माणूस साहित्यात कार्य करत असताना तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्वच प्रश्नांशी संबंधित असतो. म्हटले, तर बळीही असतो. अशांनी व्यक्त होणे चुकीचे वाटत नाही. तो त्याच्याच विचारधारेतून व्यक्त होणार. तेव्हा विरोधी विचारसरणीच्या लोकांना ते साहजिकच खटकणार. याचंही राजकारण होतं, ते न होऊ देता त्याबाजूने तो का बोलतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. हे सुसंवादी पद्धतीने व्हायला हवे. खरेतर प्रत्येकालाच राजकीय वक्तव्यांवर टीका करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार कोण कशाप्रकारे वापरतो ते पाहायला हवे. दुर्गाबाई भागवतांनी तत्कालीन राजकीय व्यवस्थेवर टीका केली होती. त्याच संमेलनात ’सामान’ ही पाडगावकरांनी कविता वाचली होती. या सर्वांचा पुन्हा विचार आपण करायला हवा. त्यामुळे व्यासपीठावरून होणारी टीका अनाठायी आहे, असे मला वाटत नाही, त्याचा स्तर तेवढा तपासून पाहायला हवा.

संमेलनात परिचर्चा आणि परिसंवादांची उत्तम सत्रे असतात. परंतु, त्यातून बहुतेकदा एकच दिशा पुढे येते. यासोबतच वादविवादाची सत्रे आयोजित केलीत, तर चर्चा बहुआयामी होतील. अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्याचा मानस आहे का?
अर्थात, असे काही नक्कीच करता येईल. हाही मुद्दा चांगला आहे. तुम्हाला एक सांगतो, परिसंवादही बहुतेकदा वादविवादापर्यंत जातात. वादविवाद म्हटलं म्हणजे, त्या त्या पद्धतीचे विषय आणि त्यांची मांडणी होणे गरजेचे आहे, तरी हा मुद्दा मला आवडला. हे होणे गरजेचे आहे. यात तरुण पिढीचा सहभाग वाढायला हवा. त्यांनाही या माध्यमातून साहित्याची ओढ लागेल आणि साहित्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो.

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून दरवर्षी बरेच प्रस्ताव पारित केले जातात. पण, त्यानंतर त्या प्रस्तावांचा पाठपुरावा फारसा होताना दिसत नाही की. ती बाब मग संमेलनापुरती मर्यादित राहते. त्याविषयी काय सांगाल?
बरोबर, तुमचं मत खरं आहे. आजपर्यंतचा आपला अनुभव असाच होता. जे प्रस्ताव मंजूर होतात, ते शासनदरबारी जातात. त्यांचे पुढे काय होतं, ते ना संमेलनाध्यक्षांना माहिती असतं, ना महामंडळाच्या पदाधिकार्‍यांना. ते जर कळीचे मुद्दे असतील, तर अध्यक्षांनी त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. माझ्या कारकिर्दीत जे प्रस्ताव मंजूर होतील, त्यांचा पाठपुरावा करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.

आपले बहुतांशी साहित्य हे वास्तववादी शैलीतील आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शहरी-ग्रामीण स्थित्यंतरांवर ते भाष्य करते. हे अनुभव लेखणीत उतरवण्यासाठी लेखकालाही तितकेच जमिनीशी जोडलेले असावे लागते. तेव्हा, समाजातील हा वास्तववाद टिपणं आणि तो लेखनात उतरवणं या प्रक्रियेविषयी काय सांगाल?
आपण मातीचे देणे असतो, तिचे देणे असते. संस्कृती आणि भाषेचे पडसाद उमटतात. त्याच्या घडण्याच्या काळात त्याने केलेला विचार त्याच्या लिखाणातून मांडला जातो. माझ्या लेखनात माझ्या गावातील माणसांचे, त्यांच्या शेतीचे, बलुतेदारांचे प्रश्न दिसून येतात. धार्मिक आणि सामाजिक अंगाने विचार करून मी माझ्या कादंबर्‍यांमध्ये मांडतो. माझेही शहरीकरण झाले. नोकरीनिमित्त मी नागपूरला आलो. आपलं जीवन अनेक अर्थांनी बदल ते आपण टिपत असतो.

आज तरुणाईला पुस्तके प्रकाशित करण्यासोबतच समाजमाध्यमांवरून तसेच दृक-श्राव्य माध्यमांतून व्यक्त व्हायला आवडते. तसेच इंग्रजी भाषेचा साहित्यावर मोठा परिणाम आज दिसून येतो. या साहित्याच्या बदलत्या प्रवाहांबद्दल आपण काय सांगाल?
मुळात हा भाषिक बदल तसाही अटळ आहे. गंमत अशी की, आज आपण जागतिकीकरणाच्या आणि खुल्या अर्थव्यवस्थेत प्रवेश केला आहे. आपल्याला पाश्चिमात्य देशातील सर्वच गोष्टी चालतात. तेव्हा हे नवे शब्द मराठीवर आक्रमण करत असतील, तर त्यांना त्यांच्या अर्थासोबत स्वीकारण्यावाचून पर्याय नाही. मराठी भाषेत अनेक शब्द बहामनी काळापासून, संस्कृत भाषेतून आलेले आहेत, ते आपण स्वीकारले आहेत ना! आज फारसी आणि उर्दूतून आपण काही शब्द स्वीकारले आहेत. उर्दू-फारसी शब्दकोश शिवाजी महाराजांनी तयार केला होता. आज १९५०ची मराठी भाषा आणि २००० सालची मराठी भाषा यात नक्कीच फरक आहे. आजचा तरुण इंग्रजी माध्यमे आणि व्यापारपेठांतून वावरणारा आहे. त्याच्या वागण्या-बोलण्यात असे शब्द येतात. आपणही नकळत अशा शब्दांचा वापर करतो. यातून मराठी संपते, असे मला मुळीच वाटत नाही. यातून आपल्या भाषेत इतर भाषेतील शब्द सामावले जातात.

मगाशी तुम्ही मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा उल्लेख केलात. त्यानंतर आता मराठीवर कालौघात होणार्‍या भाषिक आक्रमणाबद्दल आपलं बोलणं झालं. आपली संस्कृती प्रवाही असल्याने भाषाही बदलत राहते. मग अभिजात भाषेच्या दर्जासाठी ठरलेल्या चार निकषात मराठी बसत नाही. आणि तिने बसणेही अपेक्षित नाही. मग केवळ अभिजात दर्जा मागण्यापेक्षा निकष बदलासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून आपण काही करू शकतो का?
अभिजात भाषेच्या दर्जासाठी लागणार्‍या निकषांमधला सर्वांत महत्त्वाचा निकष म्हणजे, भाषा जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीची असावी. या निकषावर मराठी उतरते असे मला वाटते. सातवाहन काळात मराठी ग्रंथांचा उल्लेख आहे. त्या काळापासून मराठी आपल्याला दिसते. या दोन रूपांत फरक नक्कीच असतो. या एवढ्या काळात भाषा तशीच राहत नाही. तीही प्रवाही असते. तिची रूपं बदलतात. हा भाषेचा बदलता रूपबंध आहे. त्याला जर निकषांमध्ये बसताना अडथळे येत असतील, तर या मुद्द्याचा नव्याने विचार करणे गरजेचे आहे.

तरुण संमेलनाध्यक्ष म्हणून तुमचे कौतुक होत आहे. तेव्हा संमेलनात जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग वाढावा; म्हणून त्यांना साहित्य संमेलनाकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल?
तरुणांना आकर्षित करणारे काही परिसंवाद, काही वाङ्मयीन कार्यक्रम होणं गरजेचं आहे. त्यासाठी मी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांशी बोलणंच. तसेच आयोजन समितीशीही बोलावे लागेल. ज्या साने गुरुजींनी आपले आयुष्य तरुणांसाठी वेचले, त्यांच्यापर्यंत हे साहित्य पोहोचावे, ‘आंतरभारती’ सारखे प्रकल्प त्यांनी राबवले होते, असा प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपण त्याला उत्तमप्रकारे मांडले, तर तो कृतीत यायला यश येईल.
डॉ. रवींद्र शोभणे यांचा साहित्यिक प्रवास

डॉ. रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खरसोली या गावी झाला. नागपूर विद्यापीठ येथून त्यांनी ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे’ या विषयावर प्रबंध सादर करून १९८९ साली ‘पीएचडी’ची पदवी प्राप्त केली आहे. कथा, कादंबरी, नाट्य, कविता, समीक्षा, ललित, अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन करणार्‍या डॉ. रवींद्र शोभणे यांची वयाच्या ३४व्या वर्षी ‘प्रवाह’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली.

डॉ. शोभणे यांनी आजवर एकूण ११ कादंब़र्‍या लिहिल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे - ‘रक्तध्रुव’ (१९८९), ‘कोंडी’ (१९९९), ‘चिरेबंद’ (१९९५), ‘सव्वीस दिवस’ (१९९६), ‘उत्तरायण’ (२००१), ‘पडघम’ (२००७), ‘पांढर’ (२००९), ‘अश्वमेध’ (२०१४), ‘पांढरे हत्ती’ (२०१६), ‘होळी’ (२०२१) तसेच त्यांचे एकूण दहा कथासंग्रहदेखील प्रकाशित झाले आहेत. ‘वर्तमान’, ‘दाही दिशा’, ‘शहामृग’, ‘ततभाव’, ‘अदुष्टाच्या वाट’, ‘चंद्रोत्सव’, ‘ओल्या पापाचे फुत्कार’, ‘महत्तम साधारण विभाजक’, ‘भवताल’ आणि ‘ऐशा चौफेर टापूत’ हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह. ‘गोत्र’ म्हणून एक व्यक्तीचित्रण प्रकाशित झाले आहे. ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे’, ’सत्वशोधाच्या दिशा’, ‘संदर्भासह’, ‘महाभारत आणि मराठी कादंबरी’, ‘त्रिमिती’, ‘साक्षेप’ असे अनेक समीक्षात्मक वैचारिक साहित्य प्रकशित झाले आहे.

काही ग्रंथांचे संपादनसुद्धा डॉ. शोभणे यांनी केले आहे. ‘कथानजाळी’, ‘मराठी कविता ः परंपरा आणि दर्शन व जागतिकीकरण‘, ‘समाज आणि मराठी साहित्य’ असे अनेक विषय त्यांनी मांडले आहेत. त्यांनी ‘अनंत जन्मांची गोष्ट’ विश्वनाथप्रसाद तिवारी यांच्या हिंदी कवितांचा अनुवादही केला आहे. तसेच ‘सॉक्रेटिस कधी मरत नसतो’ हा माधव कौशिक यांच्या हिंदी कथांचा त्यांनी केलेला अनुवादही प्रकाशित झाला आहे. त्याबरोबरच त्यांच्या पाच पुस्तकांचा अनुवाद इतर भाषांमध्ये झाला आहे. त्यांनी ‘नेक्ड साहित्य संमेलनां’चे अध्यक्षपही भूषवले आहे.

पुरस्कार आणि सन्मान
१. लोकमत पुरस्कार (ललितलेखन)
२. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.ल. ठोकळ पुरस्कार (कोडी)
३. नाथमाधव साहित्य पुरस्कार (कोंडी)
४. भि. ग. रोहमारे पुरस्कार (कोंडी)
५. महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार (कोंडी)
६. कामगार कल्याण केंद्राचा उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार:(एक दीर्घ सावली)
७. ग्रंथोत्तेजक पुरस्कार (चिरेबंद)
८. रणजित देसाई पुरस्कार (चिरेबंद)
९. विदर्भ साहित्य संघाचा वा. कृ. चोरघडे पुरस्कार ( शहामृग )
१०. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील कथा पुरस्कार ( शहामृग )
११. डॉ. अ. वा. वर्टी कथा पुरस्कार (कथालेखनातील योगदानासाठी )
१२. विदर्भ साहित्य संघाचा देशपांडे पुरस्कार (उत्तरायण)
१३. घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार (उत्तरायण)
१४. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (अमेरिका) (उत्तरायण)
१५. समाजप्रबोधन प्रतिष्ठानचा पुरस्कार (सत्त्वशोधाच्या दिशा )
१६. सहकार महर्षी बापूसाहेब देशमुख कथा पुरस्कार (तद्भव)
१७. छ. संभाजीनगर महानगरपालिकेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार (तद्भव)
१८. आपटे वाचन मंदिरचा (इचलकरंजी) कादंबरी पुरस्कार (पडघम)
१९. डॉ. अनंत व लता लाभशेटवार प्रतिष्ठानचा एक लाख रुपयांचा साहित्य सन्मान पुरस्कार (अमेरिका) (साहित्यनिर्मितीच्या विशेष योगदानासाठी)
२०. महाराष्ट्र शासनाचा ह. ना. आपटे कादंबरी पुरस्कार (पडघम)
२१. शांताराम कथा पुरस्कार (भळभळून वाहणारी गोष्ट)
२२. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार (पांढर)
२३. कादंबरीकार वि.स.खांडेकर पुरस्कार (कादंबरीलेखनातील योगदानासाठी)
२४. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मृत्युंजय पुरस्कार (महाभारताचा मूल्यवेध)
२५. मराठवाडा साहित्य परिषदेचा नरेंद्र मोहरीर पुरस्कार (महाभारताचा मूल्यवेध)
२६. पुणे मराठी ग्रंथालयाचा राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
२७. प्राब्दवेल प्रतिष्ठानचा (लातूर) कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
२८. महाराष्ट्र शासनाचा दिवाकर कृष्ण कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
२९. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार (अश्वमेध)
३०. ना. सी. फडके पुरस्कार (अश्वमेघ)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.