‘हाशिमोटोज’ची उलटगणती

    10-Jun-2023
Total Views | 141
Article On Hashimoto's Treatment

थायरॉईड संबंधित व्याधींशी आपण हल्ली बर्‍यापैकी परिचित असतो. अशाच या थायरॉईड ग्रंथीचा र्‍हास होऊन घडणारे विकार खरे म्हणजे ‘हाशिमोटोज डिसीज.’ थायरॉईड ग्रंथीचा र्‍हास करणार्‍यासाठी जबाबदार असणार्‍या व्याधीचा हा परिणाम असून त्यावर कोणतेही औषधोपचार प्रचलित उपचार पद्धतीत उपलब्ध नाहीत. त्याविषयी सविस्तर...

आज अनारोग्य व पर्यावरणाचा र्‍हास या दोन मोठ्या समस्या जगापुढे उभ्या आहेत. काही हितसंबंधीयांच्या दबावामुळे या समस्यांच्या मुळावर घाव न घालता काही थातूरमातूर उपाय योजले जात आहेत. पण, यामुळे या समस्या अधिकच गंभीर व जटिल होत चालल्या आहेत. या समस्यांचे निराकरण होत नसल्याने, पर्यावरणाच्या र्‍हासाचे प्रमाण वाढत जाऊन, मनुष्यच नव्हे तर समस्त प्राणी व निसर्गसृष्टीच विविध रोग-व्याधींनी ग्रस्त होऊन कायम रुग्णावस्थेत राहात आहे.

बदलत्या आहारपद्धतीत ’ग्लुटेनयुक्त रिफाईंड पीठ’ म्हणजे मैद्याचे पाव, बिस्किटे, केक, नूडल्स, पास्ता असे पचनसंस्था बिघडवणारे, मलावरोध निर्माण करणारे खाद्य पदार्थ, रिफाईंड तेलात तळलेले फरसाण, वडे इ. पदार्थ, अजिनोमोटोसारखे रसायन व रंग वापरून बनवलेले चायनीज पदार्थ, रस्त्यावरचे अनहायजिनिक परिस्थितीत व स्वस्त तेल-रंग-मसाले किंवा भेसळयुक्त पदार्थ वापरून बनवलेले खाद्यपदार्थ, अशा अनेक खाद्यान्नांचा आहारात समावेश केल्याने अनेक रोगव्याधी निर्माण होत आहेत. प्रचलित औषधे तर कृत्रिम रसायने असतातच, पण आपल्या रोजच्या अन्नात, साखर, गूळ, ब्रेड, मीठ, रिफाईंड तेल इत्यादी पदार्थांत किती रसायने असतात व किती घातक रसायनांचे अंश असतात, याचा शोध घेतल्यास आपण आश्यर्यचकित होऊ.

त्यात भरीस भर म्हणून भारतातील प्रचलित आरोग्य सेवा ही ’सेवा’ राहिली नसून, कोणताही विधिनिषेध न बाळगता प्रचंड नफा कमावणारा, अनेक अपप्रवृत्तींनी ग्रासलेला धंदा झाला आहे. आज ’फॅमिली डॉक्टर’ ही जमात कालबाह्य झाली असून, भरमसाठ फी आकारून, रोगी, रोगलक्षणे व त्या लक्षणांच्या मूळ कारणांकडे लक्ष न देता, केवळ विविध तपासण्यांच्या रिपोर्ट्सचा आधार घेऊन स्टिरॉइड्स, स्टॅटिन्स, अ‍ॅण्टिबायोटिक्स, हॉर्मोन्स अशा अनेक रासायनिक औषधे इंजेक्शन्सचा मारा करून, भरमसाठ फी आकारून असफल उपचार करणारी ’स्पेशालिस्ट-कन्सल्टन्ट’ अशी नवी वैद्यकीय जमात निर्माण झाली आहे. जनता मधुमेह, कॅन्सर, मूत्रपिंड विकार, हृदयविकार अशा अनेक रोगव्याधीतून कायमची मुक्ती न मिळता, अमाप खर्च करत, नवनवीन औषधे वाढत्या मात्रेत घेऊन चिंताग्रस्त आयुष्य जगत आहे.

आज भारतातल्या शरीर विज्ञान, प्रचलित रासायनिक औषधे व त्यांचे चांगले-वाईट परिणाम याविषयी अनभिज्ञ असणार्‍या सामान्य माणसांचे अनुभव काय आहेत? त्याला अचानक पोटदुखी, वजनात वाढ किंवा घट व्हायला सुरुवात झाली तर तो काय करतो, तर प्रथम घरगुती उपचार करून बघतो. त्यांनी आराम न पडता, ताप, दिवसभर थकवा, त्वचा शुष्क होऊन त्वचारोग, चिडचिड, मानसिक असंतुलन अशी आणखी लक्षणे सुरु झाली की त्याला हे वेगळेच काहीतरी दुखणे आहे, याची जाणीव झाली की तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर विविध तपासण्या करून, त्यांचे रिपोटर्स बघून अनेक गोळ्या, इंजेक्शने, व्हिटॅमिन्स, अ‍ॅण्टिबायोटिक्स अशा अनेक औषधांचा मारा करतो. त्यांचाही काही उपयोग न होता ही लक्षणे वाढतच जातात. मग तो अनेक ‘कन्सल्टन्ट स्पेशालिस्ट’ यांच्या पायर्‍या झिजवत रहातो. त्यांतला एखादा डॉक्टर हा थायरॉईड ग्रंथीचा रोग आहे असे निदान करून (हायपोथायरॉयडिझम) आधीच्या अनेक औषधांबरोबर आणखी ‘थायरॉक्सिन’च्या गोळ्या घ्यावयास सांगतो. नंतर रक्त तपासणीत आढळलेल्या ’टीएसएच’च्या बदलत्या प्रमाणानुसार ‘थायरॉक्सिन’ गोळ्यांचे प्रमाण कमीजास्त करत राहूनही रोग्याला आराम न वाटता, उलट सांधेदुखी, स्नायूदुखी, त्वचारोग अशा अनेक रोग-व्याधी-लक्षणांना तोंड देत आयुष्य कंठत राहावे लागते व त्यामुळे तो नैराश्याने ग्रासला जातो.

अशा अनेक रुग्णांची तपासणी केल्यावर, अमेरिकेतल्या काही डॉक्टरांच्या लक्षात आले की, सर्व लक्षणे, केवळ थायरॉईड ग्रंथीच्या ’हायपोथायरॉयडिझम’ विकारामुळे उद्भवत नसून, ’हाशिमोटोज डिसीज’ या ’ऑटोइम्युन डिसीज’ची म्हणजे शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती क्षीण करणार्‍या व्याधीची लक्षणे आहेत. अधिक संशोधनाअंती त्यांच्या लक्षात आले की, पर्यावरणातील व खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने अशा आजच्या जीवनशैलीत वापरात असणार्‍या अनेक पदार्थांतली अनेक विषारी घातक रसायने आहारातून, त्वचा व श्वसन मार्गे रक्तात भिनतात. त्यांचे प्रमाण जास्त झाले की, त्या विषांना प्रतिकार करणार्‍या रक्तपेशींच्या शक्तिकेंद्रावर आघात होऊन, त्या पेशी आपल्याच पेशींचा नाश करतात. या पेशी थायरॉईड ग्रंथी, जी थायरॉक्सिन हे हॉर्मोन रक्तात सोडून, हृदयाचे संचालन, स्नायूंची कार्यक्षमता, चयापचय क्रिया, हाडे व मेंदूचा विकास व इतर अनेक शरीरांतर्गत क्रियांना नियंत्रित करते, तिचा र्‍हास करतात. त्यामुळे अनेक रोग-व्याधी व त्यांची लक्षणे निर्माण होतात. या रोगप्रतिकारक शक्तीला क्षीण करणार्‍या व्याधीला ’ऑटोइम्यून डिसीज’ ला ’हाशिमोटोज डिसीज’ असे म्हणतात.

प्रचलित रोगोपचार प्रणालीत या व्याधीवर काहीच उपचार पद्धती उपलब्ध नसल्याने, आपणच आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकच उपाय संभवतो. या विचाराने अमेरिकेत योग्य आहार, योगासने, ध्यान विद्या यांचा समावेश असलेली ’फंक्शनल मेडिसिन’ या उपचार प्रणालीच्या माध्यमातून उपचार करून अनेक रुग्णांना विविध रोग-व्याधी-लक्षणातून नुसते मुक्त केले नाही, तर त्यांच्या ’इसब’सारख्या जुनाट त्वचा रोगातूनही मुक्ती दिली आहे. त्यांना त्यांच्या पूर्वीच्या रोगमुक्त, उर्जायुक्त व चिंता-ताण तणावमुक्त जीवनाचा पुनर्लाभ करून देत आहेत.

आज अमेरिकेत ’हाशिमोटोज डिसीज’ या व्याधीने ग्रस्त असणारे सुमारे दीड कोटी रुग्ण आहेत. भारतातही लाखो लोकांना थायरॉईडचा विकार जडला असून (हायपो थायरॉईडीझम), वजनात वाढ लठ्ठपणा किंवा घट, पचन संस्थेचे विकार, मेंदूचे विकार, समरणशक्ती कमी होणे, कामात लक्ष न लागणे, माहिती समजण्यात अडचण येणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे, विचारात सुसंगता नसणे, सुस्ती जाणवणे, विविध भास होणे, अनिद्रा अशी अनेक लक्षणे जाणवत आहेत. थायरॉईड ग्रंथीचा र्‍हास होऊन घडणारे हे विकार खरे म्हणजे ’हाशिमोटोज डिसीज’ या थायरॉईड ग्रंथीचा र्‍हास करणार्‍यासाठी जबाबदार असणार्‍या व्याधीचा परिणाम आहे व त्यावर कोणतेही औषधोपचार प्रचलित उपचार पद्धतीत उपलब्ध नाहीत.

शरीर ज्या नैसर्गिक तत्त्वांचे बनलेले आहे, ती नैसर्गिक तत्त्वे असणारा आहार व औषधे शरीर सहज स्वीकारते व अनोळखी रासायनिक आहार व औषधे नाकारते, हे आता माहीत झाले आहे. शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक यंत्रणा आजच्या रासायनिक आहार व औषधांच्या सेवनाने बाधित झाल्याने नवनवीन रोग जडत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आहार व औषधे, तसेच योगासने व ध्यान यांचा समावेश केलेली जीवनशैली आचरणात आणली तर रोगप्रतिकारक शक्ती वाढून मनुष्य शारीरिक व मानसिक रोगांपासून मुक्ती मिळवू शकतो, हे सिद्ध होत आहे. अनाकलनीय वैद्यकीय भाषेत जास्त विवेचन न करता, अमेरिकन विचारधारा, आहारपद्धती, चंगळवादी व्यापारी वृत्ती व नवनवीन ’फॅड्स’ यांना बाजूला ठेवून, प्रसारमाध्यमांवर फिरणार्‍या उलटसुलट माहितीकडे दुर्लक्ष करून, आम्हा सामान्य भारतीयांना समजणार्‍या भाषेत, परवडणार्‍या खर्चात स्वस्थ, आरोग्यपूर्ण जीवनासाठीची गुरुकिल्ली पुढे देत आहे.

मी स्वानुभवावरून सांगतो, ज्या रुग्णांना, ‘हाशिमोटोज डिसीज’ची अत्यंत त्रासदायक लक्षणे, वर्षानुवर्षे ‘हायपोथायरॉईडिझम’वर उपचार म्हणून थायरॉक्सिनच्या गोळ्या घेत असूनही काही आराम न मिळता, उलट नव्या व्याधी निर्माण होऊन नैराश्य येत आहे व ज्यांची या व्याधी-लक्षणातून मुक्त होऊन स्वस्थ जीवन जगण्याची मनापासून इच्छा आहे, त्यांनी श्रद्धापूर्वक व निर्धारपूर्वक, कोणत्याही प्रचलित रासायनिक औषधांचा समावेश नसलेल्या या ’दैनंदिन आचरण संहितेचे’ पालन केले, तर एक महिन्यात त्यांना आपल्यात होणार्‍या बदलाची प्रचिती येऊ शकते व तीन ते चार महिन्यांत ते अनेक लक्षणे व व्याधींपासून मुक्त होऊ शकतात. हा अनेक जणांचा अनुभव आहे. या उपचारांच्या काळात घेत असलेली औषधे मात्र चालू ठेवावी. आपले बीपी, वजन व शुगर घरच्या घरी उपकरणावर तपासून त्याची नोंद ठेवावी व तीन महिन्यांनंतर सर्व तपासण्या करून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या बंद कराव्या. काही लक्षणे उरली असतील, तर पद्मविभूषण डॉ. हेगडे व लोकांना मधुमेहमुक्त करण्याचा वसा घेतलेल्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची युट्यूबवर उपलब्ध असलेली आरोग्याविषयीची व्याख्याने जरूर ऐकावी व त्यानुसार उपाययोजना करावी. आज अनेक पारंपारिक, नैसर्गिक गुणकारी उपचार सांगणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यातील आपल्याला उपयुक्त ठरतील अशी औषधे घ्यावीत. चुकूनही रासायनिक औषधे घेऊ नये व जंक फूडचा मोह टाळावा, व्यसने टाळावी.

टीप : घरी बीपी मॉनिटरवर बीपी तपासताना तीन रिडिंग घ्यावी. दुसर्‍या व तिसर्‍या रिडिंगची सरासरी काढून ते रिडिंग ग्राह्य धरावे व त्याची नोंद ठेवावी. डॉक्टरकडे बीपी तपासणी केली असता बीपी हमखास वाढलेले दिसते. (नॉर्मल:१३५/८५) व डॉक्टर बीपीच्या गोळ्या चालू ठेवायला सांगतात. याला ’व्हाईट कोट सिंड्रोम’ म्हणतात. अशा वेळी आपल्या बीपी रिडिंगच्या नोंदी त्याला दाखवाव्या व मग निर्णय घ्यावा.

दैनंदिन आचरण संहिता

- आपल्या भुकेच्या दोन वेळा ओळखून (उदा. सकाळी ९ व संध्याकाळी ७), पारंपारिक घरगुती भात-भाजी, ज्वारी-बाजरीची भाकरी, कडधान्यांच्या उसळी व आमटी यांचे जेवण करावे. जेवताना पाणी न पिता, दोन जेवणांच्या मधल्या वेळात काहीही न खाता फक्त कोमट पाणी बसून प्यावे. जेवणाआधी डाळिंब, अननस, केळी, संत्री ही फळे खावी. भिजलेले बदाम, अक्रोड खावे. जेवणात हळद, आले, सुंठ, कांदा, लसूण, लिंबू व धने-जिरे-लवंग-दालचिनी व काळी मिरी, मेथी अशा मसाल्यांच्या पदार्थांचा प्रमाणात वापर करावा. तृणधान्ये, मूग व इतर मोड आलेली कडधान्ये, शुद्ध खोबरेल तेलाचा समावेश असावा. पालेभाज्या व फळभाज्या स्वच्छ धुवून त्यांचा जेवणात समावेश करावा.सकाळी रिकाम्या पोटी कपभर कोमट पाण्यात एक चमचा हळद व चिमूटभर काळीमिरी पूड घालून प्यावे. वनस्पती तूप न वापरता शुद्ध गायीचे तूप वापरावे.

यीस्ट घालून आंबवलेले ब्रेड इ. पदार्थ टाळून, नैसर्गिकरित्या आंबवलेले इडली इ. व घरी गायीच्या दुधात विरजण घालून तयार केलेले दही व ताक (प्रोबायोटिक) अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा.

अश्वगन्धा व ब्राह्मी या अत्यंत गुणकारी वनस्पती वैद्याच्या सल्ल्याने घ्याव्या. गोळ्यांच्या स्वरूपात मिळतात.

रिफाईंड तेल, तळलेले पदार्थ, अतिरिक्त मीठ व साखर, जंक फूड, रस्त्यावरचे खाद्य, प्रक्रिया केलेले डबाबंद खाद्य व बाटलीबंद पेये, कॉफी, पामतेल व आपल्याला ऍलर्जी असणारे पदार्थ टाळावे. ब्रॉयलर चिकन, चीज, चॉकलेट, सोयाबीन,चायनीज, पिझा, नूडल्स, पास्ता, ब्रेड हे गव्हाच्या मैद्याचे पदार्थ टाळावे.

रोज ४५ मिनिटे/चार ते पाच किलोमीटर (ब्रिस्क वक) चालण्याचा व्यायाम घ्यावा.

मधून मधून इसबगोल, त्रिफळा चूर्ण घेऊन पोट साफ ठेवावे.

सहज करता येतील अशी योगासने शिकून घेऊन, हातापायांची ओढाताण न करता सावकाश सहजपणे करावी.

कपालभाती, अनुलोमविलोम, भ्रामरी असे प्राणायाम करावे.

मांडी घालून पाठीचा कणा ताठ ठेवून, डोळे मिटून, स्थिर बसून, मन विचारहीन करून कमीत कमी पंधरा मिनिटे ध्यान करावे.

बुरशी, फंगस (मोल्ड) चा सम्पर्क टाळावा.

कोवळ्या उन्हात बसून व्हिटॅमिन-डी मिळवावे.मोकळ्या हवेत फिरायला जावे.

नियमित वेळ ठरवून आठ तास झोप व मधून मधून विश्रांती घ्यावी. पुरेशी गाढ झोप मिळाल्याने रोगप्रतिकार शक्तीची वाढ होते.
मला खात्री आहे की, आजच्या विषारी पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर, धावपळीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीत ही ’दैनंदिन आचरण संहिता’ जर मनोभावे आचरणात आणली, तर ‘हाशिमोटोज डिसीज’ची उलटी गणती सुरु होऊन मनुष्य अनेक रोगव्याधींतून मुक्त होऊन निरामय, आनंदी, उत्साहपूर्ण व चिंतामुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकेल. प्राचीन भारतात स्वस्थ जीवनाची गुरुकिल्ली आपल्या पूर्वजांच्या हातात होती, पण अलीकडच्या काळात आपण ती मनाच्या अडगळीत हरवून बसलो होतो. ती गुरुकिल्ली शोधून काढून,आजच्या परिस्थितीत तिचा वापर करून, पुन्हा आपल्या व आपल्या भावी पिढ्यांच्या साठी स्वस्थ जीवनशैलीचे सुवर्ण दार उघडण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आपले अनुभव इतरांशी व माझ्याशी जरूर शेअर करावे.

ज्ञानचंद्र वाघ 
dnyan६४@gmail.com
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121