कविता ही क्रिया नाही तर प्रतिक्रिया : गुरु ठाकूर

    13-May-2023   
Total Views |
guru thakur

मनोरंजन क्षेत्रात, मालिका, नाटक आणि चित्रपटासाठी लेखन करणार्‍या लेखकांचा सन्मान ‘मानाचि पुरस्कारां’नी केला जातो. यावर्षी ‘मानाचि’चे आठवे वर्ष. यावर्षीच्या पुरस्कारांत गुरु ठाकूर यांना ‘चंद्रमुखी’ या चित्रपटासाठी गीतकार म्हणून ‘मानाचि पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त बदलत्या काव्यप्रवाहांना जाणून घेताना त्यांच्याशी केलेली बातचीत..

‘चंद्रमुखी’ या चित्रपटाच्या गीतांसाठी ‘मानाचि पुरस्कार’ तुम्हाला जाहीर झाला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील गाणी तुफान गाजली. एखादं गाणं जेव्हा लोकप्रिय होतं, तेव्हा त्याचे बोल आवडणारा एक गट असतो आणि संगीत आवडणारा दुसरा गट. या चित्रपटाची गीतं तुम्हीच लिहिली आहेत. तेव्हा संगीताविषयी तुम्हाला काय वाटतं, हे जाणून घ्यायला मला आवडेल.

आज ८० टक्के गट हा संगीत आवडणारा आहे. शब्दांचा प्रभाव तेव्हाच पडतो, जेव्हा संवेदनशील मनाने तुम्ही त्याकडे पाहता. ज्यांना साहित्य, कविता यात रस आहे, त्यांनाच शब्दांचं महत्त्व जाणवतं. लक्षात घे, याचा शिक्षणाशी काही संबंध नाही. एखाद्या अशिक्षित मजुरालाही शब्द भावू शकतात. पूर्वी भावकविता असायच्या, तेव्हा शब्द प्रथम येत आणि त्या शब्दांना संगीत दिलं जायचं आणि चित्रपटसृष्टीचा इतिहासच तो आहे, प्रथम संगीत त्यानंतर शब्द!

सुचलेल्या कल्पनेपासून किंवा ठरलेल्या विषयापासून मूर्त कवितेपर्यंतचा प्रवास कसा असतो?

तू फेसबुकवर कविता वाचल्या असतील, त्या अगदी सहा-आठ ओळींच्या आहेत. त्या उत्स्फूर्त असतात. त्यांना प्रवास असा नसतो. पण, चित्रपट गीत लिहिताना पटकथा ऐकवली जाते. गीत नेमकं कशासाठी हवं आहे, ते सांगितलं जातं. कधी निखळ मनोरंजन म्हणून गीताची गरज असते, तर कधी एखाद्या मनाला भिडलेल्या भावनेचा उद्रेक उलगडून दाखवण्यासाठी, तिला धार यावी म्हणून एखादं गीत पेरलेलं असतं. कित्येकदा एखादी समांतर जाणारी, पण वेगळी कथा गीतातून दाखवायची असते. आजकाल काय होतं की, गाणं सुरु असतं तेव्हा कथा मधला मोठा पल्ला गाठत झरझर पुढे सरकते. हे सर्व गीतातून दाखवलं जातं. पूर्वी चित्रपट चांगला तीन तासांचा असायचा, त्यानंतर दोन तास, सव्वा तास आणि आता तर त्याची वेळ केवळ ५० मिनिटांवर आली आहे. गीत का हवं, याचं उत्तर मिळालं की बरेचदा, विशेषत: मराठी चित्रपट असेल तर मी संवाद ऐकतो. मराठीला अनेक बोली आहेत, त्या बोली त्या त्या भागातील संस्कृतीदर्शन करतात. तेव्हा गाणं लिहिताना, त्या संस्कृतीचं प्रतिबिंब शब्दात पडायलाच हवं. काही चित्रपटांची गीतं आणि संवादलेखनही मीच केलं. अशावेळी गीतं लिहिताना सोपं जातं आणि हल्ली काय होतं की, शब्द लिहून मग त्याला चाल लावणं होत नाही. आमच्याकडे येताना संगीत पहिले येतं, त्या लयीत बसतील असे मोजून-मापून शब्द लिहायचे असतात. थोडं आव्हानात्मक असतं हे. कारण, त्या वजनाचे, त्या भाषेतले आणि तेवढेच शब्द लिहायचे असतात. आज दुर्दैव हे की, मराठी न कळणारे संगीतकार आहेत. त्यांना उच्चारही व्यवस्थित माहिती नसतात. चाल लावताना कसंतरी संगीत बंधनांत शब्दांना कोंबलं जातं. कधी चुकीचा र्‍हसव लावला जातो, कुठे भलताच दीर्घ खेचला जातो. ऐकताना ते इतकं भयंकर वाटतं की, मी म्हणतो त्यापेक्षा तुम्ही तुमचं संगीत द्या, मी त्याप्रमाणे लिहून देतो. संगीताची मला आवड होतीच. पेटी, तबला याचं थोडं ज्ञान असल्याने चालीत, छंदात लिहिणं मला सोपं गेलं. संगीत कला मी जोपासली नाही, पण आयुष्यात संगीत होतंच. कोकणात प्रत्येक घरात पूर्वी पेटी किंवा काहीतरी संगीत उपकरण असायचेच. भीती केवळ एकच असते मला की, माझे शब्द पुन्हा येऊ नयेत. म्हणजे ‘मन उधाण वार्‍याचे’, ‘खेळ मांडला’ मधलं ‘उसवला’, असे काही शब्द आहेत, ते लोकांच्या मनावर कोरून आहेत. त्यामुळे त्यांना धक्का लागू नये, याची खबरदारी तेवढी घ्यावी लागते.

आज फेसबुकसारखं भन्नाट समाजमाध्यम हाती आल्याने कित्येक नवोदित कवी उदयास आले आणि म्हणूनच कविता चांगली की वाईट, यावरून कवी चांगला की वाईट असे विषय चर्चिले जातात. त्या अनुषंगाने, तुमच्यालेखी कविता म्हणजे काय? आणि उत्तम कवी कोण?

कविता किंवा सृजन म्हणजे, त्या त्या कवीचा प्रतिसाद असतो, असं मला वाटतं. कविता ही क्रिया नाही, तर प्रतिक्रिया आहे. त्या ओढून ताणून लिहू नयेत, नाहीतर त्या म्हातारीचे केस होतात. म्हणजे साखरेचा एकच दाणा असतो, पण फुलवून फुलवून त्याच्या तारा केल्या जातात. कविता हा एक विचार आहे. कवीचं म्हणणं आहे, केवळ शब्द नाहीत. त्यामुळे कविता संपली तरीही तुला नेमकं सांगायचं काय होतं, असा प्रश्न पडता कामा नये. कविता वाचकांना आपली वाटायला हवी. आता ग्रेस यांच्या कविता बर्‍याचदा लहानपणी वाचल्यावर समजत नाहीत, पण तुम्ही जेव्हा आयुष्याच्या त्या वळणावर येता, तेव्हा त्याच न कळलेल्या कविता अगदी चपखल बसतात, कळतात, त्यातला अर्थ सापडतो. त्यांच्या बर्‍याच कविता मला समजल्या नव्हत्या, पण एखाद्या मानसिक अवस्थेत तीच कविता आठवते आणि क्षणात तिचा उलगडा होतो.

एक राजकीय व्यंगचित्रकार म्हणून तुम्ही राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तेव्हा आजही पेन्सिल हाती घेऊन व्यंगचित्र रेखाटणं होतं का?

हो, मी स्वतःच्या आनंदासाठी करतोच ना! बर्‍याचदा सेटवर असेन, कुठे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बसलो असेन, तेव्हा स्क्रिप्टच्या मागच्या बाजूवर करतो, आता माध्यम बदललं, आयपॅडवर करतो. कागदावर केलं तर समोरच्या माणसाला देतोसुद्धा. व्यंगचित्रणाचा खूप फायदा होतो मला. लिहिताना, मांडताना. व्यंगचित्र रेखाटन करताना आपण माणसातलं मर्म शोधतो. तेच कवितेत मांडायचं असतं. ही निरीक्षणशक्ती मला बर्‍याचदा उपयोगी पडते.

नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांत तुम्ही मुशाफिरी केली आहे. आगामी काळात अन्य माध्यमांचा तुम्ही कवितेसाठी विचार करता का?

आज कवीची जबाबदारी असते, गाण्यातून कविता जपण्याची! आपण चित्रपटाचा इतिहास पाहिला तर तो मूकपटापासून बोलपटापर्यंत आलेला आहे. त्यात पहिले केवळ संगीत होतं, शब्द नंतर केव्हातरी आले. चाल आधी आणि शब्द नंतर हा वाद होता. त्यावर गुलझार साहेबांच्या मुलाखतीतील एक गोष्ट लक्षात राहिलीय, पडद्यावर चित्रपट सुरु असायचा आणि वाद्यवृंद ढमढम वाजवायचा. कुणीतरी त्याला ‘वन्स मोअर’ द्यायचा. तेव्हा संगीत हीच पर्वणी होती. शब्द मागाहून अनाहूतपणे आले. माझं चित्रपटासाठी लिहिलेलं पहिलं गाणंही तसंच, बर्मन यांनी मला चाल पाठवली आणि त्यावर शब्द लिहायला सांगितले.

मराठी चित्रपट असतील अथवा मालिका, गीत, संगीतामध्ये इंग्रजीची हल्ली सरसकट मिसळ होताना दिसते. एवढेच नाही तर इंग्रजाळलेले मराठी रॅपसाँग वगैरे प्रकारही सोशल मीडियावर तितकेच व्हायरल होतात. तेव्हा मराठी गीतावर होणार हे मिश्र भाषा संस्कृतीचं आक्रमण रोखायला हवं का? की हे सगळं स्वीकार्ह आहे? कलाकार लेखक आणि कवी म्हणून तुम्हाला काय वाटते?

मला वाटतं हे सगळं रोखायला हवं, असं कुणाला ओरडून सांगायला लागू नये. प्रत्येकाने ते स्वतः आचरणात आणावं. आता मी जेव्हा बोलतो तेव्हा सर्रास लोक मला म्हणतात, ‘तू फार जड मराठी बोलतोस.’ ही आपली भाषा आहे, ती जड-हलकी कशी काय होईल? काहीवेळा लोक म्हणतात, तू बोलत राहतोस, ते ऐकायला छान वाटतं. मराठीवर हिंदी आणि इंग्रजीचं आक्रमण इतकं झालं आहे की, काही शब्द आपण विसरू लागलोय. हिंदीचं कौतुक मला वाटतं, ते याचसाठी की कित्येक उर्दू शब्दांचा ते वापर करतात. तरुणांना आवडतात शब्द. शब्द शेवटी काय, आपल्या भावना, विषारी स्पष्ट मांडण्याचं परिमाण. मग मीही जुने मराठी शब्द पुन्हा आणायचा प्रयत्न करतो. आता नुकतं आलेलं गाणं, ‘बहरला मधुमास हा.’ ‘मधुमास’ शब्द मराठीच्या विस्मृतीत गेलेला, तो पुन्हा तरुणांच्या तोंडी आला आहे. हा प्रयत्न मात्र माझा अव्याहत चालू आहे. ही लिहित्या माणसांची जबाबदारी आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.