प्रतिज्ञापत्राचा अपमान...

    01-May-2023   
Total Views |
tamilnadu

तामिळनाडूमध्ये मागील अनेक वर्षांपासून बळजबरीने धर्मांतरण केल्याची कुठलीही घटना घडली नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्टॅलिन सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केले आहे. ख्रिस्ती मिशनरींच्या धर्मप्रसारामध्ये जोपर्यंत बेकायदेशीर मार्गांचा अवलंब होत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. लोक ज्या धर्माचे पालन करू इच्छितात, तो धर्म निवडण्याचा त्यांना अधिकार असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना स्टॅलिन सरकारने ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणार्‍या मिशनरींच्या कामांना ‘बेकायदेशीर’ म्हणता येणार नसल्याचे म्हटले. यामुळे स्टॅलिन सरकारचा खोटारडेपणा जगजाहीर झाला. धक्कादायक म्हणजे, राज्यात एकही धर्मांतरणाची घटना घडली नसल्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटले असले तरीही त्यात सत्यता शून्य आहे. मागील वर्षी चेन्नईतील एका नामांकित शाळेतील विद्यार्थिनींनी ख्रिश्चन प्रथा-परंपरांचे पालन करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला होता. चौकशीनंतर या मुलींना ख्रिश्चन होण्यासाठी धमकावले जात असल्याची बाब समोर आली. मागील वर्षी मे महिन्यात मद्रास उच्च न्यायालयाने शाळांमध्ये जबरदस्तीने सुरू असलेल्या धर्मांतरणाबाबत तामिळनाडू सरकारला फटकारले होते. तंजावर जिल्ह्यातील लावण्या या शाळकरी मुलीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. कन्याकुमारीतील एका शाळेतही धर्मांतरणाला नकार दिल्यानंतर विद्यार्थ्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. मागील महिन्यातच स्टॅलिन सरकारने विधानसभेत प्रस्ताव पारित करत ख्रिश्चन धर्म स्वीकारणार्‍या अनुसूचित जातीच्या लोकांनाही अनुसूचित जातींना मिळणारे लाभ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या प्रस्तावाला भाजपने कडाडून विरोध केला होता. स्टॅलिन यांना रा. स्व. संघाच्या पथसंचलनाचीही इतकी भीती वाटते की, त्यासाठी त्यांना अटी घालाव्या लागतात. सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या खोट्या माहितीमुळे त्या प्रतिज्ञापत्राचाही अपमानच झाला. तामिळनाडूतील जवळपास सहा टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ख्रिश्चनधर्मीय आहे, तर कन्याकुमारीत हे प्रमाण ४६ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे स्टॅलिन यांना ख्रिश्चनांचा पुळका येण्यामागे हिंदूविरोधी मानसिकता आणि मतांचे राजकारणच कारणीभूत आहे.

खर्गेंचा ‘नालायक बेटा’

सध्याच्या घडीला काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यासाठी जणू विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही दिवसांपूर्वी ‘विषारी साप’ म्हटले होते. त्यानंतर सर्व स्तरातून तोंडघशी पडल्यानंतर खर्गे यांनी ‘मी मोदींना नाही, तर भाजपला विषारी साप म्हटले,’ अशी सारवासारव केली होती. आता वडील इतके भव्यदिव्य काम करत असताना त्यांचा मुलगा तरी का मागे राहील म्हणा! त्यानेही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून पंतप्रधान मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून आपल्या संस्कारांची आणि अज्ञानाची चुणूक दाखवून दिली. खर्गे यांच्या मुलाने पंतप्रधान मोदींना ’नालायक बेटा’ असे म्हणत खालची पातळी गाठली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जमेल त्या पद्धतीने सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतेय. त्यासाठी भले पातळी सोडायची वेळ आली तरी चालेल. कलबुर्गी येथील रॅलीनंतर खर्गे यांचा मुला प्रियांक खर्गेने, “पीएम मोदी मालखेडा येथील बंजारा समाजाशी बोलतात की, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांचा मुलगा दिल्लीत बसला आहे. पण, अशा फालतू मुलाचे काय करायचे? अशा निरुपयोगी मुलाने घर कसे चालवायचे?” अशा शब्दांत पंतप्रधान मोदींवर प्रियांकने आक्षेपार्ह टीका केली. भाजपकडून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसकडून अनेकवेळा वैयक्तिक शाब्दिक हल्ले करण्यात आले. तेव्हापासून सुरू झालेली शाब्दिक हल्ल्यांची मालिका आजतागायत थांबलेली नाही. काँग्रेसच्या शाब्दिक हल्ल्यांना जनतेने दोन वेळा मतपेटीतून प्रत्युत्तरही दिले. परंतु, काँग्रेसने यातून काही धडा घेतलेला नाही. मणिशंकर अय्यर यांनी ‘चायवाला’ तर सोनिया गांधींनी ‘मौत का सौदागर’ म्हणून मोदींना हिणवले. राहुल गांधी यांनी तर ‘चौकीदार चोर हैं’ असा नारा दिला, जो नंतर त्यांच्यावरच उलटला आणि लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी पडला. आता यात मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आपले नाव जोडत मोदींना लक्ष्य केले. त्यानंतर मुलानेही मोदींवर टीका करण्यात पुढाकार घेतला. मोदींना नालायक बेटा म्हणणार्‍या खरगे यांच्या मुलाला शहाणं कसं म्हणता येईल? कारण, खर्गेंकडे तारतम्याची कमी असताना त्यांच्या मुलाला तरी बोलण्याचे भान कसे असणार म्हणा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.