पुणे : उन्हाळा सुरु झाला की डोळ्यासमोर येतात ते आंबे. आंबा हा सर्वांनाच आवडतो. पण याचे सुरुवातीचे भाव हे काही सर्वांनाच परवडणारे नसतात. पण, पुण्यातील गौरव सणस नावाच्या व्यक्तीने चक्क EMI वर आंबे विकण्याची आयडिया केली आहे.
गौरव सणस हे मागील अनेक वर्षांपासुन पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात आंबे विक्रिचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या पिकवलेला देवगड हापुस मिळतो. या वर्षांपासुन त्यांनी दुकानात EMI वर आंबे विकण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या कल्पनेला यशही आलं असून आतापर्यंत त्यांच्याकडुन दोन ग्राहकांनी EMI वर आंबे विकत घेतले आहेत.
गौरव सणस म्हणाले की, "महागडा आणि न परवडणारा मोबाईल नागरिक EMI वर घेतात, तर आंबे का घेऊ शकणार नाहीत. अशी कल्पना आमच्या डोक्यात आली. त्यानंतर पेटीएमच्या माध्यमातून ही कल्पना प्रत्यक्षात साकारली." इतकच नाही तर हा भारतातील पहिला प्रयोग असल्याचही गौरव सणस यांनी सांगितले.