मुघल शासक की बापजादे?

    29-Apr-2023   
Total Views |
 
History of Mughals
 
 
‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’चे प्रमुख (एनसीईआरटी)ने दहावी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकातून मुघलांचा इतिहास, नक्षली चळवळ आणि इतरही काही भाग वगळले आहेत. पण, मुघलांचा इतिहास का वगळला, ते राज्यकर्ते आहेत असे म्हणत केरळच्या कम्युनिस्ट सरकारने आणि केरळच्या ‘स्टेट कांऊसिल ऑफ एड्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग’ने (एससीईआरटी) तर जाहीर केले की, ‘एनसीईआरटी’ने वगळलेले मुघलांचा इतिहास, नक्षली चळवळ आणि इतर वगळलेले सगळे भाग, उतारे, कविता यावर आम्ही पुरवणी पुस्तक काढू आणि ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करू. तेव्हा, केरळच्या कम्युनिस्ट सरकारच्या या तुघलकी निर्णयाचा समाचार घेणारा हा लेख...
 
‘हे तर शिक्षणाचे भगवेकरण आहे, केरळ सरकार हे सगळं अजिबात खपवून घेणार नाही,’ असे केरळचे मुख्यमंत्री आणि तिथल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे नेते पिनराई विजयन म्हणाले. का तर म्हणे ‘एनसीईआरटी’ म्हणजे ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने दहावी ते बारावीच्या अभ्यासक्रमात बदल केला. केरळच्या मुख्यमंत्र्यांचा आणि कम्युनिस्ट पार्टीचा मुख्य आक्षेप काय तर? पाठ्यपुस्तकातून मुघलांचा एक पाठ वगळला आणि नक्षली चळवळीबद्दलची माहिती वगळली. ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’चे प्रमुख (एनसीईआरटी) दिनेश सकलानी यावर म्हणतात की, ”कोरोना काळात विद्यार्थ्यांना प्रत्येक कक्षेत तेच तेच अभ्यासायला नको किंवा एखादा पाठ वगळला, तर काही नुकसान न होता अभ्यासक्रम कमी होईल, हे ध्यानात घेऊन अभ्यासक्रमातील काही पाठ वगळले आहेत. तसेच, मुघलांसंदर्भातले सगळेच पाठ किंवा उतारे काढले नाहीत. इतर कक्षेत मुघलांसदंर्भात धडे आहेत. त्यांनी त्याबाबतचे पुरावेही दिले आहेत. मात्र, तरीही केरळ सरकारला ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने वगळलेले पाठ केरळच्या मुलांना शिकवायचे आहेत. यावर केरळच्या ‘स्टेट कांऊसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग’ने(एससीईआरटी) तर जाहीर केले की, ‘एनसीईआरटी’ने वगळलेले सगळे पाठ, उतारे, कविता यावर आम्ही पुरवणी पुस्तक काढू आणि ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करू. केरळचे शिक्षणमंत्री वी. शिवनकुट्टी यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.
 
मुघलांचा पाठ वगळला याबद्दल केरळच्या कम्युनिस्ट सरकारला इतका का राग यावा? तर यात काही आश्चर्य नाही. प बंगालमध्ये त्यांची सत्ता असताना त्यांनी पाठ्यपुस्तकाबद्दल स्पष्ट नीती जाहीर केली होती की, ”मुसलमानांच्या हिंदूंवरील अत्याचाराबाबत किंवा मंदिर तोडण्याबाबत विशेष काही पाठ्यपुस्तकात असू नये.” तर प. बंगालमध्ये असे सांगणारे कम्युनिस्ट पार्टी केरळमध्ये मुघलांचा पाठ काढल्यानंतर उद्विग्न होणार, हे नक्की. कम्युनिस्ट पार्टी आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना केरळमधील 27 टक्के मुसलमानांना भुलवायचे आहे. केरळमध्ये सध्या अनेक कारणांनी हिंदू एकत्रित होत आहे. विद्यार्थी असू देत की सामान्य जनता, हिंदू धर्म आणि जीवनशैली याबाबत त्यांच्यात कधी नव्हे, तो आक्रमक बदल झालेला दिसतो. त्याचवेळी देशभरात भाजपची वाढती ताकद आणि धर्मसंस्कारांचा वाढता संकल्प, यामुळे केरळची मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हवालदिल झाली आहे. निवडणुकांमध्ये हिंदूंनी भाजपला मतदान केले, तर एकगठ्ठा मुस्लिमांची मते मिळवता आले पाहिजे. मात्र, मुस्लिमांच्या मतांवर तर काँग्रेसही हक्क सांगते. ओवेसी आणि त्यांचा पक्ष हा सुद्धा केरळमध्ये लोकप्रिय होत आहे. या सगळ्या पाश्वर्र्भूमीवर मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवायची, तर काही ना काही करायला हवे आणि ते मुख्यत: हिंदू समाज किंवा भाजप मोदींच्या विरोधात करायला हवे, असे काहीसे केरळच्या कम्युनिस्ट पार्टीला वाटते. त्यामुळे पाठ्यपुस्तकातून मुघलांचा धडा किंवा उतारा काढल्यानंतर आपल्या बापजाद्यांचाच जणू इतिहास काढला, या आवेशात केरळचे कम्ुयन्सिट वागत आहेत.
 
मात्र, या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थितहोतात. ते म्हणजे, मुघल किंवा मुस्लीम आक्रमकांनी भारतीय हिंदूंवर अगदी नीतीपूर्ण पद्धतीने विकासात्मकरित्या राज्य केले होते का? त्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळे सुखनैव आणि चांगलेच होते का? मग या मुस्लीम आक्रमणकर्त्यांचे राज्य जर इतके चांगले होते, तर गुरूनानक देवापासून ते पृथ्वीराज चौहानांपासून ते आपल्या छत्रपती शिवाजीमहाराजांनी त्यांना विरोध का केला? त्या विरोधाचे जे कारण होते, ते कारण पाहता खरंच मुस्लीम आक्रमकांचा इतिहास हा आमच्या गौरवाचा इतिहास होऊ शकतो का? सगळ्या हिंदुस्थानातील काफिरांचा रक्तपात, नीतीपात, धर्मपात करीत त्यांना आपल्या टाचाखाली रगडू पाहणार्‍यांना भारतीय शूर सुपुत्रांनी कायमची कबर दाखवली, हे पाठ्यपुस्तकात असते, तर दुसर्‍या बाजूने आमचा खरा शूरवीरांचा आणि तेजाचा इतिहास पाठ्यपुस्तकात आलाही असता. पण, हा खरा इतिहास लपवला गेला. याचा सुप्त परिणाम असाही झाला की, आपण इतिहास सर्रास सांगतो की, मुसलमानांनी शेकडो वर्षं आमच्यावर राज्य केले. पण, ते पराभूत होत होते, ते षड्यंत्र रचत होते, कावेबाजपणे लुटत होते हे कुठेही आलेले नाही. हे सत्य सांगायलाही देशातील काही लोकांचा विरोध आणि हो, वस्तीपातळीवर हलाखीच्या परिस्थितीतील लोकांना बोलताना मी ऐकले आहे की, ‘हमारे कौमने तुमपर राज किया हैं. म्हणे, आता जे तुमचे आहे, ते आम्ही तुम्हाला दिले आहे!
 
दुसरे असे की, नक्षली चळवळीवरचा धडाही केरळ सरकारला हवा आहे. तर का? नक्षलींचे हल्ले, ते देशाच्या कायदा-सुव्यवस्था आणि एकतेवरचा करीत असलेले प्रहार सगळ्यांनाच माहिती आहेत. पण, पाठ्यपुस्तकात या चळवळीचा उदय सांगताना काय सांगितले आहे ते पाहा. जमीनदार गरिबांवर अत्याचार करायचे. त्याला विरोध म्हणून ही चळवळ उभी राहिली. असेलही,पण आता त्या चळवळीचे गोडवे गाणे कितपत योग्य? नक्षली म्हणजे गरिबांना न्याय मिळवून देतात, हे एक दिवास्वप्नच. केरळ सरकारला हे दिवास्वप्न विद्यार्थ्यांना दाखवून काय साध्य करायचे आहे? गांधी हत्येमध्ये रा. स्व. संघाचा दुरान्वयेही संबंध नव्हता, हे अगदी सर्वच स्तरावर सत्य आहे आणि तसे पुरावेही आहेत. मात्र, केरळ सरकारला गांधीहत्येनंतर रा. स्व. संघावर जी बंदी आणली, त्यावर मात्र मुलांना धडे शिकवायचे आहेत. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. केरळमध्ये रा. स्व. संघाचे स्वंयसेवक, भाजपचे कार्यकर्त्यांचे हत्याकांड थांबता थांबत नाही. कम्युनिस्टांचा आवडता रंग लाल आहे. केरळची भूमी निष्पापांच्या रक्ताने रंगली आहे. हे सत्य लपवण्यासाठी केरळ सरकारला रा. स्व. संघाची बदनामी करायची आहे. रा. स्व. संघ, भाजप आणि हिंदू समाज यांच्याविरोधात जाऊन मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याचा हा केरळच्या कम्युनिस्टांचा प्रयत्न आहे.
 
केरळ कम्युनिस्टांना मुघलांचे उदात्तीकरण करायचे आहे, हे लिहिताना मला पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकातला इतिहास आठवतो. पाकिस्तानच्या इतिहासात शिकवले जाते की, ”मूळ पाकिस्तानमध्ये हिंदुस्थान, बांगलादेश वगैरे भूभाग होता. आलमगीर औरंगजेब सम्राटाच्या सत्तेत सगळेच सुखी होते. मात्र, 1947 साली इंग्रज आणि हिंदू लोकांनी पाकिस्तानचे तुकडे केले आणि देशाचा एक तुकडा भारत झाला.” तर असा हा पाकिस्तानी इतिहास! त्याच्या जोडीला आमच्या पाठ्यपुस्तकात मुघलांचे सांग्रसंगीत वर्णन केलेला इतिहास होताच. त्यातला काही भाग काढल्यावर मुस्लिमांच्या मतावरच जीवंत असलेल्या राजकारण्यांना दुःख तर होणारच. हिंदू असलेले पिनराई विजयन यांना मोपल्यांचे बंड काय माहिती नसेल? टिपू सुलतान आणि मोपल्यांनी किती अत्याचार केले, हे त्यांना खरंच माहिती नसेल? पण, केरळमधील समाजअभ्यासकांच्या मते, विजयन यांचे त्यांची मुलगी वीणा हिच्या मर्जीशिवाय पान हलत नाही आणि वीणाचे पान तिचा पती मोहम्मद रियाज याच्याशिवाय हलत नाही. मोहम्मद रियाज सध्या केरळमध्ये मंत्री आहेत. ते पूर्वी ‘द डेमोक्रटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’चे अखिल भारतीय अध्यक्ष होते. मोहम्मद रियाज हेच केरळचे पुढचे मुख्यमंत्री होणार, असेही पिनराईंना वाटते. मुख्यमंत्र्यांची मुलगी एका थातूरमातूर पक्षाच्या अध्यक्षाच्या प्रेमात काय पडते, लग्न काय करते आणि सगळी केरळ राजसत्ता पिनराईपेक्षा मोहम्मद रियाज याच्याभोवती का फिरते, याचे कारण काय याबद्दल दबक्या आवाजात चर्चा आहे. केरळचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष तिथल्या 51 टक्के हिंदूंचा आवाज दाबून 27 टक्के मुस्लिमांचा आवाज का बनत आहे, याचा संबंध मोहम्मद रियाजशी नाही ना, असेही काही जणांना वाटते. तसे असेल तर खूपच वाईट आहे. बाकी केरळचे कम्युनिस्ट सरकार देशाच्या आणि केरळच्या जनतेचाही सूर ओळखण्यात चूक करत आहेत, हे नक्की!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.