मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी थेट सिल्व्हर ओक ला भेट दिली. दरम्यान, या भेटी मागे कोणतेही राजकारण नाही. तसे कोणीही करु नये, असे उदय सामंत म्हणाले. अखिल भारतीय नाट्यपरिषदेची निवडणूक आहे. याची माहिती देण्यासाठी आपण पवार यांना भेटलो, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
अधिक माहिती देताना सामंत म्हणाले, "राजकारणाच्या पलिकडेही काही गोष्टी असतात. अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. दोन जिल्ह्यातील निकाल जाहीर होणं अद्याप बाकी आहे. शरद पवार हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आहे, प्रमुख आहेत. त्यांना या निवडणुकीची माहिती देण्यासाठी आम्ही गेलो होतो."
"निवडून आलेले सदस्य देखील माझ्यासोबत होते. यापलिकडे दुसरा कोणताही राजकीय विषय किंवा हेतू नव्हता. ज्या व्यक्तीने ही संस्था स्थापन करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, ज्या व्यक्तीच्या नेतृत्त्वाखाली ही संस्था चालते त्या संस्थेच्या निवडणुकीत नेमकं काय झालंय हे विश्वस्त म्हणून सांगणं ही माझी जबाबदारी आहे. त्या संस्थेत मी देखील विश्वस्त आहे. या नात्यानेच तहहयात विश्वस्त शरद पवार असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो," अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.