मुंबई : “दर्शन सोळंकी आणि त्याच्या वर्गातील अरमान खत्री यांच्यात आधी वाद झाला होता. या वादाच्या नंतर दर्शनने आत्महत्या करत आपले जीवन संपविले होते. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण देऊन फुटीरतावाद्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे,” असा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला आहे. मुंबई ‘आयआयटी’मधील विद्यार्थी असलेल्या दर्शन सोळंकीच्या आत्महत्या प्रकरणावरून अद्याप गदारोळ सुरुच आहे. या प्रकरणी ’एसआयटी’च्यावतीने तपास सुरू झाला असून दर्शनची ‘सुसाईड नोट’ही हाती लागली आहे. त्यातच भाजप आमदार राम सातपुते आणि माजी खासदार अमर साबळे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केले आहे. ”मुंबई ‘आयआयटी’चा विद्यार्थी दर्शन सोळंकीने अरमान खत्री सोबत वाद झाल्यानंतर आत्महत्या केली. पोलीस तपासातून सत्य बाहेर येण्यापूर्वीच राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, काँग्रेस आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह ‘आयआयटी’तील काही डाव्या फुटीरतावाद्यांकडून या प्रकाराला सामाजिक वळण देत समाजात दुही पसरवण्याचा प्रयत्न झाला असून आम्ही त्याचा निषेध करतो, ” असे सातपुते आणि साबळे यांनी म्हटले आहे.
सखोल चौकशीची सरकारकडे मागणी
या घटनेनंतर मुंबई ‘आयआयटी’मधील एका विद्यार्थ्याने काही आक्षेपार्ह घोषणादेखील दिल्या असून त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दर्शनने आपल्या सुसाईड नोटमध्ये ’Arman killed me’ असा उल्लेख केला आहे. तरी दर्शनने हा उल्लेख का केला, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे आणि तो व्हावा, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करत आहोत,” असे सातपुते आणि साबळे यांनी म्हटले आहे.
आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्नांची गरज
देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये अशाप्रकारच्या घटना घडणे हा गंभीर विषय आहे. शिक्षण संस्थांमध्ये चालणारा जातीयवाद, त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर सरकारने मार्ग काढणे आवश्यक असुन विद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे, अशी भावना माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केली आहे.