दरवर्षी दि. २४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी क्षयरोग निर्मूलनाबद्दल लोकजागृतीचे कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. त्यानिमित्ताने क्षयरोगाची लक्षणे, निदान आणि उपचार याची माहिती देणारा हा लेख...
क्षयरोग हा पूर्वी एक दुर्धर आधार समजला जायचा व यावर विशेष उपचार नव्हते. दि. २४ मार्च, १८८२ साली रॉबर्ट कॉक यांनी ‘मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलिस’ या जंतूमुळे क्षयरोग (टीबी) होतो, हा शोध लावला. अतिशय संथगतीने या जंतूंची वाढ होते. त्यामुळे याची लक्षणे सुरुवातीस सौम्य दिसतात. निदान करण्यास हा आजार कठीण आहे. याचे उपचारदेखील सुमारे सहा ते नऊ महिने असतात. रॉर्बट कॉक यांनी १८८२ साली लावलेल्या शोधास दि. २४ मार्च, १९८२ साली १०० वर्षे पूर्ण झाली. त्या दिवसापासून दि. २४ मार्च हा ‘जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन’ म्हणून साजरा केला जातो. क्षयरोगाचे निर्मूलन करणे हा त्यामागचा उद्देश. २०३० पर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन व्हावे, असे धोरण जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केले आहे, तर भारतातून २०२५ पर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन व्हावे, असे केंद्र सरकारचे धोरण आहे.
जंतूंमुळे (बॅक्टेरिया) होणार्या आजारापेक्षा क्षयरोग व कुष्ठरोग हे थोडेसे वेगळे आहेत. या दोन्ही जंतूंची वाढ अतिशय धीम्या गतीने होत असल्यामुळे त्याचा शरीरात प्रसारही हळूहळू होतो. सुरुवातीला लक्षणे अतिशय सौम्य असतात. आजार बरा होण्यासदेखील इतर जंतूमुळे होणार्या आजारांपेक्षा खूप जास्त वेळ लागतो. घशाचा दाह, ‘टायफॉईड’, ‘न्यूमोनिया’ हे आजार पाच ते सात दिवस प्रतिजैविके (अॅण्टिबायोटिक्स) घेतल्यावर बरे होतात, तर क्षयरोगाचे उपचार सहा ते नऊ महिने चालतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस क्षयरोगावर विशेष उपचार नव्हते. रुग्णास थंड हवेच्या ठिकाणी ‘सॅनिटोरीयम’मध्ये ठेवले जायचे. पथ्यपाणी पाळण्यास सांगितले जायचे. यातील बरेचसे रुग्ण दगावायचे. कारण, यावरील औषधे उपलब्ध नव्हती. पुढे ‘आयसोनेक्स’, ‘स्ट्रेप्टोमायसिन’, ‘पॅरा अमायनो सॅलिसिलिक अॅसिड’ (पास) ही औषधे उपलब्ध झाली. उपचाराचा कालावधी सुमारे १८ महिन्यांचा असायचा. दिवसाला एक अशी ६० ‘स्ट्रेप्टोमायसिन’ची इंजेक्शने दिली जायची. अगदी लहान मुलांनादेखील ६० इंजेक्शनचा कोर्स घ्यावा लागत असे. रोजच्या इंजेक्शनचे दुखणे, महागडी औषधे आणि दीड वर्षांचे उपचार, यामुळे अनेक रुग्णांकडून औषधे अर्धवट बंद केली जायची व त्यामुळे पुढे आजार बळावायचा. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना व शेजारच्या लोकांना होण्याची शक्यता निर्माण व्हायची.
१९८०च्या दशकाच्या सुरुवातीस ‘रिफामपिसीन’ आणि ‘पायराझिनामाईड’ या औषधांचा क्षयरोगासाठी उपयोग होऊ लागला. यामुळे क्षयरोगाच्या उपचारात क्रांती झाली. ‘स्ट्रेप्टोमायसिन’चे रोजचे इंजेक्शन बंद झाले. उपचाराचा कालावधी १८ महिन्यांवरुन सहा महिने ते नऊ महिन्यांचा झाला. ‘रिफामपिसीन’ औषध सुरु केल्यावर काही दिवसांतच या जंतूंची रोगाचा प्रसार करण्याची क्षमता क्षीण होते. त्यामुळे रोगाचा प्रसार कमी झाला. २०१४ पासून ‘राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमा’तही अनेक बदल करण्यात आले. पूर्वी क्षयरोगाच्या चाचण्या, औषधे सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध होती. तेथे मिळणारी तुच्छतेची वागणूक यामुळे रुग्ण तेथे औषध घेण्यास नाखूश असे. बाहेर ही औषधे महागडी असल्यामुळे सामान्य रुग्णास ती परवडत नव्हती. यामुळे अनेक रुग्ण उपचार अर्धवट सोडत.
२०१४ नंतर केंद्र सरकारने क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात अनेक सेवाभावी संस्था, खासगी फिजिशियन, चेस्ट फिजिशियन, फॅमिली डॉक्टर यांना सहभागी केले. यांच्यामार्फत क्षयरोगाचे निदान मोफत होऊ लागले. यात एक्स-रे (चेस्ट), थुंकीचा तपास व रक्ताचा तपास यांचा समावेश होता. या सर्व महागड्या चाचण्या अगदी खासगी प्रयोग शाळेतदेखील मोफत होऊ लागल्या. ‘अलर्ट इंडिया’सारख्या संस्थेमुळे या सर्व रुग्णांची व्यवस्थित नोंदणी होऊन पाठपुरावा ठेवण्यात येऊ लागला. क्षयरोगाचे निदान झाल्यास खासगी डॉक्टरांनी लिहून दिलेली क्षयरोगाची औषधे खासगी ‘केमिस्ट’च्या दुकानात मोफत मिळू लागली. ही औषधे नीट घेतली जातात की नाही, यासाठी सेवाभावी संस्था सहकार्य करु लागल्या. ‘निरामय हेल्थ फाऊंडेशन’ने ‘गोदरेज कंपनी’च्या ‘सीएसआर फंड’द्वारे क्षयरोगाच्या रुग्णास मोफत पूरक आहार देण्यास सुरुवात केली. असंख्य रुग्णांना याचा लाभ झाला. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन क्षयरोग नियंत्रण प्रभावीपणे होऊ लागले. सर्व पातळ्यांवर सहकार्य लाभले, तर क्षयरोगाचे २०२५ पर्यंत भारतातून निर्मूलन शक्य आहे.
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिनानिमित्त क्षयरोगाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया.
क्षयरोग हा ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या जंतूमुळे होतो. हवेतून या जंतूंचा प्रसार होतो. हवेतून हे जंतू फुप्फुसात जातात व तेथे ते संथगतीने वाढू लागतात. दाट लोकवस्ती, अस्वच्छता, हवेतील प्रदूषण, रस्त्यावर थुंकणे, औषधे अर्धवट बंद करणे या सर्व गोष्टींमुळे क्षयरोगाचा प्रसार होतो. सुरुवातीची लक्षणे सौम्य असल्यामुळे त्यावर दुर्लक्ष केले जाते.
बालक्षयरोग
नवजात अर्भकाला तिसर्या दिवशी ‘बीसीजी’ लस दिली जाते. ही लस क्षयरोग प्रतिबंधासाठी आहे. या लसीमुळे मिळणारे संरक्षण हे सुमारे ९० टक्के आहे. ते इतर लसींपेक्षा पुष्कळच कमी आहे. अनेक लहान मुलांना ’बीसीजी’ लस देऊनदेखील बालक्षय रोगाची लागण होते. ८०च्या दशकात ही लस देणे बंद करावी का, असा मतप्रवाह सुरु झाला होता. अनेक पाश्चात्य देशांनी ही लस देणे बंद केले होते. असे जरी असले तरी आजही आपल्या देशात ‘बीसीजी’ लस दिली जाते. क्षयरोग प्रतिबंधात जरी ही लस थोडी कमी पडत असेल, तरी क्षयरोगामुळे होणार्या गुंतागुंतीवर ती प्रभावी आहे. म्हणून ‘बीसीजी’ लस भारतासारख्या देशात दिली जावी, असे वैयक्तिक मत आहे.
लक्षणे
१) लहान मुलांमध्ये अंगात बारीक ताप येणे, भूक न लागणे, वजन न वाढणे.
२) नेहमीच्या औषधांनी ताप न उतरणे, तापाचे निदान न होणे.
३) सर्दी, खोकला, ताप वारंवार येणे.
याशिवाय प्रौढांमध्ये भूक मंदावणे, सारखा खोकला येणे, धाप लागणे, थुंकीत रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे इत्यादी लक्षणे दिसतात.
चाचण्या
लहान मुलांमध्ये ‘मांटुज टेस्ट’ ही महत्त्वाची चाचणी असते. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ही चाचणी करुन घ्यावी.याशिवाय ’सीबीसी’, ‘ईएसआर’, छातीचा एक्स-रे, थुंकीचा तपास केला जातो. रोगाचे निदान पक्के करण्यासाठी अनेक अद्ययावत चाचण्या हल्ली मोफत केल्या जातात.
उपचार
१) पायराझिनामाईड- पहिले दोन महिने
२) रिफामपिसिन आणि आयसोनेक्स सहा ते नऊ महिने.
‘रिफामपिसिन’मुळे लघवी नारंगी, लालसर रंगाची होते. उपचारादरम्यान काहीही त्रास असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. परंतु, स्वत:हून औषधे बंद करु नये.ही औषधे सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. एक महिन्याची औषधे एकत्रितपणे दिली जातात. तसेच ही औषधे सेवाभावी संस्थांमार्फत व खासगी डॉक्टरांमार्फतदेखील मोफत उपलब्ध आहेत. केंद्र सरकारतर्फे लहान मुलांनादेखील आहार भत्ता म्हणून दरमहा ५०० रुपये दिले जातात. हे पैसे रुग्णांच्या पालकाच्या खात्यात दरमहा जमा होता.
सरकारतर्फे क्षयरोग निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत. यात सामान्य नागरिकांचा सहभागदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. सार्वजनिक स्वच्छता पाळणे, रस्त्यावर थुंकणे टाळणे, धुम्रपान, मद्यपान टाळावे, समतोल आहार घेणे, रोज प्राणायाम, उपासना, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा यापैकी काहींचा अवलंब करणे. क्षयरोगाच्या रुग्णांबद्दल आपुलकी बाळगणे व त्यास उपचार पूर्ण करण्यास मदत करणे.भारत २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त होवो, ही सदिच्छा!
-डॉ. मिलिंद शेजवळ