गांधीनगर : "सगळेच मोदी चोर असतात!", अशा आशयाचे वक्तव्य करणे काँग्रेस खासदार राहुल गांधींना चांगलेच महागात पडले. त्यांना सुरतच्या जिल्हा न्यायालयातर्फे दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. नीरव मोदी प्रकरणाबद्दल बोलत असताना राहुल गांधींची जीभ घसरली होती. राहुल गांधीची तूर्त दहा हजारांच्या जामीनावर सुटका झाली आहे. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या समाजाबद्दल वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद संसदेतही उमटले. राहुल गांधींविरोधात सत्ताधारी खासदारांनी आंदोलन केले.
नेमकं घडलं काय?
ललित मोदी, नीरव मोदी यांनी केलेल्या गैरव्यवहाराबद्दल बोलताना राहुल गांधींनी सर्वच मोदी चोर असतात, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले. या प्रकरणात समाजाच्या वकिलांनी राहुल गांधींविरोधात खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी आपले वक्तव्ये हे ललित आणि नीरव मोदींविरोधात भ्रष्टाचाराविरोधात होते, असे म्हटले आहे. मात्र, राहुल गांधी हे सतत अवमानजनक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते भारतातच नव्हे तर देशाबाहेर जाऊनही देशाचा अवमान करत असतात, असा दावा राहुल गांधींच्या प्रतिवाद्यांनी केला होता. दरम्यान, राहुल गांधींनी जर दोन भ्रष्ट उद्योगपतींविरोधात वक्तव्य केले म्हणून जर शिक्षा होणार असेल तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.