मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत काढण्यात येणाऱ्या आगामी लॉटरीमध्ये अत्यल्प - अल्प गटातील २ हजार ६८३ घरांचा समावेश होणार आहे. पहाडी गोरेगाव येथे १ बीएचके आकाराची ही घरे सर्वसामान्य चाकरमान्यांना अंदाजे ३५ लाखात तर अल्प गटातील घरे ४५ लाखात उपलब्ध होणार आहेत. मुंबईत घराचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असताना म्हाडा अत्यल्प किमतीत घरे उपलब्ध करून देणार असल्याने मुंबईत हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच कन्नमवार नगर,वडाळा आणि मुंबईतील विखुरलेल्या एकूण ४ हजार घरांची सोडत मार्च महिन्यात काढण्याची तयारी मंडळाकडून सुरू आहे.
मुंबई उपनगरात म्हाडा सर्वसामान्यांसाठी १ बीएचके आकाराचे घर उभारत आहे. ही घरे आधुनिक सोयीसुविधा आणि उत्तम बांधकाम दर्जाची असून कमी किमतीमध्ये लक्झरी अनुभव देणारी ठरणार आहेत. गोरेगांव मध्ये १ हजार ९४७ घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणारा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
मुंबई मंडळाच्या लॉटरीद्वारे गोरेगांव (पश्चिम ) येथील बांगूर नगर समोरील पहाडी गोरेगाव येथे तेवीस माळ्यांच्या सात इमारतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (इडब्लूएस) १ हजार २३९ घरे उपलब्ध आहेत या घरांचे क्षेत्रफळ ३२२. ६० चौरस फूट इतके आहे. या घरांची किंमत अंदाजे ३५ लाख इतकी असणार आहे.तर उन्नत नगर नंबर २, प्रेम नगर येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७०८ घरे आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) ७३६ घरे आहेत. घरांचे क्षेत्रफळ ४८२.९८ चौरस फूट इतकी आहे. येथील घरांची किंमत अंदाजे ४५ लाखाच्या आसपास असणार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी (एमआयजी) २२७ घरे आहेत या घरांचे क्षेत्रफळ ७९४.३१ चौरस क्षेत्रफळ इतके आहे तसेच उंचच उत्पन्न गटासाठी (एचआयजी) १०५ घरे आहेत या घरांचे क्षेत्रफळ ९७८.५८ चौरस फूट आहे घरे आहेत या घरांची लॉटरी पुढील वर्षी होणार आहे.