मुंबई : घाऊक बाजारात कांद्याचे दर पडल्याने विरोधकांनी तोच मुद्दा पुढे करत मंगळवारी विधिमंडळात जोरदार गोंधळ घातला. कांद्यावरुन विरोधकांची रडारड सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवेदन करत असताना विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विरोधक शांत झाले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी मंगळवार, दि. 28 फेब्रुवारी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. विरोधकांनी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी विधान भवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले.राज्यात शेतकर्यांना रडवणारा हाच कांदा मात्र विदेशात ग्राहकांना रडवत आहे. फिलिपिन्स, तुर्की, पाकिस्तान या देशांत कांद्याचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे कांदा खाणे सामान्यांना परवडेनासे झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या आमदारांनी कांदा आणि लसणाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व आमदार यात सहभागी झाले.यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यात सध्या कांद्याचे भाव पडलेले आहेत. अशा स्थितीत सरकार कांदा उत्पादकाच्या पाठीशी आहे. नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे.” मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावरही विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला होता.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच उभे राहत प्रत्युत्तर दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यात लाल कांद्याची खरेदी नाफेडकरुन सुरू झालेली आहे. यावर विरोधकांचा विश्वास नसेल, तर त्यांनी आमच्यावर हक्कभंग आणावा,” असे आव्हानच देवेंद्र फडणवीसांनी दिले. त्यानंतर विरोधक शांत बसले.