आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे योगशास्त्र

    27-Feb-2023
Total Views | 152
Yoga science


आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिन.’ दि. २८ फेब्रुवारी रोजी जागतिक कीर्ती लाभलेले, भारतातील तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांतील अनेक विश्वविद्यालयांत मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम व संशोधन केलेल्या, ‘फेलो-अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’, ‘अमेरिकन असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’, ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायकोलॉजी’, ‘असोसिएशन ऑफ ह्युमनेस्टिक सायकोलॉजी’ असे अनेक मानसन्मान लाभलेल्या डॉ.पंढरीनाथ प्रभू यांच्या ‘भारतांतील शास्त्रांचा उद्गम व विकास-मानससामाजिक मूलाधार व आज घ्यावयाचे धडे’ या ग्रंथातील योगशास्त्रासंबंधीची माहिती व जगात होत असलेले संशोधन याबद्दल संक्षेपाने जाणून घेणे उचित ठरेल.


गेली अनेक वर्षे पाश्चात्य देशांत विशेषतः अमेरिकतेतल्या अनेक प्रयोगशाळांत, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भारतातील आद्य ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी अंतःप्रज्ञेने निर्माण केलेल्या ज्योतिर्गणित, अंकगणित, आयुर्वेद, योगविद्या, ध्यानविद्या (मेडिटेशन) इत्यादी अनेक शास्त्रांवर प्रयोगांद्वारे संशोधन चालू आहे. भारतीय वेदोपनिषदात वर्णन केलेल्या ’मृत्यूनंतरचे जीवन’ व मंत्रविद्या यावरही संशोधन चालू आहे.वैद्यकशास्त्र व आरोग्य यांच्याशी निकट संबंध असलेला, परंतु स्वतंत्रपणे निर्माण झालेला व विकास पावलेला आणि तोही भारतात, असा शास्त्रीय विषय म्हणजे ‘योगशास्त्र.’
 
वैद्यकशास्त्राप्रमाणे ‘योगशास्त्र’ शास्त्रही आहे व व्यवहारही (थिअरी व प्रॅक्टिस) आहे. गेल्या अनेक वर्षांत पाश्चात्य देशांत व विशेषतः अमेरिकेत शास्त्रज्ञांना, तसेच सामान्य लोकांना या विषयाचे व व्यवहाराचे फार आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे ’योग’ या विषयावर अमेरिकेत व इतर पाश्चात्य देशांत अनेक प्रयोगशाळांत अद्ययावत यंत्रोपकरणांच्या साहाय्याने फार मोठ्या प्रमाणात म्हणजे आश्चर्य वाटावे, एवढ्या प्रमाणात संशोधन चालले आहे. त्यांचे निष्कर्षही कल्पनातीत फलदायी असल्याने, हा विषय अमेरिकेतील अनेक शिक्षण संस्थातल्या शिक्षणक्रमात समाविष्ट केला आहे. काही संस्था ’योग’, ’ध्यान’ व तत्संबंधी विषयात बी.ए,एम.ए,व पीएच.डी या पदव्याही देतात. अमेरिकेत महर्षी महेश योगी यांच्या प्रचाराने व प्रयत्नांनी तर केवळ ’ध्यान’ (मेडिटेशन) या विषयालाच वाहून घेतलेले एक स्वतंत्र विश्वविद्यालय सरकारी सनद (चार्टर) मिळवून स्थापन झाले आहे. नेदरलँडमध्ये ’महर्षी युरोपियन रिसर्च युनिव्हर्सिटी’ स्थापन झाली असून त्यांनी त्या विषयाला ’ट्रान्स्डेनटल मेडिटेशन’ असे नाव दिले आहे.
 
योगविद्येवरील पहिला प्रमाणभूत ग्रंथ ’योगसूत्र.’ या ग्रंथाचा कर्ता पतंजली मुनी (सुमारे इ.स.पूर्व १०० ते इ.स.३००). या ग्रंथात असलेले ज्ञान पतंजलीच्या आधी काही पिढ्या व शतके भारतांत प्रचलित असले पाहिजे. पतंजलीने हे प्रचंड व्याप्तीचे विखुरलेले व गुरुशिष्य परंपरेने चालत आलेले सर्व सैद्धांतिक ज्ञान एकत्रित करून, सुसंगत रीतीने शक्य तेवढ्या थोडक्या शब्दांत, सूत्रांच्या भाषेत केवळ १९६ सूत्रांत ग्रंथित केले आहे. पतंजलीने आपल्या अंतःप्रज्ञेचाच वापर प्रामुख्याने करून ते ज्ञान एक सुव्यवस्थित सिद्धांत प्रणाली म्हणून प्रथमच निर्माण केले.योग म्हटल्यावर पुष्कळांच्या नजरेसमोर प्राणायाम व आसने उभी राहतात. ते सर्व शरीरावर व शरीराच्या अंतर्बाह्य व्यवहारावर हळूहळू मनाचे प्रभुत्व प्रस्थापित करण्याकरिता करावयाचे असतात व ते हठयोगाचा भाग आहेत. परंतु, पतंजलीचे ध्येय हठयोगासारखे मनाचे प्रभुत्व शरीरावर प्रस्थापित करण्यापुरते मर्यादित नाही. त्यापुढे जाऊन व्यक्तीचे मन, शरीर, निसर्ग व एकंदर परिसर यांचे एकत्व, यांचा योग, म्हणजे अंतिम पातळीवरचा योग प्रस्थापित करणे हा आहे. हे वरिष्ठ पातळीवरचे ध्येय, हा खरा अंतिम योग, पतंजलीच्या योगसूत्राचा विषय असल्यामुळे पातंजल योगाला ’राजयोग’ असे म्हणतात.
 
प्राथमिक योगसाधनेने मन व इच्छाशक्ती यांच्या शरीरावर असलेल्या अधिकाराचा शोध लागतो. पातंजल योगाच्या ज्ञानाने व अनुभवाने मनुष्य स्वतःचाच नाही, तर चराचरसृष्टीचा अधिपती होतो. राजयोगाच्याद्वारे मनुष्य प्रथम स्वतःचे मन व शरीर यांची एकता अथवा योग अनुभवतो. नंतर त्यांची व इतर विश्वाची एकता अथवा योग व नंतर शेवटची पायरी म्हणजे जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य अनुभवतो.अशा प्रकारे योगसाधना करीत असता त्याला ज्या निरनिराळ्या शक्ती अथवा सामर्थ्य प्राप्त होत जातात, त्यांना ’सिद्धी’ असे म्हणतात. या सिद्धी अनेक आहेत व त्यावरही संशोधन चालू आहे. या योगसाध्य सिद्धींची नावे (अणिमा -सूक्ष्म रूप धारण करणे, महिमा-शरीराचा आकार हवा तेवढा मोठा करणे, लघिमा-शरीर हलके करणे, प्राप्ति-हवी ती वस्तू प्राप्त करणे, प्राकाम्य-हवे ते घडवून आणणे, ईशित्व-भौतिक पदार्थावर सत्ता, वशित्व-पंचमहाभूते वश करणे इत्यादी) अद्भुत सामर्थ्यांची आहेत व असले ’चमत्कार’ केवळ कल्पनेचे खेळ आहेत, असे वाटले, तरी यातील काही चमत्कार पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी तर्कबुद्धिनिष्ठ व वस्तुनिष्ठ कसोट्यांवर अद्ययावत यंत्रोपकरणांच्या साहाय्याने तपासून व ते प्रत्यक्ष घडतात, याची खात्री करून घेतली आहे.

आपणही पाश्चात्यांप्रमाणे योगविद्येचे काही योग्यांनी केलेले प्रयोग आज उपलब्ध असलेल्या शास्त्रीय ज्ञानाशी विसंगत आहेत, त्याअर्थी त्यांत जादू, हातचलाखी, संमोहन वगैरे खोट्या क्रिया असल्या पाहिजेत,’ असे ठरवले. १९६०च्या सुमारास ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मधील डॉ.आनंद, डॉ. छिना या शास्त्रज्ञांनी भारतात ‘इलेक्ट्रोड’ जोडून एका योग्यावर संशोधन चालू केले होते, ते सरकारी बाबूंनी बंद पाडले. पण, तरीही काही पाश्चात्यांना हृदयाचे स्पंदन, नाडीचे ठोके, कमी करून किंवा बंद करून, काही तास तर काही योगी काही दिवस जीवंत राहू शकतात, जखमेतील रक्तस्राव थांबवणे, वेदनांवर प्रभुत्व, शरीरांतर्गत ग्रंथी व आतड्यांच्या हालचालीवर प्रभुत्व हे प्रयोग व त्याही पुढे जाऊन काही योगी अतींद्रिय शक्तीही (इच्छेनुसार निर्जीव वस्तू हलवणे, अतींद्रिय दृष्टी, टेलिपॅथी अशा प्रकारची सामर्थ्ये दाखवतात ती (अतींद्रियमानसशास्त्र) हे चमत्कार शास्त्रीय कुतूहलाने प्रत्यक्ष पाहून ते संपूर्ण खोटे आहेत, असे नक्की म्हणणे कठीण वाटू लागल्याने, यात सर्व प्रकारच्या शास्त्रीय खबरदार्‍या घेऊन आधुनिक तांत्रिक शास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने तपास केल्यानंतर या सर्व कृती अस्सल आहेत, असे त्यांना आढळून आले. मग तशा क्रिया सुसज्ज प्रयोगशाळेत करवून, त्यांच्या मागे प्रत्यक्ष शरीरांतर्गत क्रिया काय आहेत, त्यांचा उगम काय व त्या कशा करता येतात, यांचा तर्कप्रज्ञेच्या मार्गाने तपास करण्यास सुरुवात केली.

योगविद्येने पाश्चात्यपुरस्कृत रूढ शरीरक्रियाशास्त्र व तांत्रिकाशास्त्र (फिजिओलॉजी व न्यूरॉलॉजी) यांत मोठी क्रांती घडवून आणली आहे. १९५८ मध्ये जो कामिया या जैवमानसशास्त्रज्ञाने (बायोसायकोलॉजिस्ट ने) शिकागो युनिव्हर्सिटीत आधुनिक यंत्रोपकरणाने केलेल्या प्रयोगात निद्रावस्थेत असलेल्या व्यक्तीच्या मेंदू-तरंग (ब्रेन वेज)च्या संरचनात (पॅटर्न्स) ’आल्फा’ तरंगांच्या संरचना आढळून आल्या. या प्रकारच्या मेंदू-तरंगांच्या संरचना प्रामुख्याने योगी, स्वामी व ध्यानी (जपानी योगी) हे ध्यानस्थ असता त्यांच्या मेंदू-तरंगांच्या संरचनांत आढळतात, हे त्यांच्या ध्यानात आले. नंतर या विषयात ‘ईईजी’ (इलेक्ट्रोएंसेफालोग्राफ) हे यंत्र वापरून ल्यान्गले पोर्टर न्यूरोसिकायाट्रिक इन्स्टिट्यूटमध्ये मेंदू-तरंगांवर संशोधन अधिकाधिक प्रमाणात सुरु झाले.
 
मेंदूचे हे अतिसूक्ष्म ’अल्फा’ विद्युत तरंग चेतनेच्या कक्षेत नसलेल्या शरीरांतर्गत इच्छेविना चालणार्‍या क्रियांची माहिती जाणून घेऊन तिच्यासंबंधी आपल्या इच्छेचे संदेश तत्क्षणी शरीरातील यंत्रणेकडे पाठवतात (फीडबॅक. याला ‘जैवप्रतिसंभरण’ (बायोफीडबॅक) असे म्हणतात. शरीराच्या कुठल्याही भागातून आतील ऊर्जा (एनर्जी) क्रियांमुळे ‘अल्फा’, ‘बीटा’, ‘थिटा’, ‘डेल्टा’ असे विद्युत तरंग उत्पन्न होत असतात. ‘ईईजी’, ‘ईएमजी’ या यंत्रांद्वारे त्यांची नोंद घेता येते. या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक योग्यांवर व सामान्य लोकांवर अनेक प्रयोग केले जात आहेत.
 
या विद्युततरंगांचे शांती, दिव्यानंद वगैरे मानसिक भावनांशी, शरीरातील ताण-तणावाशी, संबंध असतो, हे ‘ईईजी’ व ‘ईएमजी’ यंत्रांद्वारे केलेल्या चाचण्यात दिसून आले. त्यामुळे ग्रीन या शास्त्रज्ञांनी अर्धशिशी, निद्रानाश, पक्षाघात झालेल्या रुग्णांना ‘बायोफीडबॅक’ (बीएफटी) तंत्राचे प्रशिक्षण देऊन बरे केले. हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील शापिरो, श्वार्ट्झ व टर्स्की या डॉक्टरांनी ‘बायोफीडबॅक’ प्रशिक्षणाचा परिणाम यावर बरेच संशोधन केले व त्याचे निष्कर्ष फलदायी ठरले. या क्षेत्रात विशेष नाव घेण्याजोगे संशोधन करण्याचे श्रेय इंग्लडमध्ये संशोधन करणार्‍या डॉ. चंदा पटेल यांना देण्यात येते. त्यांचे संशोधन या क्षेत्रातील आतापर्यंतच्या संशोधनामध्ये प्रमाणचिन्ह (हॉलमार्क) असे मानले जाते. त्यांनी पाश्चात्य तंत्रज्ञान व भारतीय आध्यात्मिक विचार यांचा संयोग करून सर्व शास्त्रीय खबरदार्‍या घेऊन निरनिराळ्या प्रकारांनी या विषयावर संशोधन केले. त्याचा रक्तदाब उतवरण्याबद्दलचा निष्कर्ष ’विनाप्रयत्न शिथिलता’ (पॅसिव्ह रिलॅक्सेशन) व ध्यान यांचा वाटा ‘बायोफीडबॅक’पेक्षा जास्त आहे, हा आहे.
 
 
स्वामी कुवलयानन्दांनी लोणावळ्यात स्थापन केलेल्या ‘कैवल्यधाम’ या योगविद्येच्या संशोधनाला वाहून घेतलेल्या संस्थेत आधुनिक शास्त्रीय निकषांनुसार व यंत्रोपकरणांच्या साहाय्याने चांगले संशोधन केले आहे. या संस्थेतील डॉ. कोचर यांनी ‘योग व स्मरणशक्ती आणि मानसिक थकवा’ यावर केलेले संशोधन उल्लेखनीय आहे.बाल्टिमोर सिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. बरनॉर्ड एन्गेल यांनी बायोफीडबॅक प्रशिक्षणाचा (बायोफीडबॅक ट्रेनिंग-बीएफटी) उपयोग करून धोकादायक हृदयविकारातून मुक्तता मिळवण्यात यश मिळवले आहे.

 
डॉ. एल्मर ग्रीन व त्यांचे सहसंशोधक यांनी स्वामी राम नावाच्या योगी महाराजांच्या सहकार्याने त्यांच्यावर १९७० पासून योगाच्या निरनिराळ्या अवस्थांचे व कृतींचे संशोधन केले आहे. १९२५ साली जन्मलेले स्वामी राम- यांनी संन्यासदीक्षा घेऊन १२०हून अधिक ज्ञानिमुनींकडून ज्ञानार्जन केले. १९३४ ते १९४४ पर्यंत उपनिषदे व बौद्ध तत्त्वज्ञान शिकवले. तिबेटी गूढ विद्येचा अभ्यास तसेच ध्यान व योग यांची एकांतात साधना केली. वयाच्या २४व्या वर्षी त्यांची करवीरपीठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्ती झाली. पण, १९५२ साली त्या पदाचा त्याग करून ते हिमालयातील आपल्या महान गुरुकडे अधिक ज्ञानप्राप्तीसाठी निघून गेले. तेथे त्यांना योगविद्येचा योग्य प्रचार होण्याकरिता परदेशी प्रवास करावा व आधुनिक शास्त्रांच्या (सायन्सच्या) संकेतांप्रमाणे योगशास्त्र प्रायोगिक विज्ञानाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करणार्‍या शास्त्रज्ञांस साहाय्य करावे, अशी अंतःप्रेरणा झाली. त्यांनी युरोपमध्ये तीन वर्षे पाश्चात्य मानसशास्त्र, तत्त्वज्ञान व वैद्यकशास्त्र यांचा अभ्यास केला. ग्रीन व त्यांचे सहकारी यांनी स्वामी राम यांच्यावर मार्च १९७० पासून अनेक प्रयोग केले. स्वामींनी दोन बोटांच्या तापमानात ११ डिग्रीचा फरक, हृदयाचे ठोके वाढवले व ५० सेकंदात ७४ पासून ५२ पर्यंत खाली आणले. पद्मासनात बसून हृदयाचे ठोके मिनिटाला ३०६ पर्यंत वाढवले. नंतर सप्टेंबर १९७० मध्ये स्वामीजींनी शरीराच्या रक्तप्रवाहावर आपले नियंत्रण दाखवले.
 
एका सेकंदात आपल्या पार्श्वभागावर मोठा गोळा उत्पन्न केला व तीन-चार सेकंदात नाहीसा केला. नंतर त्यांनी डॉक्टर व मानसशास्त्रज्ञासमोर विणकामाची लांब सुई मनाच्या शक्तीने फिरवून दाखवली. त्यावेळी त्यांच्या तोंडावर, फक्त डोळे सोडून मुखवटा, त्यावर फ्लेक्झिग्लास व त्यावर आणखी एक धातूचा पत्रा बसवला होता. स्वामीजींनी पॅट नॉरीस याला सात प्रश्न विचारायला सांगून त्यातल्या पाच प्रश्नांची आधीच लिहून ठेवलेली यादी दाखवली.यानंतर ग्रीन पतीपत्नी भारतात येऊन काही योग्यांना भेटून योगाच्या क्रियाविषयी माहिती गोळा केली अजूनही चाललेल्या या प्रयोगांत अनेक जैवमानसशास्त्रज्ञ व मनोरोगचिकित्सक भाग घेत असून ताणतणाव, दमा, आतड्यांचा दाह, भयगंड अशा अनेक व्याधींवर ‘बीएफटी’ तंत्राने उपचार केले जात आहेत.
 
अमेरिकेत कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत व नेदरलँड्समध्ये महर्षी युरोपियन रिसर्च युनिव्हर्सिटीत ‘ट्रान्सडेंटल मेडिटेशन’(अतीत ध्यान) यावरील संशोधनात पाच-सहा तासांच्या झोपेने मिळणारी विश्रांती ध्यानाच्या योगाने काहीं मिनिटातच मिळू शकते. त्यामुळे योग्यांना फार झोपेची गरज लागत नाही. त्याचप्रमाणे मनःस्वास्थ्य वाढते व ताणतणाव कमी होतो, हे सिद्ध झाले आहे. पतंजलीचा ध्यानयोग हेच करतो. योग व ध्यान या विषयांवरील शास्त्रीय संशोधनाचे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत व अजूनही होत आहेत.योगविद्या, ध्यानविद्या, आयुर्वेद व इतर अनेक भारतीय शास्त्रांचा आधुनिक तंत्रज्ञानाशी समन्वय साधून होणार्‍या प्रगतीचा उपयोग बाह्य विध्वसंक संहारक कार्यासाठी न करता मानवाच्या अंतर्मनाचा शोध घेऊन विश्वाच्या एकतेची जाणीव निर्माण करून, चराचर विश्वाच्या कल्याणासाठी करणे, ही काळाची गरज आहे.



-ज्ञानचंद्र वाघ


अग्रलेख
जरुर वाचा
मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

(Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश ..

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोचे डबे वाढविण्याची प्रवाशांची मागणी अतिरिक्त कोच खरेदीसाठी मेट्रो वनचा प्रस्ताव मुंबई मेट्रो मार्ग १ वर तांत्रिक बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार,दि.७ रोजी प्रवाशांची विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने बघता बघता घाटकोपर स्थानकासह इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने गर्दी वाढली आहे. टार्गेट स्पीड गाठू न शकल्याने एक ट्रेन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121