शिवसृष्टीचा ध्यास घेतलेले शिवतपस्वी बाबासाहेब !!

राष्ट्रीय महत्व ओळखायला लावणारा प्रकल्प

    18-Feb-2023   
Total Views |
Shiv Srishti



पद्मविभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य मोरेश्वर बळवंत पुरंदरे यांच्या संकल्पनेतून किंबहुना त्यांच्या उत्तुंग भव्य अशा स्वप्नांची पूर्तता करणारा हा शिवसृष्टी प्रकल्प म्हणजे भावी पिढयासाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. त्याबाबत घेतलेला हा आढावा....

पद्मविभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य मोरेश्वर बळवंत पुरंदरे यांनी शिवचरित्राचा ध्यास उराशी बाळगून, ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत भटकून, गावागावांत भेटी देऊन शिवचरित्र प्रत्येक माजघरापर्यंत पोहोचावं यासाठी तहहयात याच शिवकार्यासाठी त्यांनी घालवले. कलेची उत्तम जाण असणारे, लेखणी आणि वाणीच्या बाबतीत साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले बाबासाहेब. लहानांत लहान आणि थोरात थोर होऊन कधी खट्याळपणे, तर कधी हिमालयासारखे धीरगंभीर भासणारे बाबासाहेब. कथाकार -व्याख्याते, इतिहास संशोधक, नाटककार, कवी अशी असंख्य रुपं सोबत असूनही कोणताही मोठेपणा न घेता प्रत्येक बाबतीत 'इदं न मम्' म्हणणारे ऋषतुल्य बाबासाहेब होते.


आज बाबासाहेबांना जाऊन वर्ष होतंय, पण तरीही ते कायम आपल्याशी संवाद साधतच असतील.. आयुष्यभर त्यांनी उराशी बाळगलेलं त्यांचं स्वप्नं काही अंशी तरी आता पूर्ण होतंय. आंबेगावची 'शिवसृष्टी' आता शिवप्रेमींच्या स्वागतासाठी तयार होत आहे. 'नूतन सृष्टीच' निर्माण करणारे तिथले असंख्य हात बाबासाहेबांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी झटतायत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन येत्या रविवारी होत आहे.खरं सांगायचं तर बाबासाहेबांच्या वाढणाऱ्या वयाबरोबर त्यांचा काम करण्याचा उत्साहही वाढणाराच होता. शतकाच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा त्यांचा उत्साह तरुणाईला लाजवेल असाच होता. त्याचे कारणही तसेच होते शिवसृष्टी चे स्वप्न बघितलेल्या बाबासाहेबांनी ते पूर्णत्वास नेण्यासाठी जगभ्रमंती केली आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत या न्यायाने सर्वोत्तम असे सारे शिवसृष्टीत आपल्याला बघता यावे यासाठी त्यांचा सततचा ध्यास मंत्रमुग्ध करणारा होता. आज पुणे-बंगलोर महामार्गावरील ही शिवसृष्टीदेखील पुण्याचं आणि महाराष्ट्राचं वैभव ठरणार आहे. पुण्याजवळ आंबेगाव येथे त्यांना भव्य स्वरूपात शिवसृष्टी उभी करायची होती आणि त्याचे १/४ कामही झाले आहे. आज त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होत आहे.


Shiv Srishti
 




शिवसृष्टीबद्दल बाबासाहेब म्हणतात,''माझी भविष्यात काही स्वप्नं आहेत. ती भव्य-दिव्य आणि अफाट आहेत असं म्हणावं लागेल. भव्य तटबंदी असलेला आणि सर्व ऐतिहासिक वैशिष्ट्यं असलेला एक भला-थोरला किल्लाच उभारायचा आणि त्यामध्ये शिवकालीन एका नगराचीच उभारणी करायची असा हा प्रकल्प आहे. तटबंदी, बुरुज, अश्वारोहण केंद्र, व्यायाम शाळा, सिंधुदुर्ग देखावा,खिंड-घाट, लोककला केंद्र, नगारखाना, पालखी दरवाजा, महादरवाजा, बाजारपेठ, पुष्करणी तलाव, वस्तुसंग्रहालय, शस्त्रसंग्रहालय, ध्वनी-प्रकाश योजना, ग्रंथालय,अभ्यासकांसाठी वसतिगृह अशा स्वरूपातील या शिवसृष्टीमध्ये येणाऱ्या शिवभक्तांना अगदी शिवकाळच अनुभवता यावा हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. इथं दसरा होईल तो शिवकालीन. त्या वेळची जीवनपद्धती इथं सजीव स्वरूपात पाहता यावी, अनुभवता यावी, आपला वैभवशाली इतिहास अन् वारसा नव्या पिढीनं न्याहाळावा आणि त्यांच्या तो जगण्यात उतरावा ही या साऱ्या योजनेमागची तळमळ आहे. सुमारे ९० कोटी रुपयांची ही योजना होती. महागाईने खर्चाच्या अंदाजपत्रकात नेहमीच वाढ होत असते. पण वृक्षारोपण, अश्वारोहण केंद्र इथं सुरू झालं असून पहिल्या टप्प्यातील किल्लेदाराच्या वाड्याचं कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.



वॅक्स आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण शिवचरित्र लोकांपुढे मांडायचं आहे. अमेरिकेतल्या 'डिस्नेलँड' सारखी ही शिवसृष्टी असावी, महाराजांच्या बारश्यापासून त्यांच्या निधनापर्यंतचे सारे प्रसंग, घटना आणि विचार त्यातून सर्वांना पाहता यावेत अशी त्यांची इच्छा आहे. शिवकालीन मुलांची खेळणी कशी होती? त्या वेळचे पोषाख कसे होते ? आपले पूर्वज जगले कसे, राहिले कसे, त्यांनी पराक्रम कसा गाजवला, त्यांचे स्वभाव कसे होते, त्या वेळच्या दरबाराचं काम कसं चालायचं, युद्ध कशी व्हायची ? हे सारं सारं आपल्या मुलाबाळांनी पाहावं, त्यांनी थेट शिवकाळातच जाऊन काही काळ जगावं अशी ही भव्य शिवसृष्टी उभारायची झाली तर कमीत कमी २०० एकर जमीन आणि हजारो कोटी रुपयांचं धन लागेल. हा एवढा ऐतिहासिक वारसा आणि बाबासाहेबांसारखा स्वप्नयोगी इतिहासकार युरोप,अमेरिकेत असता तर असे प्रकल्प केव्हाच साकारले असते.




Shiv Srishti

आपल्याला याचं राष्ट्रीय महत्त्व ओळखायला, समजायला,जाणवायला आणि मग कृतीत आणायला आणखी काही काळ जावा लागेल असं दिसतं आहे.पण बाबासाहेबांच्या मनातली शिवसृष्टी आणखी भव्य आहे. त्यासाठी आपल्याला १२५ वर्षांचं तरी आयुष्य हवं असं ते कायम म्हणत असत. 'शिवसृष्टी'चे सुंदर सप्तरंगी स्वप्न मी हृदयाशी जपले आहे. हा शिवकालीन क्रांतीचा स्फूर्तिदायक इतिहास जगाने येऊन पाहावा आणि आमच्या तरुणांची मने अभिमानाने पोसली जावीत हीच त्यांची इच्छा आहे.'' खरोखरीच त्यांची स्वप्नं पाहिली की ती पूर्ण करण्यासाठी साक्षात तुळजाभवानीच त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याचा कृपाप्रसाद नक्की नक्कीच देईल असं आपल्यालाही वाटत होतं. पण नियतीपुढे आजवर कुणाचं चाललं आहे. आज या ऐतिहासिक शिवसृष्टीतील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होत असतांना देहरुपाने बाबासाहेब नाहीत पण प्रत्येक दगडादगडावर त्यांचा स्पर्श झाला आहे. हा स्पर्श खरंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशादर्शक राहणार आहे.

आज इतके मोठे शिवसृष्टीचे स्वप्न सत्यात उतरताना अत्यंत साधेपणाने बाबासाहेब आपले जीवन व्यतीत करत होते. स्वत:बद्दल त्यांच्या कोणत्याच भ्रामक कल्पना नव्हत्या. उलट ते म्हणतात, "मी विद्वान नाही, पंडित नाही, साहित्यिक नाही, बुद्धिवंत नाही, इतिहास संशोधकही नाही, इतिहासकारही नाही, भाष्यकार नाही. जो काही आहे, तो वरच्या गावरान महाठी सरस्वती भक्तांच्या केळीच्या पानावरच्या, त्यांच्या जेवणातून उरलेल्या चार शिताभातांवर गुजराण करणारा येसकर आहे." लौकिक आयुष्यातील अफाट लोकप्रियतेनंतरही बाबासाहेब स्वत:ला सरस्वतीच्या पायीचा नम्र सेवक आणि येसकर समजतात, हे समजल्यावर त्यांच्या मनाच्या आणि मानाच्या मोठेपणाची कल्पना येते. ही नूतन सृष्टीच आज त्यांच्या या एकमेवाद्वितीय असणाऱ्या शिवतपस्वी असण्याची खूण आपल्याला आनंद देणारी ठरणार आहे. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन आहेच पण हे ऐतिहासिक विश्व आपल्यासमोर दिवस रात्र एक करत जे जे हात या ऐतिहासिक कार्याला लागले त्या सगळ्यांना साष्टांग प्रणाम आहे. कारण इतकी मोठी वास्तू एका रात्रीत निर्माण होतंच नाही. सगळ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करत लेखणीला विराम देतो.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक, सुरुवातीला 'नागपूर तरुण भारत' येथे दोन वर्ष स्तंभ लेखन. दै. 'सोलापूर तरुण भारत'मध्ये 'गाभारा' ही मंदिरावर आधारित लेखमाला प्रकाशित. महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी या वृत्तपत्रांसाठी विविध विषयांवर लेखन. इंदूरहून निघणाऱ्या 'मराठी गौरव' या पाक्षिकासाठी लेखन. 'प्रज्ञालोक' या त्रैमासिकात लेखन तसेच 'प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय'. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या 'कालजयी सावरकर' या नावाने प्रकाशित सावरकर विशेषांकात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' या विषयावर लेखन. अनेक दिवाळी अंकांसाठीही लेखन. 'साप्ताहिक विवेक'मध्ये गेली दोन वर्षे झाले 'पद्मगौरव' स्तंभ सुरू. आकाशवाणी व इतरही माध्यमातून सतत लेखन.