युट्यूब मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय मुळाचे नील मोहन!
17-Feb-2023
Total Views | 103
3
नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय मुळाचे अमेरिकी नागरिक नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली. कंपनीच्या माजी सीईओ सुसान वोजिकी यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक नील मोहन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नील मोहन हे यूट्यूबचे पहिले कर्मचारी आहेत, ज्यांना बढतीनंतर कंपनीच्या सीईओपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
युट्यूबचे नवीन सीईओ आणि उपाध्यक्ष असलेले नील मोहन हे २००८ साली युट्यूबमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर २०१५ साली कंपनीने त्यांना मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून जबाबदारी दिली होती. त्यांचे कार्य पाहता ते सुरुवातीपासूनच माजी सीईओ वोज्किकी यांचे उत्तराधिकारी मानले जात होते. नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ग्लोरिफाईड टेक्निकल सपोर्ट या कंपनीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी एक्सेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी डबलक्लीक या कंपनीमध्ये सुमारे अडीच वर्षे बिझनेस ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २००८ साली गुगलने डबलक्लीक विक घेतल्यानंतर नील हे गुगलमध्ये सामील झाले होते.