संत वाङ्मयाचे आगळे पैलू मांडणारी पुस्तके

    16-Dec-2023   
Total Views |
Interview With Subhash Deshpande

महाराष्ट्राला लाभलेली समृद्ध साहित्य परंपरा साहित्य आणि संगीताची देण यांचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो. यात मोलाचं योगदान दिले-ते भक्तिपरंपरेने. संपूर्ण हिंदुस्थानात अनेक संत होऊन गेले, महाराष्ट्रात त्यांचे प्रमाण तुलनेने अधिक होते. यातील काही निवडक संतांच्या जीवनातील ठरावीक पैलूंवर भाष्य करणारी, पुस्तकांची मालिका लेखक सुभाष देशपांडे यांनी लिहिली आहे. त्यांच्या या सहा पुस्तकांविषयी त्यांच्याशी केलेली ही पुस्तकचर्चा...

आपण ज्ञानेश्वरांपासून सुरुवात करूया. त्यांच्या ज्ञानेश्वरीतील व्यक्तिरेखा तुम्ही उलगडून सांगितल्या आहेत. महाभारत हे तसे एक उपनिषदच. त्यातील व्यासांनी मांडलेल्या व्यक्तिरेखांना अनेकांनी आपापल्या दृष्टिकोनातून आजवर उलगडून सांगितलंय. दुर्गाबाईंचं ’व्यासपर्व’, भैरप्पांनी लिहिलेले ’पर्व’, अरुणाताईंनी तर या व्यक्तिरेखांविषयी स्वतंत्र पुस्तकेच लिहिली. या महाभारताचा गाभा म्हणजे ‘गीता.’ या गीतेची मराठीत प्रथम मीमांसा करणारा ग्रंथ ’ज्ञानेश्वरी.’ यातील व्यक्तिरेखा मांडण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?"

या पुस्तकाची प्रस्तावना डॉ. गो. बं. देगलुरकरांनी दिली आहे. ज्ञानेश्वरांच्या जीवनाचे कार्यच मुळात मानवतेला कवेत घेणारे आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, ’हे विश्वची माझे घर.’ तेव्हाच स्पष्ट होते, ते केवळ मराठी माणसासाठी लिहीत नाहीत. नामदेव म्हणतात की, ’‘ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी. कारण, तिचं लेखन केवळ बौद्धिक प्रतिभेने झालेले नाही, तर तिला आत्मप्रचितीची जोड आहे.“ संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर या दोघांची नावे वैश्विक साहित्यिकांच्या यादीत अग्रक्रमाने गणली जातील, एवढी त्यांची ख्याती आहे. म्हणूनच त्यांच्या दृष्टिकोनातून महाभारत काय हे जाणून घ्यायचा आणि सामान्यांसमोर मांडायचा हा प्रयत्न.

’चिरंतनाचा ज्ञानदीप संत नामदेव’ हे तुमचे दुसरे पुस्तक. नामदेव तसे स्वभावतःच हूड. मुक्ताईने त्यांनी त्यांच्या गुरू शोधनासाठी बाहेर पडावे, यासाठी त्यांना डिवचले, याबाबत काठी आणि मडक्याची कथा आपल्याला प्रचलित आहेच. पण, याच नामदेवांनी पुढील काळात महाराष्ट्र आणि पंजाब जोडला. मला पुस्तक वाचताना लक्षात आलं की, त्यांचे केवळ विचार मांडण्यापेक्षा नामदेवांचे भावविश्व तुम्ही सुट्टे करून, या पुस्तकातून सांगितले आहे. त्यांच्या जडणघडणीबाबत हे पुस्तक भाष्य करतं, तेव्हा मला जाणून घ्यायला आवडेल, तुमच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विठ्ठल भक्तीचं मर्म काय असावं?

महाराष्ट्राच्या संत चळवळीत ज्ञानेश्वरांचे नेतृत्व सर्वांनी मान्य केल्याचे दिसते. त्यांच्या शिकवणीखाली तयार झालेली ही मंडळी. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, आपल्याकडे मोक्षापर्यंत पोहोचवण्याच्या चार मुख्य मार्गांनंतर पाचवा येतो-तो भक्तिमार्ग. त्या भक्तिमार्गाचा उल्लेख तुम्हीसुद्धा केलाच. हे अद्वैत तत्त्वज्ञान माणसामाणसातले भेद, वाद, उत्पन्नच होऊ देत नाही. इथे मी पणा वेगळा काढावा लागत नाही. तो मी पणा आपलेपणात विरघळून जातो. मला वाटते विठ्ठल भक्तीचे मर्म हेच आहे. संतसाहित्य हा सागर आहे. त्याचा तळ आपण गाठू शकत नाही. माझ्या बौद्धिक क्षमतेला मानवेल एवढा उलगडा मी यातून केला आहे.

पुढे मी कबीरांकडे येईन. आपल्याला कबीराचे दोहे माहितीयेत, त्याने विणलेला शेला माहितीये, त्याचा रामाशी झालेला संवाद माहितीये; पण कबीर मात्र तेवढासा महाराष्ट्राला माहिती नाही. कसं होतं, ज्ञानोबा, तुकोबा, रामदास यांनी मराठी माणसाला भरभरून दिलंय, तेव्हा हे महाराष्ट्राबाहेरचे संत कुठेतरी महाराष्ट्रात विरघळून जायला कमी पडतायत. अशावेळी कबीरांना तुम्ही मराठीत घेऊन आलात. त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे अभिनंदन! त्यांच्या ‘साखी’चा अमूल्य ठेवा अर्थासहित तुम्ही मराठी वाचकांना उपलब्ध करून दिलात, तेव्हा कबीरांबद्दल तुमच्या भावना काय आहेत, हे मला जाणून घ्यायला आवडेल

आपला समकालीन संत समुदाय कबीराला वारकरीच समजतो. आपल्या संतांवर कबिराचा प्रभाव आहेच. ‘साखी’ म्हणजे साक्षात्कारी अनुभव. कबीरांनी बरेच साहित्यप्रकार लिहिले. दोहे हे त्यापैकी एक प्रचलित. परंतु, प्रबोधन-शिकवण करणार्‍यांपेक्षा त्यांचे साक्षात्कारी अनुभव मला मांडावेसे वाटतात. त्यांच्या अनुभवांचे चिंतन करणार्‍या या ‘साखी’ आहेत, त्यांचा अर्थ आणि शब्दार्थ मला यातून सांगावेसे वाटले.

या ‘साखी’वरून मला आठवते, ती ‘सखी’ किंवा ‘सखा’ही. या शब्दाची व्युत्पत्तीही ‘सख्य’ याच शब्दापासून झाली आहे. आपले संत देवतांना नेहमी सख्यांच्या पातळीवरच पाहतात. कृष्णसखा, रामसखा. एका पातळीवर येणे. साधारण जीवनातही आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना अगदी गृहीत धरतो. रक्ताच्या नातेसंबंधांसारखे महत्त्व आपण क्वचितच देतो. पण, या नात्याचा केवढा आध्यात्मिक अर्थ आहे! पुढे चोखोबांकडे येते. या पुस्तकाचं शीर्षकच मला आकर्षक वाटतं. केवळ शीर्षक नाही, तर त्यातल्या सर्व लेखांची शीर्षकेही वाचण्यासारखी आहेत. चोखोबांनी समाजप्रबोधन किंवा मतपरिवर्तन करण्यापेक्षा मनपरिवर्तन किंवा हृदयपरिवर्तन केलं, असं म्हणू. या अनुषंगाने पुन्हा पुस्तकाच्या शीर्षकाकडे येते - ’चोखा चोखट निर्मळ’ यातून तुम्हाला नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे?

विशेष म्हणजे, या शीर्षकातील तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. ‘चोखामेळा’ या नावाचा अर्थच ‘चोख’ या शब्दावरून आला आहे. ‘चोखट’ म्हणजेही ‘चोख.’ चांगला किंवा निर्मळ. ‘चोखट’ हा शब्द आपण वारंवार शहरी भागात ऐकत नसलो, तरीही खेड्यांमध्ये दैनंदिन जीवनात याचा सर्रास वापर होतो. माणूस काय चोखट आहे, म्हणजे निर्मळ मनाचा आहे. मोठ्या विपत्तीतून चोखोबा आलेत. एकप्रकारे ते बहिष्कृतच! तरीही ते भक्तिमार्गावरून ढळले नाहीत, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विलक्षण पैलू आहे. त्यांचा मृत्यू कूस पडून झाला. त्यात अनेक माणसे गेली. तेव्हा त्यांच्या अस्थी कशा ओळखायच्या? नामदेव म्हणाले की, ”प्रत्येक हाड वाजवून बघा, ज्यातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येईल, त्या अस्थी घेऊन या.” एवढी त्यांची भक्ती!

मी आता पुन्हा महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेपासून कर्नाटकात येते. ’महात्मा बसवेश्वर ः त्यांचे कार्य आणि कर्तृत्व’ हे पुस्तक हातात पडलं आणि लक्षात आले, यांचे केवळ नावच ज्ञात आहे. बसवेश्वरांचे विचार आधुनिक आहेत. त्यामुळे ते कालसापेक्ष वाटतात. नवमतांचा पुरस्कार करून, काळ समजून घेऊन वागणारे होते. बसवण्णा कर्नाटकातले. तेव्हा त्यांना जाणून घ्यावे, असे तुम्हाला केव्हा वाटले?

मी मूळचा लातूर येथील उदगीरचा. कर्नाटकाच्या सीमेजवळच आमचे गाव. तिथे बसवण्णांचे अनुयायी खूप. कर्नाटक त्यांना ‘बसवेश्वर’ नाही म्हणत, ‘बसवण्णा’च म्हणतात. अण्णा म्हणजे मोठा भाऊ किंवा वडीलधारी व्यक्ती. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कर्नाटक सरकारने एक पुस्तिका काढली होती. ती वाचून मला त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावेसे वाटले. मी शोधायला सुरुवात केल्यावर माझ्या लक्षात आले, बसवण्णांसारख्या इसमावर मराठीत फारच त्रोटक लेखन झालंय. मुबलक साहित्य उपलब्ध नाहीच. तेव्हा मला विशेष खेद वाटला. तू म्हणालीस ते बरोबरच आहे. माझ्याच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर मोजक्या 100 प्रती विक्रीला ठेवल्या होत्या. त्याच दिवशी त्या सर्व संपल्या. मराठी माणसांना उत्तम मजकूर हवा आहे, त्याची भूक मला तेव्हा लक्षात आली.

या पाच पुस्तकांव्यतिरिक्त आज तुमच्याकडे एक नवं पुस्तक दिसतंय. संत रामदासांचे. तेव्हा या पुस्तकात तुम्ही त्यांचे काय वेगळेपण सांगितले आहे?

ते समर्थच आहेत! अगदी चपखल उपाधी त्यांना मिळाली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, यात मी त्यांच्या जीवनाविषयी न लिहिता, त्यांच्या ’दासबोधा’बाबत लिहिले आहे. ’दास डोंगरी राहतो’ वगैरे गोनीदांची त्यांच्या जीवनप्रवासाविषयी लिहिलेली पुस्तके आहेत. त्यांनी म्हटलेच आहे, ‘शहाणे करून सोडावे अवघें जन!’ त्यांचे हे लोकांसाठी वाहिलेले आयुष्य आणि त्यांचे कर्तृत्व ’दासबोधा’तून आपल्याला लख्ख जाणवते. म्हणून हे पुस्तक.

खरेच! संतसाहित्य हा महाराष्ट्राचा आणि पर्यायाने भारतीय संस्कृतीचा मोठा आधारस्तंभ. आपल्याकडे वाद सतत होत असतात. सांस्कृतिक विविधता मोठ्या प्रमाणावर असल्याने, ते साहजिकच आहे. संघर्ष होतात, सामाजिक अभिसरण होतात; पण या सर्वांना एका छताखाली सामावून घेऊन, भक्तीचा मार्ग दाखवणारी ही संत मंडळी आणि त्यांनी देऊन ठेवलेला हा संत साहित्याचा अमूल्य ठेवा कालातीत आहे. या सर्व संतांचे, त्यांच्या जीवनकार्याचा आणि कर्तृत्वाचे वेगळे पैलू उलगडून दाखवल्याबद्दल, मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद म्हणते आणि तुमच्या पुढील संतांविषयी लिहिण्याच्या कारकिर्दीला शुभेच्छा देते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.