सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी केली तीन जणांना अटक
10-Dec-2023
Total Views | 46
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थान पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत दोन मुख्य आरोपींसह तीन जणांना चंदीगड येथून ताब्यात घेतले असल्याचे दिल्ली पोलिसांनी रविवारी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य आरोपी रोहित राठोड आणि नितीन फौजी यांचाही समावेश आहे. तिन्ही आरोपींना दिल्लीत आणले जात असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. याआधी शनिवारी, ९ डिसेंबर रोजी जयपूर पोलिसांनी गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी हरियाणातील महेंद्रगड येथील रहिवासी रामवीर सिंग याला अटक केली होती.
नितीन फौजी आणि रोहित राठोड या दोन आरोपींनी ५ डिसेंबर रोजी सुखदेव सिंग गोगामेडी यांची श्याम नगर येथील निवासस्थानी अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली होती आणि नितीन फौजीसाठी जयपूरमध्ये आरोपी रामवीर सिंग याने व्यवस्था केली होती, असे जयपूर पोलीस आयुक्तांनी सांगितले.
हल्लेखोरांपैकी एक नवीन शेखावत हा गोगामेडी यांच्या निवासस्थानी पोलिसांशी झालेल्या गोळीबारात ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोगामेडींचा एक सुरक्षा रक्षकही गोळीबारात जखमी झाला होता.