हवाईदलाची ताकद वाढणार, ९७ ‘तेजस’ लढाऊ विमाने आणि १५६ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदीस मंजुरी
२.२३ लाख कोटी रुपयांना मंजुरी
01-Dec-2023
Total Views | 56
नवी दिल्ली : सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून केंद्र सरकारने २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदी प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामध्ये 97 तेजस हलकी लढाऊ विमाने आणि 156 प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की 2.23 लाख कोटी रुपयांच्या एकूण खरेदीपैकी 98 टक्के खरेदी देशांतर्गत उद्योगांकडून केली जाईल. मंत्रालयाच्या या पाऊलामुळे देशांतर्गत संरक्षण उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. 97 तेजस लढाऊ विमाने आणि 156 प्रचंड अटॅक हेलिकॉप्टरची एकूण किंमत 1.10 लाख कोटी रुपये आहे. भारताच्या इतिहासात स्वदेशी उत्पादकांना मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे.
भारतीय नौदलाच्या पृष्ठभागावरील प्लॅटफॉर्मसाठी मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनाही मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय फील्ड गन बदलण्यासाठी टोव्ड गन सिस्टीम खरेदीलाही मान्यता देण्यात आली आहे. डीएसीने 'एरिया डेनियल म्युनिशन्स' (एडीएम) टाइप-2 आणि टाईप-3 या दोन प्रकारच्या अँटी-टँक युद्धसामग्रीच्या खरेदीसाठी आवश्यकतेची स्वीकृती दिली आहे. त्याचप्रमाणे भारतीय नौदलासाठी मध्यम श्रेणीचे जहाजविरोधी क्षेपणास्त्रखरेदी करण्याचा आणखी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय, टी९० रणगाड्यासाठी ऑटोमॅटिक टार्गेट ट्रॅकर आणि ‘डिजिटल बेसल्टिक कॉम्प्युटर’च्या अधिग्रहण आणि एकत्रीकरणालाही मान्यता देण्यात आली आहे.