मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माणकार्य जवळपास पुर्णत्वास आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत श्रीरामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून नुकतेच 'अक्षता कलश' वितरीत करण्यात आले. देशभरातील ५ लाख गावांमध्ये या पूजित अक्षता कलशांचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी एका कलशाचे आगमन सोमवार, दि. ०६ नोव्हेंबर रोजी मुंबईत झाले.
पुष्पक एक्सप्रेसने दादर स्थानकात आलेल्या या कलशाचे विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत मंत्री व या अभियानाचे प्रमुख मोहन सालेकर आणि हजारो रामभक्तांनी स्वागत केले. त्यानंतर दादर पूर्वच्या हनुमान मंदिरापासून या अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा निघाली. "जय श्रीराम", " सियावर रामचंद्र की जय" च्या प्रचंड जयघोषात ही यात्रा रात्री उशीरा सायन कोळीवाडा येथील हनुमान मंदिरात येऊन पोहोचली. याप्रसंगी कोकण प्रांत बजरंगदल सहसंयोजक रणजीत जाधव, विभाग मंत्री राजेंद्र चौबे, प्रांत समरसता प्रमुख नरेश पाटील, प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे आदींची विशेष उपस्थिती होती. शेवटी सामुदायिक आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सध्या अक्षता कलश हनुमान मंदिरात पूजनासाठी ठेवण्यात आले.
जवळच्या मंदिरात आनंदोत्सव साजरा करा
"प्रत्येक श्रीराम भक्ताच्या घरी जाऊन पूजलेल्या अक्षता, प्रभू श्रीरामांचे छायाचित्र आणि जवळच्या मंदिरातील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची योजना आखण्यात आली आहे. दरम्यान कोकण प्रांतातील २० लाख घरापर्यंत १ ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत संपर्क करण्यात येईल. २२ जानेवारी रोजी सर्व रामभक्तांनी आपल्या राहत्या ठिकाणच्या मंदिरात सकाळी ११ ते १ या कालावधीत भजन, कीर्तन, नामजप करून आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन विहिंपकडून करण्यात आले आहे."