संजय राऊत पूर्णपणे काँग्रेसी विचारधारेने वाटचाल करताहेत; प्रविण दरेकरांची खोचक टीका

    15-Aug-2025
Total Views |

मुंबई : संजय राऊत हे बेधुंद, आंधळे झालेत. त्यांच्या डोळ्यावर झापड लावली असून त्यांचे तोंड आता सुटलेय. त्यामुळे वाटेल ते आरोप, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भाजपा कालही हिंदुत्ववादी भूमिका घेणारा पक्ष होता, आहे आणि उद्याही राहील. हिंदू धर्माचा आम्हाला सार्थ अभिमानच आहे. तुमच्यासारखे काँग्रेसच्या दावणीला विचार आम्ही बांधत नाही. तुम्ही पूर्णपणे काँग्रेसची विचारधारा घेऊन वाटचाल करताय, अशी खोचक टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी राऊतांवर केली.

आज पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केला. राऊत यांच्या आरोपांवर बोलताना दरेकर म्हणाले कि, संजय राऊत हे महात्मा झालेत, त्यांचे विचार महान झालेत. स्वदेशी ही देशासाठी एक चळवळ उभी राहिलेली आहे. परंतु काँग्रेसने ती पुढे नेली नाही. आम्ही स्वाभाविकपणे स्वदेशीचा नारा दिला. कारण स्वदेशीला महत्व आणि ग्लॅमर पंतप्रधान मोदी आणताहेत. इतर देश आपल्याला कशा प्रकारे वेठीस धरताहेत हे आपण पाहतोय. अशा वेळी आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे, स्वदेशीची मागणी वाढली पाहिजे ही भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली असल्याचेही दरेकर म्हणाले. तसेच राऊत यांनी आमच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर लक्ष ठेवावे. ते कधीही शेतकरी, कामगार, विकासाबाबत बोलताना दिसत नसल्याचेही दरेकर म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांच्या पार्टी आंदोलनावर बोलताना दरेकर म्हणाले कि, आव्हाड हे पार्टीवालेच नेते आहेत. पार्टी करण्यासाठी संधी मिळाली तर ते शोधत असतात. मांस विक्री बंदीचे निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही झालेत परंतु विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर, जनतेच्या प्रश्नावर बोलायचे नाही. भावनिक वातावरण तयार करून फेक नरेटिव्ह सेट करता येतो का? असा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याची खोचक टिकाही दरेकरांनी केली.

भुजबळ अत्यंत समंज्यस नेते

दरेकर म्हणाले कि, छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत. ते किरकोळ वाद करत नाहीत. वाद केले तर मोठे करतात. छोट्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद करतील असे वाटत नाही. नाशिक त्यांची कर्मभूमी आहे. प्रत्येक नेत्याला आपल्या जिल्ह्यात नेतृत्व करावे असा आग्रह असतो. तसा आग्रह असणे चुकीचे नाही. परंतु जेव्हा युतीचे सरकार असते तेव्हा अनेक गोष्टींचे संतुलन मुख्यमंत्री आणि नेतृत्वाला करावे लागते. भुजबळ अत्यंत समंज्यस नेते आहेत.

राऊत म्हणजे ‘उतावळा नवरा नी गुडघ्याला बाशिंग‘

संजय राऊत यांच्या मनसे आणि उबाठा पक्षाच्या महापालिक निवडणुका एकत्र लढण्याच्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले कि, ‘उतावळा नवरा नी गुडघ्याला बाशिंग‘ अशी स्थिती राऊत यांची झालीय. त्यांना अधिकृत केलेय का? दोन भावंशी चर्चा झालीय का? पक्ष येण्याचे ठरलेय का? कि संजय राऊत हवेत गोळीबार करताहेत. एकत्रित निवडणुका लढणे हा त्यांचा विषय आहे. अजून घोडेमैदान लांब आहे. परंतु संजय राऊत यांना वारंवार थोपवावे लागतेय, खुंटा बळकट करावा लागतोय. म्हणून एकत्र येण्याचा जयघोष ते करताहेत. २० वर्ष त्यांना राज ठाकरे, मनसे आठवली नाही. आता त्यांना ते आठवायला लागलेत. एवढी हतबलता राऊत आणि उबाठा गटाची कधीच झाली नसल्याचेही दरेकर म्हणाले.