
अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होताच, नेटकर्यांनी समर्थन आणि नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ अगदी खरा असल्याचे सर्वांनाच वाटत असताना तो ‘मॉर्फ’ (फेरफार) करून तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हे कसं काय शक्य आहे? असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. त्याचबरोबर ‘डीप फेक’ नावाच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे सहज शक्य असल्याचे निदर्शनास आले. पण, हे ‘डीप फेक’ आहे तरी काय? याची विचारणाही होऊ लागली. हे तंत्रज्ञान अगदी अलीकडचे म्हणता येणार नाही. मात्र, त्याचा जलदगतीने उपयोग करण्याची शैली आता विकसित झाली आहे. अवघ्या काही मिनिटात एखादा स्पष्ट असलेल्या चेहर्याचा व्हिडिओ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हुबेहूब तयार करता येतो. डोळे, ओठ आणि चेहर्यावरील हावभाव तंतोतंत जुळवून व्हिडिओ तयार करणारे हे तंत्रज्ञान अत्यंत धोकादायकच. याचा फटका आजवर देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटींना बसला आहे. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या फुटबॉलच्या स्टेडियममध्ये ‘माद्रिद’ टीमच्या समर्थकांच्या हातात पॅलेस्टाईनचे ध्वज असणे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आपल्याच सैनिकांना सांगतात आता शस्त्रे खाली ठेवा किंवा पोप हे नेहमीच्या वेशभूषेऐवजी जॅकेटमध्ये दिसणे, हे प्रकार वास्तव वाटतात. मात्र, ते याच तंत्रज्ञानाचा अविष्कार असल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘डीप फेक’ तंत्रज्ञान हे एकाअर्थाने भावी संकटाची चाहूल असून, त्यातील एखाद्या व्हिडिओमुळे जागतिक संकटही निर्माण होऊ शकते. त्याचा धोका अनेक राष्ट्रांच्या लक्षात आल्यामुळे त्यावर उपाययोजनाही करण्यात येत आहेत. रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह व्हिडिओ ‘व्हायरल’ होताच, भारताने खबरदारी म्हणून सोशल मीडियाचे विविध प्लटफॉर्म यांना सक्त ताकीद दिली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ तत्काळ हटविण्यात यावा, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा भारत सरकारने दिला आहे. इंटरनेट वापरणार्या सर्व डिजिटल नागरिकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला असून ‘डीप फेक’चा विळखा वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. तेव्हा नागरिकांनीही आपले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना खबरदारी नक्कीच घ्यावी.
विज्ञान शाप की वरदान, यावर गेली अनेक दशके विविध मतप्रवाह व्यक्त होत आहेत. विज्ञानासोबतच तंत्रज्ञानही आले. या विज्ञान-तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होत असून, त्यातूनच ‘स्मार्ट’ ते ‘नॅनो’ या शब्दांचीही उत्पत्ती झाली. एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने ‘अतिसूक्ष्म हुशारी’ (स्मार्ट आणि नॅनो) धारण केली असताना, पुन्हा चर्चा होऊ लागली हे तंत्रज्ञान शाप की वरदान याची! स्मार्टफोनच्या अतिवापराने मनोरुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे असून, भारतीयांमध्ये स्मार्टफोन वापरणार्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. सहा महिन्यांच्या अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांच्या हातात स्मार्टफोन दिसतात. त्यातून आरोग्याचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्याच आठवड्यात नववीच्या एका विद्यार्थिनीकडून आईने तिचा स्मार्टफोन काढून घेतला. तिने रागाच्या भरात आत्महत्या केली. नवरा-बायकोत वाढत असलेला विसंवाद आणि घटस्फोटाचे एक कारण स्मार्टफोन ठरू लागला आहे. एकीकडे संवादाचे उत्तम साधन असलेला हा स्मार्टफोन मात्र तितक्याच नवनवीन समस्यांना जन्म देत आहे. स्मार्टफोनच्या वापरातून पैशांचे गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेला आलेला ओटीपी तिने शेअर करताच तिच्या बँक खात्यातील तब्बल २४ लाख रुपये लंपास झाले. स्मार्टफोनवरून काढण्यात आलेले व्हिडिओ फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देणे, बदनामी करण्याचा इशारा देणे, त्यातून ब्लॅकमेल करण्याच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगारीचे वाढत असलेले प्रमाण पाहता, सर्वांपुढेच फार मोठे आव्हान उभे राहिले आहे. आजघडीला स्मार्टफोन ही गरजेची वस्तू ठरली आहे. त्याशिवाय आपले दैनंदिन व्यवहारही होत नाहीत. त्याचबरोबर, मनोरंजन, शिक्षण, संवाद यासह माहितीचा खजिना म्हणून हे तंत्रज्ञान जगाने स्वीकारले आहे. मात्र, त्याची दुसरी बाजू तितकीच धोकादायक ठरत असून अनेकांची वाचन आणि लिखानाची सवय बंद झाली आहे. लिखाण आणि वाचन संस्कृती पुढील काही दशकात टिकेल की नाही, अशी शंका. त्यामुळे ‘स्मार्ट तंत्रज्ञान वरदान नव्हे, तर शाप ठरू लागले आहे.
मदन बडगुजर