आता मसाल्यातही भेसळ! २ लाख रूपयांचे भेसळयुक्त मसाले जप्त
10-Nov-2023
Total Views | 72
मुंबई : मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावातुन २ लाख रूपयांचे भेसळयुक्त मसाले जप्त करण्यात आले आहेत. मसाल्यांमध्ये देखील सध्या मोठ्या प्रमाणात भेसळ होताना दिसून येते. ही भेसळ प्रामुख्याने मसाल्यांचे वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी केली जाते. विटांची पूड, सिमेंट, पपईच्या बिया किंवा चुना असे घटक या भेसळीसाठी वापरले जातात. त्यामुळे खोट्या आणि हानिकारक मसाल्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
मालेगावजवळील एका कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून सव्वा लाख रुपयांची मिरची पावडर आणि २४ हजारांची मसाला पाकिटे असे जप्त केले आहे. गुलशन-ए-मदिना नावाच्या बंगल्यात SEA-MA मसाले प्रॉडक्ट प्रा. लि. या कंपनीच्या कारखाना सुरू होता. या कारखान्यात रंगांचा वापर करून तिखट आणि मसाले तयार करण्यात येत होते. कायद्याने मसाले आणि तिखटासाठी रंग वापरण्यास बंदी आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर खाद्य रंग साठवण्यात आल्याचं आढळून आले. तब्बल दोन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त मसाले या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत.
मिर्ची व मसाल्यामध्ये कायद्याप्रमाणे रंग वापरण्यास बंदी असूनही मालेगावात मिरची पावडर व टिका मसाल्यामध्ये सिंथेटीक रंग आढळून आला. या कारवाईत २४ हजार रुपये किमतीचा आठशे पाकिटे टिका फ्राय मसाला, कुठल्याही प्रकारचे लेबल नसलेली १ लाख ६१ हजार ४०० रुपये किमतीची ५३८ किलो मिरची पावडर, साडेआठ किलो ७४० रुपये किमतीचा सिंथेटीक रंगाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याची एकूण किंमत ही १ लाख ८५ हजार ७४० रुपये असल्याचे समोर आले आहे.