तिरुवनंतपुरम : देशातील सर्वाधिक साक्षर राज्य म्हणटल्या जाणाऱ्या केरळमध्ये राज्य सरकारने शिपाई पदासाठी भरती सुरु केली आहे. २३ हजार रुपये प्रति महिना पगार असलेल्या या नोकरीसाठी किमान पात्रता ७ वी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे.तसेच शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना सायकल चालवता येणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दि. २७ ऑक्टोबर रोजी या पदासाठी अर्ज करण्यासाठी रांगच रांग पाहायला मिळाली. यातील अनेक उमेदवारांकडे अभियांत्रिकीच्या पदव्याही होत्या.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १०१ उमेदवारांनी सायकलिंगची चाचणी परिक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यात बी.टेक पदवी घेतलेले उमेदवारही होते. दरम्यान एका एका अभियांत्रिकी पदवीधारकाने शिपायाची सरकारी नोकरी सुरक्षित असल्याचे सांगितले.
बी.टेक पदवी असून ही केरळमध्ये ११ हजार रुपयांची नोकरी करावी लागत असल्याचेही काही उमेदवारांनी सांगितले. त्यात ही त्यांना फार श्रम करावे लागतात. त्यामुळे अभियांत्रिकीसोबतच अनेक मोठ्या पदव्या असून ही उमेदवार शिपाई पदासाठी अर्ज करत आहेत. खरं तर, तरुण सरकारी नोकऱ्यांना सुरक्षित मानत आहेत, ज्यामध्ये नोकरी गमावण्याचा धोका नाही.
दरम्यान प्रशांत नावाच्या एका तरुणाने सांगितले की, तो कोचीमध्ये कॅफे चालवत होता. मात्र आता त्याला शिपायाची नोकरी मिळाल्याने तो आंनदीत आहे. त्याला आशा आहे की त्याला वीज विभाग KSEB मध्ये नियुक्ती मिळेल, जिथे त्याला दरमहा सुमारे ३० हजार रुपये पगार मिळेल. मात्र शिपाई पदासाठी या नोकरीचे मूळ वेतन २३ हजार प्रति महिना असल्याचे सांगितले जात आहे.