मुंबई : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातुन चुकीचा व अवमानकारक मजकुर प्रसिद्ध केल्याप्रकरणी खासदार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मालेगाव येथील न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप दादा भुसे यांनी राऊतांवर केला. मालेगावच्या मा.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्या मार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामन्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने सामना या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याचा आरोप राऊतांवर करण्यात आला आहे.
आता या प्रकरणी राऊतांना मालेगाव कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण ते कोर्टात हजर राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गिरणा सहकारी साखर कारखान्यात गैरव्यव्हार झाल्याचा आरोप राऊतांनी सामनातून केला होता. पण हा आरोप भुसेंनी नाकारला आहे.