मुंबई : नवरात्री उत्सवादरम्यान मुंबईत प्रसिद्ध दांडिया आणि गरबा क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाईट’चे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. उत्सवाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आणि लाइव्ह म्युझिक गरबा खेळण्यासाठी रसिक मोठ्या संख्येने पास खरेदी करतात. दरम्यान, पासेसच्या नावाखाली मुंबईतील बोरिवली परिसरात तब्बल १५६ तरुणांची लुट केल्याची माहिती समोर आली आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पासची किंमत ४,५०० रुपये एवढी आहे. परंतू, कमी किमतीत म्हणजे ३,३०० रुपयात पास मिळेल असा अमिष दाखवून तरुणांनी अनेकांना लुटले आहे. याविषयी पोलिसांनी कारवाईकरता ४०६, ४२० आणि ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असला तरी अद्याप आरोपीचा शोध लागला नाही. तरी, पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि मोबाईल नंबरचा वापर करुन शोध घेण्यासाठी सुरुवात केली आहे.
नेमका कसा घडला हा प्रकार :
सर्वप्रथम आरोपींनी कांदिवली परिसरात राहणाऱ्या तरुणाला कमी पैशात पास देण्याचे अमिष दाखवले. यानंतर बोरिवली न्यू लिंक रोडवर येऊन पैसे द्यावेत असे सांगितले. पैसे दिल्यानंतर आरोपीने पासेस घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणचा पत्ता दिला. पण हा पत्ता तरुणाला मिळालाच नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले. म्हणून, त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केला.