मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) ने केलेल्या घोषणेनुसार ऑलिम्पिकमध्ये तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. २०२८ साली लॉस एंजेलिस येथे ऑलिम्पिकचे सामने भरवण्यात येणार असून टी २० स्वरूपात हे क्रिकेट सामने होणार आहेत. याशिवाय स्क्वॅश खेळालादेखील २०२८ च्या ऑलिम्पिक खेळाचा भाग बनवण्यात येणार आहे.
यापूर्वी १९०० सालामध्ये झालेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश होता. पण त्यानंतर ऑलिम्पिकमधून क्रिकेट हटवण्यात आले. मात्र १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत पार पडलेल्या आयओसी अधिवेशनात यासाठी मतदान झाले असून ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी सांगितले की, "ऑलिम्पिक समितीने लॉस एंजलेस ऑलिम्पिकमध्ये ५ नवीन खेळ समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. समितीने तो प्रस्ताव मान्य केला आहे. यात बेसबॉल - सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लाक्रोसे, स्क्वॉश आणि क्रिकेट यांचा समावेश आहे."