गरब्याच्या कार्यक्रमात केवळ हिंदूंना प्रवेश द्यावा, या मागणीचा संबंध थेट भाजप, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लीमविरोधी कसे आहेत, याच्याशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करून दै. ‘सामना’च्या संपादकांनी त्यांच्या कालच्या अग्रलेखातून बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शनच घडविले. उलट मोदी यांनी मुस्लीम भगिनींना सन्मानाने जगता यावे, यासाठीच तिहेरी तलाकविरोधी कायदा केला. पण, वैचारिक गोंधळ झाला की, आपल्याच वक्तव्यांतील विरोधाभास आणि भोंगळपणा कसा उघड होतो, त्याचे ‘सामना’चा अग्रलेख हे उत्तम उदाहरण!
हा मुंबईतील गरबा कार्यक्रमात हिंदूंनाच प्रवेश द्यावा,अशी अतिशय रास्त मागणी हिंदू संघटनांनी केली. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांना काही प्रमाणात आळा बसेल, अशी त्यामागील भूमिका. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता आणि देशात, अगदी महाराष्ट्रातही घडणार्या अनेक ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांचा अनुभव लक्षात घेता, ही मागणी अवाजवी तर नव्हेच, उलट सुसंगत आहे, असेच म्हणावे लागते. पण, ‘लव्ह जिहाद’ला विरोध करणे, हे चुकीचे (दै. सामनाच्या भाषेत ‘बाटगे हिंदुत्व’) हिंदुत्व आहे,’ ही समजूतच मुळी भंपकपणाची आहे.
आपल्या कालच्या संपादकीयमध्ये ‘सामना’कारांनी ‘बाटगा’ हा शब्द वारंवार वापरला. मुळात दै. ‘सामना’च्या संपादकांना ‘बाटगा’ या शब्दाचा कदाचित अर्थच ठाऊक नसावा (त्यांना तशी जगातील अनेक गोष्टींची माहिती नाही, हा भाग वेगळा. पण, आपले अज्ञानत्व समजण्यासाठीही बौद्धिक कुवत लागते, जिचा ‘सामना’कारांकडे पूर्ण अभाव आहे. असो). ज्याने काही प्रलोभनांमुळे आणि आर्थिक लाभांसाठी आपला मूळ धर्म सोडून नवा धर्म स्वीकारला आहे, त्याला ‘बाटगा’ असे म्हणतात. केवळ काही लाभांसाठी आपला धर्म सोडणार्यांना त्यांच्या या कमकुवतपणाबद्दल तुच्छ लेखण्यासाठी त्यांचा उल्लेख ‘बाटगा’ असा करण्यात येत असे.
म्हणूनच स्थापनेपासून आजतागायत हिंदुत्वाची भूमिका (म्हणजे आपला मूळ धर्म) न सोडलेल्या भारतीय जनता पक्षाला हे अर्धवट बुद्धीचे संपादक कोणत्या अर्थाने ‘बाटगा’ म्हणत आहेत, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. उलट राजकीय संदर्भात बाटगा जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरे यांचा शिल्लक गट आहे, ज्याने पहिल्यापासून घेतलेली हिंदुत्वाची भूमिका केवळ मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी (आर्थिक लाभांच्या उद्देशाने) सोडून बेगडी सेक्युलॅरिझमची भूमिका स्वीकारली. त्यामुळे या स्वयंघोषित संपादकांच्या अग्रलेखातील सारी मांडणीच चुकीची होऊन बसते. या अग्रलेखात ‘सामना’कारांनी भाजपवर टीका म्हणून केलेली अनेक विधाने, ही वास्तविक त्यांनाच लागू होतात.
मुळात नवरात्र हा हिंदूंचा धार्मिक उत्सव असून, त्यातील गरबा या नृत्यातही सांस्कृतिक धार्मिकता आहे. हिंदू धर्मसंकल्पनांशी पूर्णपणे फारकत घेतलेल्यांनी, या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे कोणतेही कारण नाही. एखाद्या मुस्लीम तरुणाने गरब्यात का सहभागी व्हावे? आणि इस्लामध्ये तसंही नाचगाणे हे सगळे हरामच की! काही वर्षांपासून मुंबईच्या घाटकोपर आणि बोरिवली यांसारख्या उपनगरांमध्ये आपली खरी ओळख लपवून आणि हिंदू असल्याचे भासवून दांडियाच्या कार्यक्रमांमध्ये काही मुस्लीम युवक घुसल्याचे दिसून आले होते. तेथील हिंदू तरूणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा त्यांचा हेतू असल्याचे त्यांनी पोलीस चौकशीत कबूल केले होते. त्यांचा हेतू स्वच्छ होता, तर त्यांनी आपली मुस्लीम ओळख का लपविली? अशा घटनांमुळे हिंदू युवतींच्या जीवाला आणि शीलाला धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे गरब्याच्या कार्यक्रमात केवळ हिंदूंना प्रवेश देणे तर्कसंगतच आहे. एकीकडे देवीचा जागर करायचा, हिंदुत्वाची भाषा करायची आणि हिंदू तरूणींच्या जीवाच्या संरक्षणासाठी काहीही करायचे नाही, हेच उद्धव ठाकरेंच्या उरल्यासुरल्या शिवसेनेचे धोरण दिसते.
भाजपवर गुजराती लोकांचा पगडा आहे, हे सूचविण्यासाठी दै. ‘सामना’ने अग्रलेखात गुजरातीचा उल्लेख केला आहे. पण, गुजराती लोकांची आणि भाषेची इतकी अॅलर्जी असेल, तर ‘मारू घाटकोपर’ लिहिलेले फलक उखडून फेकणार्यांनी वरळीमध्ये ‘केम छो वरली?’ असा प्रश्न विचारणारे फलक कोणी आणि का लावले होते, त्याचेही उत्तर द्यावे. भारतीय संस्कृतीत बसत नाही, म्हणून एकेकाळी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासही शिवसेनेने रस्त्यावर उतरुन विरोध केला होता. मात्र, आता मूळ भूमिकेवरून घुमजाव केल्याने त्यांना आपल्याच पूर्वीच्या कृत्यांना आणि भूमिकेला विरोध करावा लागतोय, असेच दिसते आणि यालाच ‘बाटगेपणा’ म्हणतात. इतकी वैचारिक दिवाळखोरी दाखवूनही वर आपणच शहाणे असल्याची शेखी मिरविण्यासाठी अव्वल दर्जाचा निगरगट्टपणा आणि निर्ढावलेपण लागते, तेही इथे अगदी ठासून भरलेले!
बंगालचे उदाहरण देताना त्यांनी नवरात्र हा हिंदूंचा सण असून, त्यात आदिशक्ती दुर्गेची उपासना केली जाते, असे म्हटले आहे. म्हणजे हा हिंदूंचा सण आहे, हे त्यांना मान्य. तसे असेल तर त्यात अन्य धर्मियांनी सहभागी होण्याचे सबळ कारणच दिसत नाही. त्यातही आपली अन्य धर्मीय ओळख लपवून जे यात सहभागी होऊ इच्छितात, त्यांना यापासून दूर ठेवणेच हिताचे. तसेच गरबा आणि दुर्गापूजा हे दोन स्वतंत्र विषय आहेत, हेही या महान विश्वज्ञानी संपादकांना ठाऊक नाही. गरबा हा प्रामुख्याने गुजराती समाजातच खेळला जातो, बंगाली नव्हे.
परंतु, या संपादकीयचा मुख्य उद्देश मोदी यांना मुस्लीमविरोधी सिद्ध करणे हा आहे, असे स्पष्ट दिसून येते. मोदी हे मुस्लीमविरोधी असते, तर त्यांनी मुस्लीम भगिनींना सन्मानाने जगता यावे, यासाठी तिहेरी तलाकविरोधी कायदा केलाच नसता. मोदी सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचे लाभ, हे मुस्लीम समाजातील महिलांनाही पूर्णपणे मिळाले आहेत. तसेच मोदी हे मुस्लीमविरोधी असते, तर सात मुस्लीम राष्ट्रांनी त्यांना आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कशाला बहाल केला असता? फार कशाला, सध्या सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा जाहीर करूनही, त्यांना युद्धात मध्यस्थी करण्याची विनंती पॅलेस्टिनी ऑथोरिटीने का केली असती? पण, विद्यमान राजकीय अपरिहार्यतेमुळे उरल्यासुरल्या शेणिकांना उलटसुलट, भोंगळ आणि विरोधाभासी भूमिका घ्यावी लागत आहे, त्याबद्दल त्यांची कीवही करावीशी वाटत नाही!