पार्श्वसंगीतातील उगवता तारा...!

    06-Jan-2023   
Total Views |
विशाल राजू नाटेकर


तरूण वयात त्याने मराठी नाट्य आणि मालिका विश्वात आपल्या संगीत दिग्दर्शनाने स्वतंत्र छाप सोडली. जाणून घेऊया मुंबईतील युवा संगीत दिग्दर्शक विशाल राजू नाटेकर याच्याविषयी...


मुंबईत जन्मलेल्या विशाल राजू नाटेकर याचे वडील मुंबई महापालिकेत नोकरीला असल्याने कुटुंबाची आर्थिक बाजू तशी भक्कम होती. आयईएस दिगंबर पाटकर विद्यालयात विशालने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. संगीतात रस असल्याने बालपणापासूनच त्याचा ओढा संगीत क्षेत्राकडे होता. शालेय वयातच त्याने नाटकाचे धडे गिरवले. शालेय जीवनातच त्याने अनेक बालनाट्यांमध्येही काम केले. दहावीत म्हणावे तसे यश न मिळाल्याने त्याने अभिनय किंवा संगीत या दोन क्षेत्रांपैकी संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. पुढे वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात त्याने वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला.

यादरम्यान त्याने बारावीच्या अखेरीस व्यावसायिक नाटकांमध्ये संगीत संयोजनाचे काम करण्यास सुरूवात केली. अनुभवानुसार मिळणार्‍या कामांमध्येही वाढ होत गेली. पदवीच्या दुसर्‍या वर्षाला असताना आजारपणामुळे त्याला परीक्षा देणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याचे वर्ष वाया गेले. यानंतर त्याने पुढील शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला. आपले संगीत दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. अथर्व इन्स्टिट्यूटमधून त्याने दीड वर्षांचा ‘म्युझिक प्रॉडक्शन’चा कोर्स पूर्ण केला. यानंतर त्याने अभिनयाचे धडेही घेतले. यासंबंधीच्या अनेक गोष्टी विशाल चक्क युट्यूबवरूनही शिकला.

‘वाडा चिरेबंदी’, ‘युगान्त’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘संज्या छाया’, ‘चारचौघी’, ‘हॅम्लेट’, ‘हसवा फसवी’, ‘सुरक्षित अंतर ठेवा’, ‘आमच्या हीचं प्रकरण’ अशा अनेक नाटकांच्या संगीत संयोजनाचे काम विशालने केले. ‘शाब्बास सुनबाई’ यांसह अनेक मालिकांनाही त्याने संगीत दिले. विशालने ‘एम एक्स प्लेअर’वरील दोन वेबसीरिजचेही संगीत दिग्दर्शन केले. एकूणच त्याने आतापर्यंत २०हून अधिक मालिका-नाटकांसाठी संगीत दिग्दर्शनाचे काम केले. शांततेत काम करण्यासाठी घरी स्टुडिओ तयार करण्याचा विचार करत त्याने घरात आपला स्वतंत्र स्टुडिओही तयार केला.

 ‘लॉकडाऊन’च्या काळात त्याने आपली कामे या स्टुडिओतूनच केली. त्यासोबत नवे तंत्रज्ञान, हार्मोनियमचा रियाझ आणि गिटार शिकून घेतली. अनेक गोष्टी त्याने पुस्तक आणि युट्यूबच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न केला. विशालला अनेक वाद्ये वाजवता येतात. चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह सचिन गोस्वामी, प्रणित बोडके यांनी विशालला मोलाचे मार्गदर्शन केले. कुटुंबीयांच्या प्रश्नांना त्याने आपल्या कामातून उत्तर दिले. त्यामुळे त्याला कुटुंबीयांचा संपूर्ण पाठिंबा लाभला. लता मंगेशकर, सचिन पिळगावकर, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, अशोक सराफ, प्यारेलाल यांसारख्या अनेक दिग्गजांना भेटण्याचा योगही विशालच्या आयुष्यात आला. भविष्यात उत्तम संगीत दिग्दर्शक होण्याचा त्याचा मानस असून ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’, ‘नेटफ्लिक्स’ यांबरोबरच हिंदी चित्रपट आणि मालकांसाठीही काम करण्याची त्याची इच्छा आहे.

“आतून जे वाटतंय ते लोकांपर्यंत संगीताच्या माध्यमातून पोहोचवणे म्हणजे संगीत दिग्दर्शन होय. प्रेक्षक जो विचार करतो ते संगीतातून मांडण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. प्रेक्षकाला वाटणारा आनंद संगीतातून पोहोचला पाहिजे. संगीत दिग्दर्शक होणे अजिबात सोपे नाही. त्यासाठी सातत्याने रियाझ करावा लागतो. सूर, भावना, आर्तता व लोकांचे बोलणे समजले पाहिजे. गोष्टी शिकत नाही तोपर्यंत त्या अवगत होत नाही. संगीत क्षेत्रात येण्याआधी एक वाद्य तरी वाजवायला शिकावे. शास्त्रीय संगीत शिकणेही गरजेचे आहे,” असे विशाल या क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक तरुणांना सांगतो.

“संगीत दिग्दर्शक कुठलाही असो, त्याला स्वतःसाठी फार कमी वेळ मिळतो. जुन्या दिग्दर्शकांनी आताच्या तरूणपिढीला काम दिले पाहिजे. त्यांना प्राधान्य दिले पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता नक्कीच आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भले काम काहीसे सोपे झाले असले तरीही तरूण पिढीला या क्षेत्रात प्रोत्साहन द्यायला हवे,” असे विशाल सांगतो.या क्षेत्रातील प्रवासाविषयी बोलताना विशाल सांगतो की, “संगीतातून मालिका घराघरात पोहोचवायची असते. पार्श्वसंगीतात काम करत असताना वेगळीच मजा येते. चित्रपट तयार होण्याहून अधिकचा वेळ संगीत दिग्दर्शनासाठी लागत असतो. नोकरीत फारसे मन रमू शकत नाही, हे मी ओळखले होते. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो.”

चंद्रकांत कुलकर्णी यांनी एके दिवशी अनायासे फोन करत स्टुडिओत बोलावून घेतले. ज्या व्यक्तीशी भेट घडवून देण्यासाठी मला बोलावले ती व्यक्ती होती ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की. यावेळी मोठा सुखद धक्का बसल्याचे विशाल सांगतो. त्यावेळी अशोक पत्की यांनी अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आणि हा प्रसंग कायम संस्मरणीय असल्याचे विशाल आवर्जून नमूद करतो. तरूण वयात मराठी नाट्य आणि मालिकाविश्वात आपल्या संगीत दिग्दर्शनाने आपली स्वतंत्र छाप उमटविणार्‍या विशाल नाटेकर याच्या आगामी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.