गोसेवेसाठी झटणारा ध्येयवेडा...

    14-Jan-2023   
Total Views |

ओंकार रामदास गोळे


देव, देश अन् धर्माचे आपण देणे लागतो आणि ते फेडण्यासाठीच या उच्चशिक्षित युवकाने नोकरी सोडून गोसेवेचे व्रत हाती घेतले. जाणून घेऊया युवा गोवंशसंरक्षक ओंकार रामदास गोळे याच्याविषयी...



तारा जिल्ह्यातील गोळेगावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ओंकार रामदास गोळे याचे प्राथमिक शिक्षण लोणंद येथील जि.प. प्राथमिक शाळेत, तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण मालोजीराजे निंबाळकर विद्यालयात पूर्ण झाले. नव्या शाळेचे बांधकाम सुरू असल्याने वर्ग झाडाखाली भरत. त्यामुळे आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयातून पूर्ण केले. यादरम्यान त्याने कबड्डीत जिल्हास्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व केले. 2014 साली एक दिवसाआधी अपघात होऊनही त्याने मलमपट्टी करत त्याच अवस्थेत परीक्षा दिली आणि तो दहावीची परीक्षा उत्तीर्णही झाला. पुढे ‘मेकॅनिकल डिप्लोमा’चे शिक्षण घेत असताना सुरूवडी येथील महेश पवार यांच्याशी 2016 साली त्याची ओळख झाली. महेश यांनी ओंकारला ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’, गोरक्षण, धर्मजागृती याविषयी मार्गदर्शन करत भुईज येथील संभाजी भिडे गुरूजींच्या गडकोट मोहिमेसंदर्भातील बैठकीला हजेरी लावण्यास सांगितले. त्यानुसार ओंकारने तिथे हजेरी लावली आणि यावेळी त्याची गोरक्षणाचे कार्य करणार्‍या गोसंरक्षकांशी ओळख झाली. जानेवारी 2017 मध्ये ओंकारने पन्हाळा ते विशालगड अशी गडकोट मोहीम पूर्ण केली. यादरम्यान डॉ. अमर आडके यांनी सांगितलेला पावनखिंडीचा इतिहास आणि भोर येथील धनंजय पवार यांनी दिलेल्या गोरक्षणाविषयीच्या माहितीने ओंकार प्रेरित झाला.

 
स्वतःसाठी सर्वच जगतात. परंतु, देव, देश आणि धर्माचे आपण देणे लागतो, ते फेडण्यासाठीच ओंकारने गोरक्षणाच्या कार्यात स्वतःला झोकून देण्याचे ठरवले. कॉलेजला जाताना फलटणजवळील बारामती चौक परिसरात कत्तलखाना असल्याची माहिती त्याला मिळाली. यादरम्यान त्याची प्रशांत रेवडीकर यांच्याशी ओळख झाली. कत्तलखाना बंद करणे आवाक्याबाहेर असल्याने ओंकारने कत्तलखान्यात गोवंश पोहोचू नये, यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा अपघातानंतर नाल्यात पडलेल्या गाडीतील गोवंश सोडून चालक फरार झाला. यानंतर या गाडीतील गोवंशाची सुटका करून ओंकारने तो गोशाळेला सुपूर्द केला. यानंतर त्याने लोणंद रोडला रात्री पहारा देण्यास सुरुवात केली. एकदा गोवंश घेऊन जाणारी एक चारचाकी वीर येथून निसटली अन् लोणंद येथे आली. याठिकाणी ओंकारने सापळा रचला खरा, परंतु, गाडी पुन्हा मागे फिरली. शोधाशोध केल्यानंतर मरीआईची वाडी गावात एका शेतात ती सापडली. यानंतर जखमी रेडकूची पोलिसांच्या साहाय्याने ओंकारने सुटका केली. त्यावेळी हे रेडकू चार पायांवर उभेदेखील राहू शकत नव्हते. यानंतर पोलिसांसमोर आपले म्हणणे कसे मांडावे, याची माहिती ओंकारला मिळाली. पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने ओंकार हतबल झाला. परंतु, त्याने प्रयत्न सोडले नाही. यानंतर त्याने सहकार्‍यांसह त्याच्या घराशेजारीच एका शेडमध्ये ‘जय श्रीराम गोपालन गोशाळा’ सुरू केली.



 या गोशाळेला नोव्हेंबर 2017 साली ‘शिवप्रतिष्ठा’ने राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी पहिली देशी गाय दिली. ज्यांना गायीचा सांभाळ करणे शक्य नाही, अशा शेतकर्‍यांकडून ओंकारने 13 गाई घेतल्या. पंडित मोडक यांच्या गोशाळेंतर्गत या गोशाळेचे काम सुरू झाले. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर शिरवळ येथील कंपनीत ओंकारने 12 हजार रूपये वेतनावर नोकरी सुरू केली. यादरम्यान आई-वडिलांनीही गोशाळा चालवण्यासाठी सहकार्य केले. यानंतर गोवंशाची संख्या वाढत गेल्याने नोकरीमुळे गोरक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी ओंकारने हातची नोकरी सोडून दिली. त्यानंतर त्याने राजीव दीक्षित भवनात पंचगव्य प्रशिक्षण घेत गोमूत्र, शेण यांपासून गोमूत्र अर्क, साबण, नस्य, गोरस बनवून त्याची विक्री करण्यास सुरुवात केली. यामुळे ओंकारला गोरक्षणासह अर्थाजनही होऊ लागले. गाईंची संख्या वाढत असल्याने त्याने शेतात सुरुवातीला काट्याचे कुंपण करून तिथेच सर्व गोवंशासाठी निवारा उभा केला. पुढे लोकांच्या सहकार्याने भव्य शेड उभे राहिले. यानंतर अधिकृतपणे गाई ताब्यात मिळाव्या, यासाठी त्याने पंडित मोडक यांचे मार्गदर्शक घेत सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेअंतर्गत शाखा सुरू केली. तसे पत्रही त्याला मिळाले. गोरक्षणाचे काम आणखी सोपे आणि जोमाने सुरू झाले.



शिवाजी गरूड यांच्या मदतीने सहा गुंठे जागेत भव्य शेड उभे राहिले. ओंकारच्या सध्या एक एकर जागेवर उभे असणार्‍या सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेत 62 गोवंशाचा सांभाळ केला जात असून गोशाळा संपूर्णतः लोकांच्या सहकार्यावर उभी आहे. या कार्यात ओंकारला आई शुभांगी, वडील रामदास यांच्यासह महेश पवार, पंडित मोडक, विक्रम पावसकर, प्रशांत रेवडीकर, निखिल खंडागळे, सुरज साळुंखे यांचे सहकार्य लाभते.

गोरक्षणाचे कार्य करत असताना 15 दिवस तुरुंगात काढावे लागले. देशी गाय संपली, तर भविष्यात गाय आणि बैल केवळ चित्रातच पाहता येईल. गाय वाचली पाहिजे. गाय सांभाळण्यासाठी ज्या शेतकर्‍याला आर्थिक अडचण असेल, त्याला शक्य तितके सहकार्य करावे. भविष्यात आयुर्वेद, सेंद्रीय शेती आणि गोरक्षण यासाठी काम करणार असल्याचे ओंकार सांगतो. दुनियेची पर्वा न करता गोसेवेसाठी स्वतःला वाहून घेणार्‍या ओंकार गोळे याला आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.